मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठीविषयी बोलताना विविध शब्दांत वर्णन करता येईल. जसे की, मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषा नेहमीच अधिक संवेदनशील करण्यासाठी सहकार्य करते. ती भावनिकदृष्ट्या आपल्याला सशक्त करते. आईचे आपल्या मनात जे स्थान आहे, तेच मातृभाषेचे आहे. ती आपल्या अस्मितेची, अभिमानाची भाषा आहे नि असे बरेच काही. जे मराठीचे गौरव करणारे, गुणगान करणारे आहे किंवा असू शकेल. आता प्रश्न असा आहे की, मग मराठीसाठी आपण अजून काय करणार आहोत?
शालेय स्तरावरील मराठीसाठी मी नेहमी या सदरातून बोलत राहिले आहे. उच्च शिक्षण आणि मराठीचा जेव्हा जेव्हा विषय समोर येतो. तेव्हा पालक व विद्यार्थ्यांचा मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विलक्षण अस्वस्थ करतो. मराठी शिकून काय होणार आहे? मराठी शिकून कुठली नोकरी करणार? मराठी आणि नवीन जगाचा काय संबंध आहे? उत्तर आधुनिक समाजात मराठीचे काय स्थान? पाच एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक विद्यार्थी खूप छान लिहायचा. अतिशय स्पष्ट मांडणी, सतत वाचन आणि मराठीकडे कल. पण दुसरीकडे मराठी हा विषय निवडण्याबद्दल मात्र साशंकता नि त्यातूनच त्याने अर्थशास्त्र या विषयाची निवड केली. खरे तर त्या विषयात तोवर त्याला जेमतेम गुण होते; पण डोक्यात मॅनेजमेंट वगैरे सतत सुरू होते म्हणून मराठीवर फुली मारायचे त्याने ठरवले. मला त्या क्षणी जाणवत होते की, त्याची निवड चुकली आहे; पण विद्यार्थ्यांवर कुठलीच गोष्ट लादायची नाही, हे तत्त्व म्हणून प्रामाणिक शिक्षकाने स्वीकारायचे असते. त्यामुळे त्याला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा मुद्दाच नव्हता. त्याने पास होण्यापुरते गुण मिळवून अर्थशास्त्रातील पदवी घेतली. पुढे काय करावे, हे सुचत नव्हते.
शेवटी पुन्हा त्याने मराठी या विषयात पदवी घ्यायचे ठरवले. मराठी विषयात पदवी घेऊन, तो विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. मराठीच्या आधारे अर्थार्जनाची वाट शोधली नि त्यातून अधिक पुढल्या दिशा शोधतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयी गुणवत्ता असूनही मराठीकडे प्रथमदर्शनी पाठ फिरवण्याचे, हे पहिले उदाहरण नाही. याचे अगदी स्पष्ट कारण म्हणजे समाजाला मराठी ही रोजगाराची भाषा वाटत नाही. ती रोजगाराची भाषा व्हावी, ही शासनाची जबाबदारी असायलाच हवी. मध्यंतरी अशा काही घटना घडल्या की, प्रचंड संताप झाला. एखाद्या कंपनीने मराठीतून शिक्षण झाले आहे का? या कारणाने उमेदवारांचे अर्ज नाकारणे किंवा शाळांमध्ये मराठीतून शिक्षण झालेल्यांना नोकरीच नाकारणे. हे असे प्रकार महाराष्ट्रात घडले, तर तो त्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर ठरेलच; पण तो मराठीवर देखील फार मोठा अन्याय ठरेल.
इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवला गेलाच पाहिजे, हे परिपत्रक आल्यावर तशी सोय करणे इंग्रजी शाळांना बंधनकारक झाले; पण काही शाळांनी हिंदीचीही लिपी देवनागरी म्हणून हिंदीच्या शिक्षकांनाच मराठीची जबाबदारी देऊन टाकली. आज जर मराठीचे शिक्षण घेणे बंधनकारक झाले आहे, तर मराठीच्या शिक्षकांच्या नेमणुका कराव्याच लागतील व त्याकरिता मराठी विषयांच्या पदवीधारकांची नेमणूकच उचित ठरेल. काही गोष्टी संधी देऊन साध्य कराव्या लागतात, तर काही सक्तीने कराव्या लागतात. मराठीतून रोजगाराच्या संधी निर्माण करणे नि संधीची मात्रा चालत नसेल, तिथे सक्तीतून मराठीचे कल्याण साधणे, या दोहोंकरिता शासन कटिबद्ध असायला हवे. ‘इये मराठीचिये नगरी’ हे घडेल तो सुदिन!