Friday, May 10, 2024

बेबो

  • नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड

इनफॅक्ट प्रेमलग्न… किंवा लग्नच करावं की काय? आय अॅम थिंकिंग!”

“अरे वा! थिंकिंग पॉवर आलीय का तरी तुला?” “तुम्हाला काय वाटलं? बेबो अजून नाबालिक आहे? अहो बाबा, मी मेजर झालेय. आय अॅम नाइनटीन!” ती नाक उडवून म्हणाली.

“नेहमी काय अशी रडतराव चेहरा करून घरात बसतेस गं तू? जा, मला गरमागरम भजी काढ. मस्त पावसाळी हवा आहे.” विसू आपल्या बायकोवर डाफरला.

“हीच गोष्ट प्रेमाने सांगता येते बाबा!” बेबो नेमकी त्याचवेळी कॉलेजातून टपकली.

“ए! चपे! कॉलेजात गेलीस म्हणून शिंग नाही फुटली तुला बेबो! काय समजलीस?” विसू गुरकावला.

“तुमचं प्रेमलग्न होतं ना बाबा?”

“तो इतिहास झाला. वीस वर्षांपूर्वीचा! ते गाणंय ना? काय होतीस तू? काय झालीस तू! पंचेचाळीस किलो टु अडुसष्ट केजी! चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!” आपल्याच विनोदावर तो जाम खूश झाला. गडागडा हसायला लागला. बेबोला ते बिलकुल आवडलं नाही.

“शिवाय ती चाँदबीबी झाली! बिच्चारी!” बेबो म्हणाली.

“म्हणजे? धर्मबदल? मला नं विचारता?” विसूनं विचारलं.

“अहो, तुम्हाला टक्कल पडलं ना! म्हणून म्हटलं… चाँदबीबी.” बेबो हसली तसं सुलूलाही हसू फुटलं. विसूचं मात्र नाक फुगलं.

बेबो म्हणाली, “तुम्हाला कशाला हवीयत भजी? तुमच्या प्रेमविवाहाचंच झालंय भजं! वीस वर्षांनी माझा नवरा जर असा वागला, ऑर्डरेश्वर झाला, नि माझी उणीदुणी काढू लागला तर मी आईसारखी मुळ्ळीच खपवून घेणार नाही. इनफॅक्ट प्रेमलग्न… किंवा लग्नच करावं की काय? आय अॅम थिंकिंग!”

“अरे वा! थिंकिंग पॉवर आलीय का तरी तुला?”

“तुम्हाला काय वाटलं? बेबो अजून नाबालिक आहे? अहो बाबा, मी मेजर झालेय. आय अॅम नाइनटीन!” ती नाक उडवून म्हणाली.

“मरू दे ते! तू मेजर झालीस तरी या घरातला मी कर्नल आहे. माझी रँक हायेस्ट! भजी हवी म्हणजे हवी!”

“ती नाही करणार हं बाबा!” “मग तू कर!”

“मी समोरच्या फाफडा आणि फरसाण मार्टमधून घेऊन येते त्यापेक्षा. मस्त व्हरायटी मिळेल.”

“गधडे.” पण तिनं बापाची ग्राम्यभाषा मनावर न घेता त्याच्या खिशात हात घातला आणि ती तीस रुपये पळवून बाहेर पडली.

“तुझ्यामुळे एवढी शेफारलीय बेबो.” विसू सुलूवर डाफरला.

बेबो फरसाणवाल्याकडून भजी निवडत होती. विविध प्रकारची. पालकची, मिरचीची, कांद्याची, बटाट्याची, मेथीची.

“अरे तीस रुपये मे क्या फाफडा आणि फरसाण मार्ट तू लूट लेंगी क्या?”

“अरे हरएक प्रकारकी दो दो भजी डालो भाई.” बेबो म्हणाली. आणि आपल्या मनासारखं करून वर पपईची चटणी घेऊनच बाहेर पडली.

बबन तेवढ्यात भेटला. तिला बघितल्याबरोबर त्यानं भांगात कंगवा फिरवला तशी ती फिस्सकन हसली.

“अरे, काही गरज नाही त्याची.”

“भगरा झालाय गं केसांचा.”

“मला बघितलं की इतका नर्व्हस का होतोस तू बबन्या?”

“इंप्रेशन मारायला जातो नि पचकाच होतो नेमका. तू ज्याम करीना कपूर दिसतेस गं! मला कॉम्प्लेक्स येतो. माझा शाहीद कपूर नको करूस हं बेबो! प्लीज!”

“काळजी सोड. मला एक्कही सैफ अली खान भेटला नाहीये.”

“आणि भेटला तर? रात्रंदिवस काळजी असते गं मला! अभ्यासात लक्ष लागत नाही बेबो.”

“बबन्या, आय अॅम नॉट शुअर!”

“कशाबद्दल? बेबो, कशाबद्दल? इयत्ता ९ वी ते १५वी आपण स्टेडी आहोत. नि आता तू? नो बेबो… यू काण्ट डिच मी लाईक दॅट.” त्यानं परत कंगवा काढून भांग पाडला.

“अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. बबन, आता सीरियसली तू अभ्यासाला लाग. तुझ्या घराच्या खिडकीतून एकसारखा माझ्या घराकडे बघतोस हे आईच्या लक्षात आलंय बरं का! आणि बबन्या, लग्नसंस्थेवरचा माझा विश्वास उडत चाललाय बरं का! अरे, बाबा नि आईपण एक्झॅक्टली नववीपासूनच स्टेडी होते. पण आता? त्या प्रेमलग्नाचं भजं झालंय भजं! ओ माय गॉड! भजीऽऽ! बाबांना भजी हवी होती पावसाळी दिवसाची. इथे तू गूळं काढीत बसलास नि सगळा घोटाळा झाला ना!”

“मी खूप अभ्यास करीन बेबो. वच्चन देतो तुला! मग? राहाशील ना माझ्याशी स्टेडी?”

“बरं! बघते!”

“बघते काय? तो प्रोफेसर जोगळेकर तुझ्यावर डोळा ठेवून असतो हे आख्ख्या वर्गाला कळलंय बेबो. तू कोपऱ्यात बसतेस तर मान वाकडी झालीय त्याची! जोगळवाकड्या!” बेबो हसत सुटली. बबनला म्हणाली, “इट ऑल डिपेंडस ऑन माय थॉट प्रोसेस अबाऊट मॅरेज बब्बू!”

ती लाडात आली की बब्बू म्हणते हे ठाऊक असलेला बबन छातीवरली टिकटिक अजमावीत मृदू आवाजात म्हणाला, “जा, भजी देऊन लवक्कर ये तुझ्या बब्बूकडे.” ती धावली… बघते तो काय? चाँदबीबी चक्क ‘चाँद’च्या बाहुपाशात होती. दारातच ती चित्कारली, “अरे! हे काय?” …आई गडबडली पण बाबा तिला तसेच घट्ट पकडून म्हणाले, “बेबो, हे मुरलेलं लोणचं.” “मग ही भजी त्याशी तोंडी लावा. मी चालले.” बेबो हसून म्हणाली. “कुठे गं?” आईनं विचारलंच. “लोणचं घालायला ताज्या कैरीचं.” बेबो पळाली. बबन्याकडे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -