Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनचला संपन्न जगूया !

चला संपन्न जगूया !

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

मार्च २०२० ला या संपूर्ण जगाला कोरोना या महाभयंकर सांसर्गिक रोगाने विळखा घातला. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले, जग थांबले आणि आयुष्य किती क्षणभंगूर असते याची जाणीव प्रत्येकाला झाली. पूर्वी साधी गोळी घेऊन पळून जाणारा ताप आणि खोकला जीवघेणे असू शकतात याचा शोध लागला आणि आपले आरोग्य उत्तम असले पाहिजे याची सर्वात प्रथम जाणीव अनेकांना झाली. त्यातूनच २०२० या सालानंतर येणाऱ्या जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व जास्त वाढले.

तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने सन १९४८ मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. त्यात दरवर्षी “जागतिक आरोग्य दिन” साजरा करण्याचा निर्णय झाला आणि पहिला जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने १९९१ पासून एका थीमनुसार तो साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कोणत्या ना कोणत्या थीमनुसार साजरा केला जातो. कोरोनाचा मानवजातीवर हल्ला होईपर्यंत या संघटनेच्या कामाकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र कोरोनाने आपल्या जगण्याचे अनेक पैलू शिकवले. जीवाची किंमत किती असते ते शिकवले. नाते संबंधांना आयुष्यात किती महत्त्व आहे ते शिकवले. एकदा मृत्यू आजूबाजूला घोंगावू लागला की गरीब आणि श्रीमंती हा भेद राहत नाही, पैसे अडका यालाच किंमत राहत नाही हेही शिकवले, माणुसकी शिकवलीच, त्याचवेळी उत्तम आरोग्य हेच आपले खरे धन आहे याची जाणीव करून दिली.

खरंच आपण किती सजग असतो आपल्या आरोग्याबद्दल? जेव्हा आजारी पडतो, नाकात ऑक्सिजनसह अनेक नळ्यांमध्ये गुंडाळलेला आपला देह रुग्णालयाच्या बेडवर पडून असतो त्यावेळी आपण आपल्या आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टीकडे किती दुर्लक्ष केले याची जाणीव आपल्याला होते. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. आजारातून बरे होता येते. पण पूर्वीची शारीरिक आणि मानसिक ताकद मात्र त्याच जोमाने परत येत नाही. त्यात जसजसे आपण प्रगती या शब्दाभोवती आपले आयुष्य अडकवून घेतले आहे आणि त्यामार्गाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करत असतानाच आपण आपल्याला मिळालेल्या उत्तम देहयष्टी, उत्तम मन, शांत आयुष्य या सगळ्यांपासून दूर होऊ लागलो आहोत. आपलं दैनंदिन जगणं, बोलणं, खाणं-पिणं या सगळ्यांत बदल झालेले आहेत. हे खूप प्रगत दिसत असले तरीही त्यातून तब्येतीच्या अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती जाऊन न्यूक्लिअर कुटुंब पद्धती दिसू लागली. वेल फर्निश्ड फ्लॅटमध्ये हे त्रिकोणी-चौकोनी कुटुंब राहू लागले पण मानसिक शांतता मात्र ढळली आहे. त्याचाही परिणाम शारीरिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

मनुष्य एकीकडे आपले आयुष्यमान वाढवण्यासाठीच, स्वतःला चिरंजीवी करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्याच्याच आधुनिक जीवनशैलीमुळे तो आयुष्यमान कमी करू लागला आहे. त्यातूनच नव्या दशकात नवे रोग उद्भवू लागले आहेत. त्याचा सामना करण्यासाठी नव नवीन औषधे, लसीही उपलब्ध होत आहेत. याबाबतची जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम जागतिक आरोग्य संघटना करताना दिसते. जागतिक आरोग्यमान योग्य ठेवतानाच कोणत्या बदलांचा मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतो याचाही अभ्यास त्यानिमित्ताने होताना दिसत आहे.

पण केवळ संघटनांमुळे नव्हे तर आता प्रत्येकानेच आपल्या आरोग्याकडे जागरूकतेने पाहिले पाहिजे. आपली जीवनशैली बदलली पाहिजे. निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो ते अंगीकारले पाहिजे. निसर्गाला जपले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी भारताकडे खूप मोठी आयुर्वेदाची परंपरा आहे, ध्यान योगाची परंपरा आहे. ती जपली पाहिजे. तरच हे जग सुदृढ आणि आरोग्यपूर्ण राहील, ही वसुंधरा निर्मळ राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -