Tuesday, May 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAcharya Atrey : लोक काय म्हणतील?

Acharya Atrey : लोक काय म्हणतील?

दोन-तीन तास एका विलक्षण बेफाम अवस्थेत आचार्य अत्रे (Acharya Atrey) स्वतःचे संपूर्ण नाटक वाचताना, आपल्या पहाडी आवाजात ते साऱ्या जगाला प्रश्न विचारत होते, ‘जग काय म्हणेल?’ ‘नवऱ्याच्या छळाने त्रस्त झालेली नायिका उल्काला, तिच्या परिस्थितीची जाणीव झालेले वडील भेटायला येतात आणि संसाराचा त्याग करून देशकार्याला वाहून घेण्याचा सल्ला देतात.

तिचा बिथरलेला नवरा त्यांना विचारतो, “काय केलंत तुम्ही हे, ती संसार सोडून गेली, तर जग काय म्हणेल?’ त्यावर उल्काचे वडील, एका कैफात साऱ्या जगाला आणि त्यालाही ठणकावून सांगतात, ‘जग हेच म्हणेल, ती एका बंडखोर बापाची मुलगी आहे.’ शिरीष पै यांची आठवण! आज हे विधान सत्यात येणे गरजेचे आहे.

लोक काय म्हणतील? यांत तिकडे मुलीचे आयुष्य संपू शकते. ‘समाजाने रंगविलेल्या रंगात मी रंगणार नाही, तर समाजाला माझ्या रंगात रंगवीन.’ सोनल सोनकवडे हिचा जोश टॉकमधील व्हीडिओ. यूपीएससी उत्तीर्ण होईपर्यंत, साध्या सरळ घरात, अनेक बंधनात वाढलेली सोनल. आंतरप्रांतीय लग्न. तडजोड जमत नाही तशी वेगळी झाले. उच्च शिक्षित, उच्च पदावर (जॉइंट कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स) तरीही मी समाजात लोकांकडून ‘डिव्होर्सी’ या टॅगवर जगत होते. मी ओळखले, माझी इज्जत माझ्या विचारात आहे. मी गाण्याचा अल्बम काढला. त्याला फाळके अॅवॉर्ड मिळाले. माझी “कॉमा, सो व्हॉट” ही पुस्तके गाजली. समाजाची मेमरी शॉर्ट असते. हळूहळू माझी ‘डिव्होर्सी’ ही ओळख पुसली जाऊन गायिका, लेखिका, पदाधिकारी अशी झाली. त्या म्हणतात, “माणूस ओळखायला नाही, समजायला शिका.”

बालपणापासून लोकांचीच उदाहरणे देऊन कसे वागायचे, बोलायचे, पेहराव हे शिकतो, नव्हे ‘लोक काय म्हणतील’ या विचारावरच आपण जगत असतो. लोक… ही एक निरर्थक भीती! या भित्र्या मनोवृतीचेच बाळकडू पाजले जाते. याच वाक्याने आयुष्याची लढाई आपण लढतच नाही. त्याही पुढे, चांगला अभ्यास, सुरक्षित नोकरी, डोक्यावर कर्ज नको. याच मानसिकतेमध्ये मोठे होतो. स्वतः विचार न केल्यामुळे विकासाला मर्यादा येतात, प्रगतीला अडथळा येतो. अनेकांची स्वप्ने ‘लोक काय…’ या एकाच विचाराने अपूर्ण राहतात. तुम्ही स्वतःचे किती नुकसान करता ते शोधा. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

आपलं आयुष्य आपल्याला जगायचंय. लोक ना तुमच्या आनंदात, दुःखात, गरजेला असतात, तर त्यांचा विचार कशासाठी? लोकांना कुठे वेळ आहे तुमच्यांत गुंतण्यात? दुसरे असे धडपडल्याशिवाय, ठेच लागल्याशिवाय, उठून उभे राहिल्याशिवाय शहाणे कधी होणार? ‘लोक काय…’ या विचारात मनसोक्त जगणंच विसरून जातो. लक्षात ठेवा, ‘लोकांच्या म्हणण्यागोदर स्वतःला काय म्हणायचे? स्वतःला काय कारावंसं वाटतं? ते करा. यासाठी थोडं बेशरमं, बिनधास्त बना. स्वतंत्र माणूस म्हणून तुमचं अस्तित्व दाखवून द्या.

‘जोशी काय म्हणतील?’ या मराठी नाटकात, एका कुटुंबात प्रत्येक वाक्यावाक्याला शेजारच्या घरातील जोशींचा उल्लेख आहे. पण संपूर्ण नाटकात ‘जोशी’ हे पात्रच नाही. यातील जोशी म्हणजे कोणी व्यक्ती नसून समाज असा व्यापक अर्थ आहे. खरं पाहता आपण जगलो का मेलो? याचं त्यांना सोयरसुतकही नसते. मदत मागायला गेलात, तर गावभर होईल; परंतु डोक्यात लोकांचाच विचार असतो.

‘जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात तेच चौकट मोडतात.’ सारे संत, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, शिक्षण महर्षी, स्वातंत्रसेनानी या साऱ्यांनी सर्व धोके, लोकांचा विरोध, अमानुष छळ, निंदानालस्ती, अपरिमित भोगले, सोसले. जर ते निराश होऊन, मागे फिरले असते, तर आज पाहतो ती सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, क्रांती घडली नसती. आज त्यांचीच आपण पूजा करतो. त्यांनी तयार केलेल्या रस्त्यावरूनच चालत आहोत.

आजही युवक आव्हान स्वीकारत नवीन वाट तयार करीत आहेत. अॅसिड हल्ला पीडित भारतीय मॉडेल रेश्मा कुरेशी. अॅसिड हल्ल्यानंतर रेश्मा कुरेशीच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. काही काळ तिने अंधाऱ्या खोलीत स्वतःला बंद केले. कोण काय म्हणेल यापेक्षा स्वतःला जीवन सुंदरपणे जगण्याची इच्छा जागृत ठेवून तिने गहिरे मौनव्रत धारण केले. परिस्थितीशी झुंज देत २०१६ च्या न्यूयॉर्क फॅशनवीकमध्ये अर्चना कोचरसाठी रॅम्प वॉक करत मॉडेलिंगच्या क्षेत्रांत प्रवेश केला. आज ती अॅसिड पीडितांची आवाज बनली आहे.

‘लोक काय म्हणतील’ याप्रमाणेच ‘मित्र हसतील, आपली फजिती होईल’ या विचाराने गावाहून आलेली मुले, मराठी माध्यमातील मुले, अमराठी भाषिक लोकांशी बोलायला, मैत्री करायला, इतरही ठिकाणी मागे राहतात. पटकन पुढे होत नाहीत कारण स्वतःविषयी न्यूनगंड! इंग्रजी भाषा, राहणीमान, फॅशन, मोकळेपणा रक्तातच नसल्याने अंगी यायला वेळ लागतो इतकंच. तुमचे काम बोलते. तेव्हा पुढे व्हा, ओळखी वाढावा नि नवनवीन अनुभव घ्या. काळ बदलला आहे. कोण काय बोलतो यापेक्षा आज चाकोरीबाहेर काम करणाऱ्या, वेगळ्या वाटेने जाणाऱ्या मुलांचा शोध घ्या. कौतुक करा. लोकनिंदेकडे सहजपणे दुर्लक्ष करा. आज स्टार्ट अप, स्टार्ट आयडिया, स्टॅण्ड अप इंडिया या उपक्रमातून, अनेकांनी छोटेछोटे व्यवसाय सुरू केले.

शोभतं का या वयाला? हे एक विधान आपली मनातील इच्छा मारते. आयुष्य छोटं आहे. शारीरिक मर्यादा असतानाही, स्वतःच्या आनंदासाठी नाचा, खेळा, गाणं म्हणा! काळाच्या पुढचा एक दृष्टिकोन : ज्ञानेश पेंढारकर लिखित – सकाळी बापूराव पेंढारकरांचे निधन, त्याच संध्याकाळी आईने सांगितल्यानुसार त्याचा १६ वर्षांचा मुलगा भालचंद्र (अण्णा)पेंढारकर, हिराबाई बडोदेकरांचे गाणं ऐकायला येतो. हिराबाईने प्रेमाने अण्णांना आत नेलं. हिराबाईंचा पहिला षड्ज ऐकताक्षणीच अण्णाच्या डोळ्यांसमोर एक शुभ्र प्रकाश पसरला. अण्णा डोळे न मिटता ते त्या प्रकाशाला सामोरे गेले. घरी गेल्यावर ते आईला म्हणाले “मला गाणं शिकायचंय.” शेवटी लक्षात घ्या, “ज्या झाडाला फळं असतात, त्यालाच लोक दगड मारतात.”

-मृणालिनी कुलकर्णी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -