Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजstory : आईची शेवटची इच्छा (दोघी)

story : आईची शेवटची इच्छा (दोघी)

”वाटली डाळ” रेणू वाटी पुढे करीत म्हणाली. (Story)
“वा! सुरेख.” सुधाकर खूश होत म्हणाला. वाटली डाळ हा त्यांचा अत्यंत आवडता पदार्थ. वीणा वाटली डाळ घेऊन अर्धा तासापूर्वीच आली होती. पण सुधाकरने त्याबद्दल ‘ब्र’ही काढला नाही.
कारण मागे ‘सांजोऱ्या’वरून भगिनींमध्ये ‘तू तू मैं मैं’ खूपच गाजलं होतं. दोन बहिणींचा एकट्या सुधाकरावर डोळा होता. सुधाकरला दोघी आवडत होत्या. रेणू सुरेख दिसे नि वीणा सुंदर स्वयंपाक करी. त्यांच्या आईची मूक संमती होती.
दोघींनी एकाच माणसाशी लग्न करण्यावर?
“काय हरकत आहे?” ती म्हणे. पुढे म्हणत असे, “शिवाजीला आठ राण्या होत्या” बोलण्यात ठसका जाणवे.
“जमवलंच की नाही सवती-सवतींनी?” सारं समजून उमजून बोले.
“अहो पण आता द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे.” आगाऊ शेजारी वदत असत.
(शेजाऱ्यांना उद्योग काय हो?”)
“हे बघा. एक ऑफिशिअल आणि दुसरी अनऑफिशिअल.”
दोघींची आई म्हणे तिला स्पर्धा नको होती. एकीचा आवडता दुसरीचा जरा जास्तच लाडका! नकोच ते. नो स्पर्धा अॅट ऑल.
कुठल्याही लेकींना वाटे. तसंच त्यांना वाटे. “आई, तुझं कोण लाडकं? रेणू की वीणा?”
त्यावर आईचं दोघींना एकच उत्तर. तेही कवनात…
“काय सांगू बाई तुम्हा? माझ्या लेकी माझे डोळे,
त्यांच्या डोळ्यांनी पाहाते, नव्या जगाचे सोहोळे…”
आता डोळे म्हटल्यावर बोलतीच बंद होते नाही का प्रिय वाचकांनो. डावा – उजवा दोनो आँखोंसे ‘दुनियाका नजारा’ दिखता है ना? डावं उजवं काय त्यात?

आई हुश्शार होती. सवालही नही. वीणा-रेणू खूश होत्या. आपल्या आईचे आपण डोळे आहोत. आपल्यातून नवे जग ती बघते. वा! क्या बात है! आपली आई जिंदाबाद! असं दोघींना वाटे.
सुधाकर मात्र दचकला होता. बिचकला होता.
कुणाचं ऑफिशिअल? कोण अनऑफिशिअल?
रेणू की वीणा? वीणा की रेणू एकीचा कोप, दुसरीचा प्रकोप! बाप रे बाप. त्याचे डोके दुखू लागे.
स्पर्धा तीव्र होती. मग तो ऑफिसात डोके धरून बसे. ही का ती? ती का ही?
सरोज ही त्याची ऑफिसातली मैत्रीण होती.
सरोजचे लग्न झाले होते त्यामुळे स्पर्धेत ती नव्हती.
“काय झाले सुध्या?”
“काही नाही गं सरू.”
“तू उदास उदास दिसतोस.”
“दोघींचं भांडण, माझ्यावरून.”
“त्या उंडग्या… रिकामटेकड्या.”
“असं बोलू नये सरोज.”
“अरे जे आहे ते बोलायला काय हरकत आहे?”
“तरी पण नको. आपण त्यांना खायला प्यायला घालतो का?”
“तरी पण…”
“नको सरोज.”
सरोज अस्वस्थ झाली. घरी आली तरी तोच विषय काही तिची पाठ सोडत नव्हता. शेवटी नवऱ्याला म्हणाली, “हे बघ. दोघी बहिणींना ‘ह्योच नवरा’ एक्कच हवा असं झालं? तर तर रे?”
“दोघी बहिणींनी टॉस टाकावा?” त्याने सहज म्हटले.
“म्हंजे?” तिने न कळून विचारले.
“म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे. मनिमाऊचे पाय, नाकात दोन पाय. मला विचारतेस काय? मजकडे उत्तर नाय.”
“मग तसं सांग ना!”
“पण आयडिया इज नॉट बॅड.”
“छाप की काटा. हे आधी ठरवा म्हणावं.”
“हो तेही खरंच.” नवऱ्याच्या हुशारीचं बायकोला कौतुक वाटलं. तिनं सुधाकरला ती आयडियाची कल्पना सांगितली.
सुधाकर जामेजाम खूश झाला. दोघी बहिणींना शेजारी बसवून तो म्हणाला,
“मला तुम्ही दोघी आवडता.”
“ते मनोमन ठाऊक आहे आम्हास.”
“छाप की काटा करूया. छाप म्हणजे रेणू.
काटा म्हणजे वीणा.”
“ठीक आहे.” दोघींनी संमती दिली.
छाप की काटा दोघींसमोर करायचे ठरले.
“उरात धडधड
काळजात फडफड
दोघींना ‘ह्योच नवरा’
अशी उरी वडवड.”
पण झाले भलतेच. नाणे उभे पडले. छाप नाही काटा नाही. “आता? मी तिसरीच बघतो.” यावर सुधाकर खूश. दोघींजवळ उत्तर नव्हते.

-डॉ. विजया वाड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -