Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यराष्ट्रीय सेवा योजना व राज्यस्तरीय शिबीर

राष्ट्रीय सेवा योजना व राज्यस्तरीय शिबीर

प्रा. डॉ. योगेश पोहोकर

राज्यस्तरीय विशेष शिबीर व नियमित कार्यक्रम राज्य शासन, केंद्र शासन व विद्यापीठ यामधील दुवा म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध उपक्रम विद्यापीठांद्वारे किंवा महाविद्यालयांद्वारे प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन करीत असते. राज्य शासनातील विविध विभागांचे शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविणे व त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंत्रालयामध्ये एक राष्ट्रीय सेवा योजनेचे कक्ष स्थापन करण्यात येते. राज्यस्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रमांचे व विशेष शिबिरांचे आयोजन व नियोजन यासंबंधी निर्णय घेण्यासाठी मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठांमधील कुलगुरू आणि काही संबंधित विभागांचे सचिव असलेले राज्य सल्लागार समिती काम करीत असते.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनात राज्यस्तरावरील राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समिती विविध रचनात्मक व समाज उपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून जनसामान्यांना त्यांचे जीवन जगणे सुकर व्हावे याकरिता मदत करीत असते. सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, नेतृत्व गुण निर्माण व्हावे, जिज्ञासा निर्माण व्हावी, सेवाभाव निर्माण व्हावा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये संघटन वृत्ती निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये समता, बंधुता व एकता समृद्ध व्हावी याकरिता विविध विशेष शिबिरांचे राज्यस्तरावरून आयोजन करण्यात येते. त्यामध्ये आंतर जिल्हास्तरीय, अंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ, जिल्हास्तरीय युवा प्रत्यार्पण कार्यक्रम अशा विविध शिबिरांचे, कार्यशाळेचे, चर्चासत्राचे, परिषदेचे आयोजन करून युवकांना यथोचित मार्गदर्शन करण्यात येते. प्रेरणा नेतृत्व गुण विकास शिबीर, सहासी शिबीर, आव्हान शिबीर, आपत्ती व्यवस्थापन शिबीर, पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन प्रशिक्षण शिबीर, आयोजित करून तरुणांमध्ये अस्तित्वात असलेल्या व अकस्मात आलेल्या विविध नैसर्गिक व सामाजिक आपत्तींना, समस्यांना अडचणींना तोंड देण्यास सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा राज्यस्तरीय शिबिरामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये एकसंधतेची भावना, सामाजिक बांधिलकीची भावना, राष्ट्र प्रेमाची भावना, देश विकासाची भावना, बंधुभावाची भावना, एकमेकांप्रती स्नेहाची, आपुलकीची भावना निर्माण होते. अशा शिबिरामुळे जातीय सलोखा, धार्मिक आदर-सन्मान राखण्यास सुद्धा मदत होते.

राज्यस्तरीय शिबिरामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यांतील निवडक शिबिरार्थी सहभागी होत असल्यामुळे आणि ही राज्यस्तरीय शिबिरे तीन दिवस, सात दिवस किंवा दहा दिवसांसाठी निवासी आयोजित केली जात असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतील, धर्मातील, कुटुंबातील समुदायातील संप्रदायातील युवक एकत्रित येतात. त्यामुळे साहजिकच सहभागी शिबिरार्थी-विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात वैचारिक मंथन होते आणि या वैचारिक मंथनामधून समाजाला दिशा देणाऱ्या, सामाजिक समस्या सोडविणाऱ्या, देश विकासाला चालना देणाऱ्या नवनवीन कल्पनांची देवाण-घेवाण होते. आजचा तरुण हा तांत्रिक व यांत्रिक युगात वावरत असल्यामुळे त्याच्या अंगी कमालीची तंत्र व यंत्र हाताळण्याची क्षमता आहे. तरुणांमध्ये असणारे सळसळणारं रक्त, नवीन जोश, जोम, उत्साह, क्षमता, कल्पना, विचार याला दिशा व ध्येयधोरणे देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अशा राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामधून युवकाला समाजसेवेसाठी तयार केले जाते. त्याच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करून या राज्यासाठी, देशासाठी, लोकांसाठी पुढे येऊन कल्याणकारी कामे हाती घेण्यास त्याला प्रवृत्त केले जाते. कोणते आव्हान कधी समोर येईल सांगता येत नाही आणि म्हणून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी युवक हा नेहमी सज्ज व तत्पर असला पाहिजे याकरिता आव्हान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

देशाच्या सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक तैनात करण्यात येतात, ज्याप्रमाणे सैनिकांना विविध साहसी क्रीडा प्रशिक्षणामधून तयार केले जाते, ज्याप्रमाणे समाजामध्ये होणारी हिंसा, अत्याचार, अन्याय, दरोडेखोरी रोखण्यासाठी व समाजातील लोकांमध्ये सुसंगता राहावे, प्रत्येकाला चांगले जीवन जगता यावे, समाजात राहत असताना सर्वांना सुरक्षित वाटावे याकरिता पोलीस काम करीत असतात आणि हे काम करण्याकरिता तरुणांना विविध पोलीस प्रशिक्षण कसोटीमधून जावे लागते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना साहसी शिबिरामधून प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी तयार करण्यात येते. सीमेवरील सैनिक सीमेवर काम करतात, शत्रूंशी लढतात आणि या देशातील जनतेला सुरक्षित ठेवतात, पोलीस वस्तीत राहून लोकांना संरक्षण देण्याचे काम करते, तसेच स्वयंसेवकांनी सुद्धा सैनिकाप्रमाणे व पोलिसांप्रमाणे नेहमी डोळ्यांत अंजन टाकून समाजाअंतर्गत घडणाऱ्या छोट्या-मोठ्या हिंसक घटनांना, नैसर्गिक आपत्तींना, सामाजिक समस्यांना, कौटुंबिक भांडण- तंट्याना, आरोग्याच्या समस्यांना, सामाजिक एकता बंधुता आणि समता याला बाधक ठरणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी नेहमी तयार राहावे.

सामाजिक सलोखा, सामाजिक सुसंगता, माणसा- माणसांमध्ये समन्वय, कुटुंब-कुटुंबामध्ये प्रेम-आदर, गावा- गावामध्ये आस्था व आपुलकी, गाव आणि शहरांमध्ये स्नेहभाव, जाती-जातीमध्ये सद्भाव, धर्मा-धर्मामध्ये आदर-सन्मान राखण्यास व आहे त्यापेक्षा वृद्धिंगत होईल यासाठी मनापासून प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने प्रयत्न करणारा युवक निर्माण व्हावा यासाठी अशा नानाविध उपक्रमांचे, कार्यक्रमांचे, कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन राज्यस्तरावर केले जाते. या शिबिरामुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास तर होतोच सोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक समस्यांची जाणीव निर्माण होते, समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौशल्य निर्माण होते, हातात हात मिळून काम करण्याची जिद्द व चिकाटी निर्माण होते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, त्यांच्यामध्ये साहसी वृत्ती वाढीस लागते, शारीरिकदृष्ट्या त्यांना तंदुरुस्त व मजबूत ठेवण्यास मदत होते, त्यांच्यामध्ये कल्पनाशक्ती व वैचारिक पातळी वाढविण्यास मदत होते, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होते, प्रेरणादायी मार्गदर्शनातून व प्रेरणादायी कार्यक्रमांमधून त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते, मी समाजाला काही देणं लागतो ही भावना निर्माण होते.

शिबिरामधून तयार झालेला तरुण हा धाडसी वृत्तीने आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यास पुढे येतो. समाजसेवेचा ध्यास घेऊन राष्ट्र विकासाला हातभार लावण्यास शिबिरार्थी तरुण युवक मार्गक्रमण करण्यास धजावतो. अशा राज्यस्तरीय शिबिराच्या आयोजना मागचा उद्देश हा खूप उदात्त आहे. फक्त गरज आहे की या शिबिराची यथोचित अशा प्रकारची आखणी करून, त्याचे यशस्वी अशा प्रकारचे आयोजन करून प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने संवेदनशील होऊन काम करण्याची. समाजातील युवकाला संवेदनशील म्हणून समाजामध्ये असलेल्या गरजू लोकांना मदतीचा हात या युवकांच्या माध्यमातून कसा निर्माण होईल व युवक सामाजिक भान ठेवून आपलं जीवन कसं जगेल कशाप्रकारे समाजाची सेवा करेल यासाठी मनाेभावाने अत्यंत चोखपणे शिबिराच्या आयोजनकर्त्यांनी आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी संधी आहे ज्यामध्ये सहभागी घटकांनी तन-मन-धनाने व समर्पित भावनेने त्यागाची भूमिका ठेवून काम केले तर आपल्या समाजाला लोकांना जनसामान्यांना एक चांगले समृद्ध जीवन व संपन्न जीवन देण्यासाठी लाखमोलाची मदत होईल. ज्यांनी ज्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे घटक म्हणून पाईक म्हणून काम करण्याची इच्छा दर्शविलेली आहे किंवा जे काम करत आहे त्यांनी या संधीच सोनं करून आपल्या या समाजसेवेच्या व देशसेवेच्या कार्यात सहभागी होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करावा. राष्ट्रीय सेवा योजना हा एक जीवन जगण्याचा उत्तम असा मार्ग आहे. या जीवनोपयोगी मार्गाचा अवलंब करून आपण आपलं जीवन सार्थकी करू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -