Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखविरोधकांवर पुन्हा मोदीच भारी!

विरोधकांवर पुन्हा मोदीच भारी!

अठराव्या लोकसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे संख्याबळ पाहताना, दोन्ही बाजूंकडून जनतेचा आवाज दुमदुमेल, असा कौल मिळाला आहे; परंतु गेल्या दहा वर्षांत जनतेने लाथाडलेल्या विरोधी पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत थोडं फार यश मिळाले. त्याचा गवगवा करत, जणू काही आपणच सत्तेवर आलो आहोत, या आविर्भावात विरोधी पक्षाचे नेते सध्या वावरत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तिसऱ्यांदा जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल असतानाही, काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते आज ना उद्या आपण सत्तेवर येणार, या आशेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांना पुरून उरले आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सुमारे दोन तास भाषण केले.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी उत्तर दिले. त्यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली; परंतु विरोधकांनी सभात्याग केला. यावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे. सभागृहातून बाहेर पडणे, हे त्यांचे भाग्य आहे. खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत. या लोकांना सत्य पचवता येत नाही. यामुळे ते सभागृह सोडून, पळून जात आहेत. मी माझ्या कर्तव्याशी संलग्न आहे. मला प्रत्येक क्षणाचा हिशोब देशवासीयांना द्यायचा आहे, असे सभागृहात सांगून, पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत बोलताना, एका महत्त्वाच्या विषयाकडे देशातील समस्त हिंदूंचे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून हिंदू हे हिंसक असल्याचे धादांत खोटे सांगितले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. ज्या पद्धतीने हिंदू धर्माचे चित्र मांडले, ते पाहता याचा हिंदू बांधवांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. हिंदू धर्माविरोधात सातत्याने केला जाणारा अपप्रचार हा एका रणनीतीचा भाग आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. काँग्रेसच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी सनातन धर्माविरोधात या आधी जी अवमानकारक वक्तव्ये केली होती, ती नेमक्या कोणत्या विचारधारेतून आली, हे राहुल गांधी यांच्या भाषणातून उघड झाले आहे, हे सांगायला पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. राहुल गांधी यांच्या भाषणातील नेमका मुद्दा हेरून, पंतप्रधान मोदी यांनी त्यावरच ठेवलेले बोट अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर कधीही हिंदू-मुस्लीम असा भेदाभेद केलेला नाही. तथापि मंगळवारी संसदेत बोलताना, त्यांनी पहिल्यांदाच देशातील हिंदूंना विचार करण्याचे आवाहन केले. यातूनच काँग्रेसी षडयंत्र किती गंभीर आहे, याची कल्पना देशवासीयांना येऊ शकते.

राहुल गांधी यांनी हिंदूंचे संस्कार काढत, त्यांच्यावर हिंसक असल्याचा खोटा आरोप केला आहे. हे देश कधीच विसरणार नाही, त्यामुळे काँग्रेसच्या या खोट्या आरोपांना गांभीर्याने घ्यायला हवे. त्यांचा हेतू योग्य नाही. ‘बालबुद्धी’ म्हणून किती दिवस सोडून देणार? यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. लोकसभेत मोदी यांचे भाषण सुरू असताना, विरोधकांकडून ‘मणिपूर, मणिपूर’ अशा घोषणा देत, त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात होता. बुधवारी राज्यसभेत बोलताना मोदी यांनी मणिपूर प्रकरणी केंद्र सरकार कठोर पावले उचलत असल्याची माहिती दिली; परंतु विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग करून, केवळ मोदी यांनाच फक्त आपला विरोध असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ‘एक अकेला सब पर भारी’ या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही सभागृहांतील भाषणाचा परामर्ष घेतला, तर दिसून येईल.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षांकडून होत असणारी अपमानजनक वक्तव्ये पाहता, हा योगायोग आहे की, नव्या प्रयोगाची तयारी याचा हिंदू समाजाला आता विचार करावा लागणार आहे. धर्माच्या आधारावर काँग्रेसने देशाची या पूर्वीच फाळणी करून झाली आहे. आता जातींच्या आधारावर, प्रादेशिक आधारावर फूट पाडण्याचे मनसुबेही नरेंद्र मोदी यांनी उघडे पाडल्यामुळे, त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. संविधान धोक्यात आहे, आरक्षण संपविणार असा खोटा प्रचार काँग्रेसने केला, तरीदेखील त्याच लोकशाही प्रणालीतून पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएला सत्ता जनतेने दिल्याने, विरोधकांना आता यापुढे काय खोटं बोलणार, हा प्रश्न पडला आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला देश बळी पडला नाही, हेही मोदी यांनी ठळकपणे सांगितले. येत्या पाच वर्षांत काँग्रेस किती खालच्या पातळीला जाईल, याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले असले, तरी पंतप्रधान मोदी यांनी त्याला सडेतोड उत्तर देत, काँग्रेसी मानसिकतेचा उघडा चेहरा लोकांसमोर आणला आहे. संसदेतील मोदी यांचे भाषण हे सर्वसामान्य जनतेला विचार करायला लावणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -