सात दिवस चालवणार शांतता रॅली
हिंगोली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून शांतता रॅलीला (Shantata Rally) सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून त्यांनी आजपासून पुढील सात दिवसांची मुदत सरकारला दिलेली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास हिंगोली येथून शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे. सात दिवस ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार आहे.
हिंगोलीकरांनी केले जरांगेंचे जंगी स्वागत
आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवालीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने ३० फुटांच्या फुलाच्या हाराने मनोज जरांगेंचे जंगी स्वागत केले. त्यानंतर सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या परिसरात छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला सुरुवात केली. आज दुपारी ३ वाजता मनोज जरांगे यांच्या भाषणाने शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.
असा असेल मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – पोस्ट ऑफिस रोड – आखरे मेडिकल – खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील) – महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करतील) – पुढे इंदिरा गांधी चौक (जरांगे यांचे समारोपीय भाषण) असा असेल मनोज जरांगे यांच्या रॅलीचा मार्ग.
१३ जुलैपर्यंत चालणार रॅली
मनोज जरांगेंची शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात आजपासून सुरु झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज सहभागी असल्याचे दिसून येत आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत सात दिवसांची म्हणजेच १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे विधानसभेत २८८ उमेदवार उभे करायचे की पाडायचे? हे १३ तारखेनंतर ठरवणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले.
शिंदे समिती करणार हैदराबादचा दौरा
८ जुलै रोजी शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे जमा करणार आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यावर एकूण आठजण सहभागी असणार आहेत. मराठा कुणबी – कुणबी मराठा या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळे हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जमा करण्यासाठी शिंदे समिती हा दौरा घेणार आहे.