विधानसभेच्या तोंडावरही ठाकरे गटाची गळती संपेना
नवी मुंबई : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून आता दोन वर्षे पूर्ण झाली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तमोत्तम विकासकामे करत आहे. म्हणूनच अजूनही ठाकरे गटातील (Thackeray group) नेत्यांचा ओढा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. फूट पडल्यापासून ठाकरे गटाला जी गळती लागली आहे ती अद्याप थांबायचे नाव घेत नाही. अनेक बडे बडे नेते, कट्टर समर्थक यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना साथ दिली. लोकसभेत ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या, मात्र अजूनही शिंदेंकडे येणारा ओघ कमी झालेला नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऐरोलीतील ठाकरेंचे कट्टर समर्थक असणारे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे शिंदेंची शिवसेना आणखी बळकट होत चालली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मनोज हळदणकर यांची ऐरोतील चांगली ताकद आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, अचानक हळणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरित झालो आहे. आगामी काळात ऐरोलीत चांगल्या विकासकामांची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया मनोज हळदणकर यांनी दिली आहे.