Monday, July 22, 2024

दृष्टांतमाला

तत्त्वज्ञान, काव्य या साऱ्यांचा कळसच झालेला आपल्याला यात अनुभवास येतो. भक्ताची साधना सुरू होते. ती करता करता एक वेळ अशी येते की, तो शेवटच्या टप्प्याला पोहोचतो. तिथे तो भक्त एक आणि देव दुसरा असे वेगळेपण उरत नाही. तो त्या तत्त्वाशी, परमेश्वराशी एक होऊन जातो. या अवस्थेचं वर्णन माऊलींनी केले आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

अठरावा अध्याय म्हणजे ‘कळसाध्याय’ होय. खरंच नावाप्रमाणे हा अध्याय आहे. तत्त्वज्ञान, काव्य या साऱ्यांचा कळसच झालेला आपल्याला यात अनुभवास येतो. आज पाहूया या अध्यायातील अशाच अलौकिक ओव्या!

भक्ताची साधना सुरू होते. ती करता करता एक वेळ अशी येते की, तो शेवटच्या टप्प्याला पोहोचतो. तिथे मग तो भक्त एक आणि देव दुसरा असे वेगळेपण उरत नाही. तो त्या तत्त्वाशी, परमेश्वराशी एक होऊन जातो. या अवस्थेचं वर्णन करताना माऊलींच्या काव्याला बहर येतो. काय म्हणतात ते? ऐकूया तर…

‘स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन, मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता देणारा आणि आलिंगन देण्याची वस्तू दोन्ही नसून एकटाच पुरुष जसा असतो…’ ओवी क्र. ११५८

‘अथवा दोन लाकडांच्या घर्षणाने जो अग्नी उत्पन्न होतो, तो दोन्ही लाकडांना जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो.’ ओवी क्र. ११५९

‘तेथ स्वप्नींचिया प्रिया। चेवोनि झोंबों गेलिया।
ठायिजे दोन्ही न होनियां। आपणचि जैसें॥ (११५८)
‘चेवोनि’ शब्दाचा अर्थ आहे प्रेमाने, तर ‘झोंबो गेलिया’चा अर्थ आलिंगन देऊ गेले असता…
ज्ञानदेवांनी दिलेल्या या दोन्ही दृष्टांतात किती अर्थ आहे! किती सौंदर्य आहे!

स्वप्नातील स्त्रीला प्रेमाने आलिंगन देणारा पुरुष हा दाखला खास वाटतो. स्वतः ब्रह्मचारी असणारे ज्ञानदेव जनसामान्यांचं मन नेमकं ओळखतात म्हणून त्यांना जवळचा वाटणारा हा दृष्टांत घेतात. प्रेम ही भावना माणसासाठी खूप महत्त्वाची, मूलभूत आहे. त्यात स्त्री-पुरुष प्रेम तर खासच गोष्ट. या दृष्टांतातून सुचवू काय पाहतात ज्ञानेश्वर? तर भक्त आणि परमेश्वर यांच्यातील प्रेम! भक्ताला लागलेली परमेश्वराची ओढ किती? तर स्त्री-पुरुष प्रेमाप्रमाणे उत्कट! पुन्हा त्यात काय मांडलं आहे? स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला प्रत्यक्षात आलिंगन देऊ पाहणारा पुरुष! मग त्याला जाणीव होणं की, स्वप्नातील स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आपणच आहोत. त्याप्रमाणे भक्त आणि परमेश्वर यांच्यात घडतं. भक्त देवाला शोधत असतो, नंतर त्याला जाणवतं, देव त्याच्या मध्येच आहे.

पुढील दृष्टांत लाकडाच्या घर्षणातून उत्पन्न होणाऱ्या अग्नीचा आहे. लाकूड घासलं जाणं, या क्रियेतून या प्रवासातील साधना, कष्ट सुचवले आहेत. पुढे ती दोन्ही लाकडं नाहीशी होणं, फक्त अग्नी राहणं यात खोल अर्थ आहे. भक्ताच्या मनातील वासना, विकार जळून जाणं, त्याच्या ठिकाणी अग्नीप्रमाणे प्रखर तेज येणं या साधनेमुळे!

गीतेतील तत्त्वज्ञान उलगडून दाखवताना, ज्ञानदेव दाखल्यांची अशी सुंदर माला सादर करतात! ते समजून घेताना जाणीव होते, त्यांच्या काव्यप्रतिभेची! अशावेळी आपल्या अंतरी आठवण होते, त्या वचनाची ‘जे न देखे रवी ते देखे कवी.’ ज्ञानदेव असे कवी आहेत की, आज सातशे पंचवीस वर्षांनंतरही त्यांची दृष्टांतमाला तेवढीच ताजी आणि
ताकदीची वाटते!!

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -