Wednesday, July 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबिहारमध्ये संयुक्त जनता दलातील बंड चर्चेत

बिहारमध्ये संयुक्त जनता दलातील बंड चर्चेत

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाचे सरकार सत्तेवर आहे. भाजपला आव्हान देण्याची भाषा दोन्ही जनता दल करत आहेत. आपले उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव नितीशकुमार यांनी जाहीर केल्यापासून संयुक्त जनता दलात असंतोष वाढत आहे. त्यामुळे पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी बंड पुकारले. हे बंड बिहारमध्ये चांगलेच तरंग उमटवत आहे.

बिहारच्या राजकारणात नितीशकुमार सातत्याने युती एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. संयुक्त जनता दलाचे संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आघाडी उघडली आहे. बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलात सुरू असलेली भांडणे चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कुशवाह यांना सडेतोड उत्तर दिले आहे. एखाद्याला अन्य पक्षात बढती मिळत असेल, तर जरूर पक्षाबाहेर जावे. कुशवाह यांनी आपल्या ताज्या आरोपात म्हटले आहे की, महाआघाडीच्या वेळी संयुक्त जनता दल तसेच राष्ट्रीय जनता दलात करार झाला होता. हा करार कोणी केला आणि तो काय होता, याबद्दल पक्षाच्या बड्या नेत्यांनी सांगितले पाहिजे. संयुक्त जनता दलात माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. वास्तविक, हे षडयंत्र मी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात आहे असे मानतो, कारण मी नेहमीच संकटकाळात नितीशकुमार यांच्यासोबत उभा असतो.’ आपल्या पक्षातील बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोपही कुशवाह यांनी केला आहे. कुशवाह यांच्यावर अलीकडेच हल्ला झाला. त्यानंतर संयुक्त जनता दलातील बंडाची चर्चा सुरू झाली. कुशवाह स्वतःला हनुमान आणि नितीशकुमार यांना राम म्हणत होते. पण बिभिषणकडेही बोट दाखवत होते. नितीशकुमार यांनी मात्र आपल्याच पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्षाला महत्त्व दिले नाही. कुशवाह यांच्या आरोपांवर पत्रकारांनी नितीशकुमार यांना प्रश्नही विचारले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की कुशवाह जे म्हणतात, त्याला काही अर्थ नाही. त्यांच्या विधानांवर पक्षाचा कोणताही नेता मतप्रदर्शन करणार नाही. या घडामोडींनी बिहारच्या राजकारणामध्ये मात्र तरंग उमटवले.

नितिशकुमार यांच्यानंतर संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी कुशवाह यांच्यावर हल्लाबोल केला. लालन सिंह म्हणाले की, आमच्या पक्षाचा एकच नेता भाजपच्या संपर्कात आहे आणि आता त्याची ओळख पटली आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी स्वतः नितीशकुमार यांनी याबाबत सांगितले होते. पण या वेळी नितीशकुमारदेखील कुशवाह यांच्यावर नाराज दिसत आहेत. अर्थात कुशवाह यांची नाराजी कशापासून सुरू झाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसे केल्यास बिहारमधल्या राजकारणातही ताजे तरंग लक्षात येतील. बिहारच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी नेता म्हणून कुशवाह यांच्याकडे पाहिले जाते. डिसेंबरमध्ये कुडाणी विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांची महाआघाडीचे भावी नेते म्हणून वर्णन केले होते. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहार सरकारमध्ये संयुक्त जनता दलाचा मित्रपक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते, युतीतील तेजस्वीच्या वाढत्या महत्त्वामुळे कुशवाह त्रस्त आहेत. बिहारच्या राजकारणात तेजस्वी बिहार सोडून नितीशकुमार केंद्रीय राजकारणाकडे वळू शकतात. या अानुषंगाने त्यांच्या विधानाकडे पाहिले गेले. बिहारची सत्ता तेजस्वीकडे देण्याबाबतच्या नितीश यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाच्या अनेक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला, असे जाणकारांचे मत आहे. त्यात कुशवाह हे आघाडीवर असू शकतात. तेव्हापासून कुशवाह सातत्याने पक्षविरोधी विधाने करत आहेत. त्यामुळे महाआघाडीसाठी विचित्र स्थिती निर्माण होत आहे. कुशवाह म्हणाले की, नितीशकुमार यांच्यावर वारंवार शाब्दिक हल्ले होत असताना आपण पुढे येऊन त्यांचा बचाव करत असतो. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुधाकर सिंह यांनी नितीशकुमार यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह शब्द वापरल्याचाही आक्षेप कुशवाह यांनी घेतला. या आधी राष्ट्रीय जनता दल किंवा संयुक्त जनता दल कुशवाह यांच्या विधानांना फारसे महत्त्व देत नव्हते. तेजस्वी यादव यांनी, तर ‘भाजपची भाषा’ म्हणत सुधाकर सिंह यांचे वक्तव्य खोडून काढले होते. त्यांच्या नाराजीच्या सुरुवातीची ही कहाणी आहे. ही नाराजी दूर झाली नव्हती, तोच नितीशकुमार यांच्या दुसऱ्या विधानाने कुशवाह आणखी संतप्त झाले. बिहार सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. त्यात कुशवाह यांना दुसरे उपमुख्यमंत्री व्हायचे आहे; परंतु नितीशकुमार यांनी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्याशिवाय दुसरा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे सांगितले. नितीशकुमार यांच्याकडून कुशवाह यांना हा थेट संकेत होता. मंत्रिमंडळ विस्तारात कुशवाह हे दुसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशा बातम्या त्यांच्या गटानेच पेरल्या असाव्यात, असा अंदाज आहे.

नितीशकुमार यांनी उपमुख्यमंत्री करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने कुशवाह यांच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला. कुशवाह हे केंद्रातील मोदी सरकारच्या मागील कार्यकाळातही मंत्री राहिले आहेत. नितीशकुमार यांनी अशा प्रकारे दूर करण्याला कुशवाह यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. कुशवाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान बिहार भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार प्रेमरंजन पटेल यांनी त्यांची भेट घेतली. कुशवाह यांची भाजपशी असलेली जवळीक नितीशकुमार यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते नीरजकुमार सांगतात की पक्षाने त्यांना पूर्ण आदर दिला आहे; परंतु ते ज्या पद्धतीने बोलतात, त्यावरून त्यांचा अजेंडा स्पष्ट दिसत आहे. कुशवाह यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीबाबत सांगितले की, हे प्रकरण प्रमाणाबाहेर ताणले जात आहे. माझी तब्येत बिघडली होती आणि कोणी माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आले तर त्यात वावगे काय? एम्समध्ये भाजप नेत्यांना भेटणे ही एक सामान्य बाब असू शकते आणि काही वेळा अशा बैठका संबंधित नेत्याची पोहोच सूचित करतात. कुशवाह यांच्या राजकीय जीवनाकडे पाहिले असता ते किती वेळा वेगळ्या पक्षात गेले, याची मोजदाद करणे कठीण पडू शकते.

कुशवाह इतर पक्षात गेल्याने काही फरक पडत नाही. त्यांना संयुक्त जनता दलात समाविष्ट करून नितीशकुमार यांनी मोठेपणा दाखवल्याचे संयुक्त जनता दलाचे नेते सांगतात. कुशवाह यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. ते ना लोकसभेत आहेत, ना विधानसभेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर कुशवाह यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोक समता पक्ष संयुक्त जनता दलात विलीन केला. संयुक्त जनता दलात प्रवेश करताच त्यांना संयुक्त जनता दलाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले. नंतर त्यांना बिहार विधान परिषदेचे सदस्यही करण्यात आले. बिहार विधानसभेच्या २०२० च्या निवडणूक निकालांमध्ये २०१५ च्या तुलनेत नितीश यांचा पक्षच कमकुवत झाला होता. प्रत्येक वर्गाचा, समाजाचा आपल्या पक्षाला पाठिंबा असावा, या हेतूने नितीशकुमार यांनी कुशवाह यांना संयुक्त जनता दलात सामील करून घेतले. पण त्यासाठी कुशवाह यांना आपला पक्ष संपवावा लागला. महाआघाडीला बिहारच्या सत्तेत येऊन सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत, तोच आघाडीचे भागीदार नेते आणि पक्षांमधील वक्तव्ये राज्यात आणखी एका राजकीय उलथापालथीचे संकेत देत आहेत. २००० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाशी स्पर्धा करण्यासाठी लोक समता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं विलीनीकरण करण्यात आलं. या विलीनीकरणानंतर संयुक्त जनता दल बिहार विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला.

२००३ मध्ये संयुक्त जनता दलाने कुशवाह यांना बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवले होते. लालूप्रसादांच्या ‘एम-वाय’ समीकरणाविरुद्ध ‘लव-कुश’ समीकरण तयार करण्याचा त्यांचा हेतू होता. यामध्ये कुर्मी, कोईरी, कुशवाह अशा सर्व जातींचा समावेश होता. संयुक्त जनता दलात केवळ नितीशकुमार यांनाच प्रमुख नेते मानले जात असून त्यांनी कुशवाह यांना ही संधी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुशवाह बिहारमधील विरोधी महाआघाडीत सामील झाले. इथे त्यांचा अंदाज फोल ठरला.

या निवडणुकांमध्ये युतीमध्ये त्यांच्या पक्षाला पाच जागा लढवायला मिळाल्या. त्यापैकी कुशवाह यांनी स्वतः दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली; परंतु दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर कुशवाह यांनीही महाआघाडी सोडली. बिहारमधील २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कुशवाह यांनी मायावतींच्या बसप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एआयएमआयएम’ सारख्या पक्षांसोबत युती केली. या निवडणुकीत कुशवाह यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते. मात्र त्यांच्या पक्षाला निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. बिहारच्या राजकारणात कुशवाह यांच्या मागे फार मोठे बळ राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्या-येण्याने फारसा फरक पडणार नाही. मात्र ताज्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी केलेली विधाने बोलकी ठरली.

– शिवशरण यादव

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -