मराठी नाटकाला श्रीमंतीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे निर्माते म्हणून सुधीर भट यांचे नाट्यसृष्टीत वजन होते. तडजोड करून नाट्यनिर्मिती करणे त्यांना मान्य नव्हते. ती त्यांची अट होती. आचार्य अत्रे यांची बरीचशी नाटके व्यावसायिक रंगमंचावर आणल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा लोकनाटकाच्या दिशेने वळवला होता. तगडे कलाकार घेतले, तर लोकनाट्य प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ज्या लोकनाट्याची निर्मिती केली. त्यात त्यांनी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि अभिनेता भाऊ कदम यांना घेतले होते. कितीतरी दिवस त्यांनी तालीमही केली. प्रयोगाच्या तारखा ठरल्या. भट यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकनाट्य काय आहे, याची माहिती दिली. मुक्त संवाद, सोबतीला नृत्याचा साज असे काहीसे त्यांचे स्वरूप होते. पण हे लोकनाट्य रंगमंचावर काही आले नाही. हे आता आठवण्याचे कारण म्हणजे संदेश भट हा त्यांचा चिरंजीव त्यांनी आपल्या सुयोगच्या वतीने ‘येतोय तो खातोय’ हे लोकनाट्य व्यावसायिक रंगमंचावर आणलेले आहे. केली जाणारी जाहिरात मुक्त संवाद, लोकसंगीत आणि लोकनृत्य त्याला प्राधान्य देणारी आहे, असे वाटते. संतोष पवार, स्वतः लोकनाट्याचा दिग्दर्शक हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले, स्वप्नील राजशेखर हे कलाकार मंडळी या लोकनाट्यात आहेत. वडिलांकडून राहून गेलेली गोष्ट मुलगा नव्या निर्मितीत पूर्ण करतो आहे, हे विशेष. म्हणावे लागेल.
जागर अस्सल लोककलेचा
गायिका, संगीतकार, संगीत प्रशिक्षिका म्हणून वर्षा भावे यांचे नाव परिचयाचे आहे. संगीत नाटकाला बहुआयामी रूप देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या ‘कलांगण’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे निमित्त घेऊन त्यांनी मुंबईत अस्सल लोककलेचा जागर सादर केला होता. ‘लोककथा, लोकगाथा’ असे या अभिनव कार्यक्रमाचे नाव होते. खाद्य, गृह उपयोगी वस्तूंची विक्री आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखणा आविष्कार असा दिवसभराचा कार्यक्रम होता. त्यांच्या या उपक्रमात स्वरालय, मनमोहिनी क्रिएशन या संस्था सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भावे यांनी यावेळी संगीत दिग्दर्शनाबरोबर संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन अशी अन्य तिहेरी बाजू सुद्धा सांभाळली होती. निमित्त होते नव्या-जुन्या, बाल-युवा कलाकारांबरोबर महाराष्ट्रातील परंपरेने आलेले लोककला रंगमंचावर सादर करणे. त्यासाठी कोकणातल्या अंतर्गत छोट्या खेड्यांतून आणि आदिवासी पाड्यांतून ५० लोककलाकारांना मुंबईत निमंत्रित केले होते. भव्यदिव्य रंगमंच, अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा, डोळे दीपवून टाकणारी प्रकाशयोजना सारे काही या कलाकारांसाठी अद्भुत आणि प्रेरणा देणारे होते. डॉ. निधी पटवर्धन यांचे सूत्रसंचालन म्हणजे बोलीभाषेचे सुरेख दर्शन असेच म्हणावे लागेल. कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी कमलेश भडकमकर, पूर्वी भावे, गणेश आंबेकर, मंदार वैद्य यांचेही अनमोल सहकार्य लाभले.
बच्चे मंडळींचे अहवाल वाचन
परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या प्रायमरी विभागाचे नुकतेच वार्षिक संमेलन झाले. गाजलेल्या मराठी गाण्यांवर लोकसंस्कृतीचे दर्शन प्रायमरीच्या बालकलाकारांनी घडवले होते. समग्र महाराष्ट्र दर्शन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. या संपूर्ण कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी भारावून जातील, अशा दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांच्याच गीतांवर नृत्य सादर करून त्यांना स्वरांजली वाहिली होती. डोक्याच्या मधोमध भांग, दोन लांबसडक केसांच्या वेण्या, साधी पण मोठ्या काठाची साडी हे लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. योगायोग म्हणजे स्वरांजली कोळपे नावाच्या एका बालकलावंताने लतादीदींचा हा पेहराव केला होता. तिचे दिसणे म्हणजे प्रती बाल लतादीदी असल्याचे जाणवत होते. कोणतीही वार्षिक बैठक म्हटली की, त्यात अहवाल वाचणे हे आलेच. मग संस्थेचा कोणीतरी पदाधिकारी त्याचे वाचन करतो. तसा हा अनुभव आपल्याला नवीन नाही. पण सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक वातावरणात तोही रंगभूषा, वेशभूषासह अहवाल कोणी सादर जाणार असेल, तर ही गोष्ट आमच्या वाचक वर्गासाठी थोडी अजब वाटेल. रवींद्र गावकर, भक्ती जोगल, नंदा ढेकळे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यश पोळ आणि पूर्वा खतकर या लहान विद्यार्थ्यांनी हातात कागद न घेता, अचूक, क्रमवार, आत्मविश्वासाने अहवाल सादर केला होता. हा अभिनव प्रयोगच म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांमध्ये जोश आणि पालकांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी वैशाली कुमामेकर यांचे निवेदन झक्कासच झाले.
-नंदकुमार पाटील