Friday, April 26, 2024
Homeसाप्ताहिककोलाजGudhi Padwa : नवचैतन्याचा सोहळा गुढीपाडवा

Gudhi Padwa : नवचैतन्याचा सोहळा गुढीपाडवा

  • विशेष : लता गुठे

भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस, आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. चैत्र महिना हा सर्व महिन्यात श्रेष्ठ समजला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.

हिंदू धर्मातील सर्व सण-उत्सव हे आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे आपल्याला कळायला लागल्यापासून आपल्याही जीवनाचा ते एक भाग झालेले असतात. घरामध्ये थोरामोठ्यांकडून जे सण-उत्सव कसे साजरे करायचे याचे संस्कार कळत-नकळत मुलांमध्ये रुजले जातात आणि त्याचं मुलं पालन करून हा संस्कृतीचा ठेवा पुढे घेऊन जातात. माझ्या लहानपणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरदार, अंगण स्वच्छ करून अंगणात सडा टाकून त्यावर रांगोळी घातली जायची. दाराला फुलांचे तोरण नंतर लावायचं. अंगण सुशोभित झालं की, नंतर घरातल्या देवाची पूजा असायची. गुढीसाठी साखरेची गाठी, लिंबाच्या पानांचा ढगळा आणि हार आणला जायचा. नारळ, अगरबत्ती, दिवा, फुलं एका ताटात सजली जायची. नंतर जिथे गुढी उभारायची. त्या जागेवर पाणी शिंपडून एक छोटीशी रांगोळी मी काढायचे. तोवर आजी तिच्या पेटीतून लाल रंगाचा रेशमी पितांबर काढायची. त्या घडीवर हात फिरवताना खूप छान वाटायचं. एक एरंडाची उंच काठी आणून त्यावर पितांबर लावून वरती साखरेची गाठी, लिंबाच्या पानांचा ढगळा असे एकत्र बांधून वरून तांब्याचा तांब्या ठेवून ती गुढी चौकामध्ये रांजणाच्या बाजूला तुळशी वृंदावन असायचं तिथे पाटावर उभी केली जात असे. गुढी पाटावर उभी राहिली की उंच माना करून गुढीकडे पाहून गुढीला नमस्कार करून झाला की मग आम्ही मुलं घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करायचो. गुढीची पूजा झाली की, गूळ व निंबाचा तौव एकत्र करून त्याचा प्रसाद गुढीच्या समोर ठेवला जायचा. मग तो थोडा थोडा आमच्या हातावर देऊन आजी म्हणायची, “खा बरं पटकन. तो खाल्ला की कडू तोंड व्हायचं म्हणून आम्ही त्याकडे फक्त पाहत राहायचो.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आमचे गुरुजी गुढीपाडव्याचे महत्त्व सांगायचे. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस, आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते”. गुरुजी सांगत असतानाच कोणीतरी मध्येच विचारायचं, गुढी का उभारायची?

“थांबा थांबा सांगतो,” असं म्हणून गुरुजी सांगायला सुरुवात करायचे, “चैत्र महिना हा सर्व महिन्यात श्रेष्ठ समजला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. चैत्र महिन्यामध्ये झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. झाडं फुलांनी डवरलेली असतात. सर्व वातावरणामध्ये फुलांचा सुगंधी दरवळ पसरलेला असतो. त्यामुळे बाहेरच्या वातावरणामुळे मनही प्रसन्न होते. हा मराठी वर्षातला पहिला महिना आणि या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते. त्यामुळे सारी सृष्टी विलोभनीय दिसते. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात आपल्या या वर्षाची सुरुवात होते. घरांवर गुढ्या उभारून, तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो. वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात.” समजलं का मुलांनो? असं म्हणून आमच्या सर्वांकडे गुरूजी पाहायचे. आम्ही सर्व माना डोलावून होकार कळवायचो.

परंतु मनातले प्रश्न संपलेले नसायचे. गुढी थोडी ना देव आहे? मग तिची पूजा का करायची? असे विचारल्यानंतर, समोरून उत्तर यायचं, नवीन वर्ष आपल्याला सुखाचे, समाधानाचे, उत्तम आरोग्याचे जाण्यासाठी गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी जणू काही सांगत असते, नवीन वर्ष सुरू झालंय. नवा विचार करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. सदैव तुमची प्रगती होऊ दे. जणू काही निसर्गदेवताच आपल्याला अशा शुभेच्छा देते आहे असे वाटते. गुढी हे मांगल्याचे प्रतीक आहे म्हणून गुढीची पूजा करावी.”

हो, हे सर्व खरं आहे पण त्यादिवशी आजी कडुलिंबाचा पाला आणि गूळ खायला देते ते मात्र मला आवडत नाही. असं मी सहज बोलून जायचे. गुरुजी खळखळून हसत मला जवळ बोलवायचे आणि अंगावरून हात फिरवून म्हणायचे, “गुढी पाडव्याला कडुलिंबाची पाने गुळासोबत चावल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. गुढी पाडव्यापासून कडक उन्हाळा लागतो. या काळामध्ये वाढत्या उष्णतेचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये त्वचारोगाचे प्रमाण अधिक असते. खाज सुटते. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी अांघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकली जातात. ही पाने रक्तशुद्धीकरणासाठी मदत करतात. वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने गुळासोबत औषध समजून खावीत. निरोगी राहण्यासाठी पूर्वांपार आपल्या पूर्वजांनी असे नैसर्गिक उपाय शोधून काढले आहेत, ते किती छान आहेत नाही!

हो गुरुजी, आता मी नक्की गूळ आणि निंबाची पाने चावून खाईन. असे छातीठोकपणे सांगत असे; परंतु पाने चावताना तोंड मात्र खूप वाकडं व्हायचं हेही अजूनही आठवतं.

५ वाजता गुढी उतरवण्याची घाई व्हायची. गुढी उतरवली की साखरेची गाठी आम्ही सर्व मुलं वाटून घ्यायचो. हाही आमच्यासाठी एक आनंदाचा सोहळाच असायचा. पुढे हळूहळू पुस्तक वाचून गुढीपाडव्याच्या मागच्या कथाही समजायला लागल्या. आपल्या अनेक सणांच्या पाठीमागे पुराणकथा खूप छान सांगितल्या जातात आणि याचा संबंध रामायण-महाभारताशी जोडला जातो. गुढीपाडव्यासंबंधी एक कथा सांगितले जाते ती अशी –

जेव्हा प्रभू श्रीरामांना चौदा वर्षे वनवासात जावे लागले, त्या काळामध्ये त्यांच्या विरहाने प्रजा व्याकुळ झाली होती. ज्या दिवशी ते परत येणार समजल्याबरोबर प्रजेत आनंदाचे उधाण आले. त्या दिवशी समस्त प्रजेने दारामध्ये गुढ्या उभारून, अंगणात रांगोळी घालून त्यांचे स्वागत केले. ते अयोध्येला आले तो दिवस चैत्र पाडव्याचा होता. त्या दिवसाची आठवण म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो असे म्हटले जाते.

दुसरी या मागची कथा अशी की, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो, असे म्हणतात. गुढी एक ब्रह्मध्वजाचे चिन्ह आहे असेही समजले जाते.
गुढीपाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्त कोणते? हे आपणा सर्वांना माहीतच आहेत. शालिवाहन शकेची सुरुवात गुढीपाडव्याला झाली म्हणूनच त्या दिवसाला संवत्सर प्रतिपदा असे म्हटले जाते. (संवत्सर म्हणजे वर्ष.) वर्षाचा पहिला दिवस, शालिवाहन शकेची सुरुवात झालेला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. पूर्वी पैठण येथे सातवाहनांचे शालिवाहनांचे राज्य होते. तेथील राजे मोठे पराक्रमी होते. त्या काळी ‘शक’ म्हणजे परकीय. सर्व राज्यात घुमाकूळ घालीत होते, प्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयापासून हा शक सुरू झाला असावा, असेही म्हणतात.

काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत गेल्या. ग्रामीण भागातून मी शहरात आले. अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या या परंपरेची सुंदर आठवण म्हणून शोभायात्रा काढतात‌. त्या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करून नागरिक या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होतात. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्या त्या भागातील स्थानिक संस्था एकत्र येऊन रथ सजवितात. त्यावर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात. अशा प्रकारे गुढीपाडव्याचा हा सोहळा मुंबईतील विलेपार्ले, गिरगाव, दादर, लालबाग-परळ, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे तसेच पुणे, नागपूर, नाशिक येथील शोभायात्रा नावीन्यपूर्ण असतात. या मागचा उद्देश हाच की आजच्या पिढीला गुढीपाडव्याचे महत्त्व समजावे आणि आपल्या संस्कृती आणि परंपरेची ही पवित्र वाटचाल अशीच चालत राहावी.

आला चैत्र पाडवा
गुढ्या उभारा दारात
सण मुहूर्ताचा खास
पावित्र्य साठवू मनात
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -