Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजागतिक पुस्तक दिन : पुस्तकांशी मैत्री सर्वश्रेष्ठ मैत्री !

जागतिक पुस्तक दिन : पुस्तकांशी मैत्री सर्वश्रेष्ठ मैत्री !

‘वाचाल तर वाचाल’ हे ब्रीद आपण ऐकलंच आहे. यावरूनच वाचनाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे आपण जाणतोच. पुस्तके आनंदाबरोबर ज्ञान, जगण्याचे तंत्र, मंत्र मिळते. आणि मग पुस्तक हे आपले चांगले मित्र होतात. पुढे पुस्तकांमुळेच माणसाचं चांगलंव्यक्तिमत्त्व घडतं.

विशेष – लता गुठे

माणसाच्या जीवनात अन्न, पाणी, निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत, तशीच एक गरज आहे मैत्रीची. मग ती मैत्री माणसांचीच असायला पाहिजे, असे काही नाही. ती आपल्या छंदाचीही असू शकते. कारण छंद देतात सर्वश्रेष्ठ आनंद आणि माणसाच्या जीवनामध्ये मैत्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मित्रांनो, आपण अनेकदा ‘वाचाल तर वाचाल’ हे ब्रीद ऐकलं आहे. यावरूनच वाचनाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे आपण जाणताच आहात. खरं तर पुस्तकं हे कल्पवृक्ष आहेत, असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरू नये. पुस्तक गोष्टी सांगतात विज्ञानाच्या, देश-विदेशातील माणसांच्या, पशु-पक्ष्यांच्या, राजा-राणीच्या या कथा मुलांना कल्पित वास्तवात घेऊन जातात. आनंदाबरोबर ज्ञान देतात. जगण्याचे तंत्र आणि मंत्र पुस्तकातूनच मिळते आणि मग पुस्तक हे चांगले मित्र होतात, ते आयुष्यभरासाठी. पुस्तक माणसांना कधीच धोका देत नाही, ते कायमच साथ देतात. पुस्तक करमणूक करतात. त्याबरोबर पुस्तकं ज्ञानही देतात. पुस्तकामुळे घडतं माणसाचं व्यक्तिमत्त्व.

पुस्तकाने मला काय दिलं, हे आज मी आपणास सांगणार आहे. लहानपणापासून पुस्तकांशी मैत्री जर केली नसती, तर माझ्या आयुष्याची किंमत शून्य असती. मी आज ज्या ठिकाणी आहे तिथे नसते. ग्रामीण भागात माझं लहानपण गेल्यामुळे १९७०-८०च्या दशकात पुस्तकं हेच एकमेव करमणुकीचं साधन होतं. मला आजही चांगलं आठवतंय, दुसरीमध्ये आम्हाला गोष्टीचे पुस्तक अभ्यासाला होते. रोज गोष्टीच्या तासाला आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. त्या गोष्टीमधूनच पऱ्यांच्या जगाची ओळख झाली. जादूच्या गोष्टी, राक्षस, रामायण-महाभारतातील संस्कार देणाऱ्या गोष्टी, पशु-पक्ष्यांच्या गोष्टी या सर्व ऐकताना, त्या बालवयामध्ये ही भेटलेली पात्रं मनात रुंजी घालू लागली आणि पुस्तक वाचण्याचा छंद जडला. आमच्या शाळेमध्ये ‘चांदोबा’ हे मासिक यायचं. मग ते वाचण्याचं वेड लागलं, ते मासिक येण्याची आम्ही वाट पाहत असू कारण त्यामध्ये छान छान कविता, गोष्टी असं बरंच काही असायचं, त्याच्यातील चित्र पाहताना मन हरकून जायचं. बोलणारे पशुपक्षी, शूर राजकन्या, राजपुत्र यांची ओळख बालगोष्टीतच झाली आणि ज्ञानाच्या शाखा विस्तारू लागल्या. त्या पुस्तकामुळेच नंतर पाठ्यपुस्तकातील कविता, धडे प्रचंड आवडायचे. विंदांच्या कवितेतील ओळी मला आजही आठवतात,

वाटेत भेटली एक परी,
घातली खिशात अन् आणली घरी…
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुलं’ या कविता गात अंगणभर नाचले. ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ म्हणत पावसामध्ये मनसोक्त भिजले. इंदिरा संतांची ‘गवतफुला’ कविता मनाच्या आरपार गेली.

‘रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला’, ‘असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा’ ही कविता शाळेच्या वाटेने घरी जाता-येताना वाटेतील फुलं पाहून कायमच ओठात रेंगाळायची. त्यामुळे वाटेत भेटणारी गवतफुलं जास्त जवळची वाटू लागली. बालकवींची ‘श्रावणमासी’, ‘औदुंबर’ तसेच कुसुमाग्रजांची ‘कणा’, ‘पृथ्वीचे प्रेम गीत’ त्या वयात कल्पनेला भरारी देत होत्या.

पुस्तकाने दिलेला हा आनंद मनात मावेनासा व्हायचा. जरा मोठी झाले अन् ती बालभारतीची पुस्तकं सर्वात प्रिय वाटू लागली. त्या कोवळ्या वयातच त्यांच्याशी मैत्री झाली. नवीन पुस्तक हातात आलं की, त्याचा सुगंध घेताना ते पुस्तक मनापर्यंत जाऊन पोहोचते, हा अनुभव नकळत्या वयातच आला. मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तकं वाचण्याचा छंद जडला.

तरुण वयामध्ये भेट झाली ना. धों. महानोर यांच्या रान कवितांची आणि बहिणाबाईंच्या अहिराणी बोलीची. ते सौंदर्य मनाला भुरळ घालू लागलं. केशवसुतांच्या ‘तुतारी’ने नव्या क्रांतीची चाहूल लागली. बाबा बोरकर यांच्या कवितेतून गोव्याच्या भूमीचे दर्शन झाले. शांताबाईंची पैठणी मला माझ्या आजीची पैठणी वाटू लागली आणि मी कविता लिहू लागले.

आठवी, नववीला असतानाच ‘मृत्युंजय’, ‘स्वामी’, ‘ययाती’ या कादंबऱ्या वाचल्या आणि पुस्तकावर मी प्रेम करू लागले. वाचता-वाचता अंतर्मुख होऊन विचार करू लागले. पुस्तकांनी एकटेपणात साथ दिली, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं ना. शि. फडके यांच्या ‘प्रवासी’, ‘एक होता युवराज’, ‘ऋतुसाहार’ या कादंबऱ्या वाचताना, त्यातील पात्रांशी मी संवाद साधू लागले आणि मला पुस्तकाचं व्यसन लागलं. एक दिवस पुस्तक नाही वाचलं, तर आपण उपाशी आहोत, असं वाटायचं आणि आजही तेच वाटतं.

जेव्हा-जेव्हा राहण्याची घरं बदलली, तेव्हा-तेव्हा त्या परिसरातील वाचनालयाचा शोध घेऊ लागले आणि या छंदातूनच माझ्यातली लेखिका उदयाला आली. मी कथा, कविता, प्रवासवर्णनं, ललित लेख हे साहित्याचे प्रकार हाताळले आणि साहित्याच्या प्रांगणात मुशाफिरी करू लागले. याबरोबरच शिक्षणही चालू होतं, अभ्यासक्रमाला असलेली पुस्तकं मराठी वाङ्मयाचा इतिहास, संतांचे चरित्र, लेखकांचा अभ्यास, हे वाचनात आलं आणि आपलं मराठी साहित्य किती समृद्ध आहे, याचा अंदाज आला. संत ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या सुप्रसिद्ध लेखकांपर्यंत साहित्याचं वाचन करू लागले आणि हा प्रवास ‘पीएच. डी.’पर्यंत मला पुस्तकांचे बोट धरून घेऊन आला. त्याच प्रवासामध्ये लेखिका, प्रकाशिका आणि संपादिका म्हणून माझा नावलौकिक झाला. उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी आणि प्रकाशन व्यवसायासाठी माझ्या चांगल्या कामाची पोहोचपावती म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून जवळजवळ ३०० पुस्तकं प्रकाशित झाली. पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला पुस्तक निर्मितीचा आनंद खूप समाधान देऊन जातो, हे लक्षात आलं.

पुस्तकाचे ले-आऊट, डीटीपी, कव्हर डिझाइन हे सर्व करताना दिवसाचे १२ तास अपूर्ण पडू लागले. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या भेटीगाठी झाल्या. सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, साहित्यिका गिरीजा कीर, सुप्रसिद्ध कथाकार माधवी कुंटे अशा अनेक लेखकांच्या मुलाखती घेऊन दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित करू लागले. त्यांच्या आयुष्याचा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. जमिनीवर पाय ठेवून, आकाश कवेत घेणारी माणसे मिळाली, ती साहित्यामुळेच. मी संपादित केलेले ‘ताऱ्यांचे जग’ आणि ‘धमाल मस्ती’ हे दोन दिवाळी अंक गेली १४ वर्षं सातत्याने मी प्रकाशित करू लागले. रोज नव्याने काहीतरी शिकायला मिळू लागलं आणि शिकता शिकता माझं जीवन समृद्ध झालं. पुस्तकांनी मला माझी ओळख दिली. त्याचबरोबर मला माझं अस्तित्व मिळालं. आणखी जगण्यासाठी माणसाला काय हवं? मी एका कवितेत म्हटलं आहे…

पुस्तक माझे मित्र
आतलं बाहेरचं तळघरातलं
सारं काही सांगत राहतात
नातं जोडतात वेदनेशी
सुखदुःखात सोबत करतात
निवांतपणे बसून एकांतात
अंतरीचे गुज खोलतात
माझी पुस्तकं माझे सोबती
कुठं मला एकटं सोडतात

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचक, लेखकप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -