Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाहैदराबादचा सनराइझ होईल का?

हैदराबादचा सनराइझ होईल का?

कोलकाताशी आज लढत

मुंबई (प्रतिनिधी) : सलग चार सामने गमावल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएल २०२२ मधील आशा जिवंत ठेवण्यासाठी शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्यांचा ‘सनराइझ’ होण्याची आवश्यकता आहे. अर्थात त्यासाठी त्यांना गोलंदाजीच्या समस्येवर मात करावी लागेल. सलग ५ सामने जिंकल्यानंतर झालेल्या सलग ४ सामन्यांतील पराभवांमुळे सनरायझर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आकांक्षांना धक्का बसला आहे. त्यांचे ११ सामन्यांत १० गुण आहेत आणि प्लेऑफ मध्ये जाण्याची शक्यता जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित तीनही सामने त्यांना जिंकावेच लागतील.

दुसरीकडे, केकेआरचे १२ सामन्यांत १० गुण आहेत आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघाचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यातील विजय त्यांना जास्तीत-जास्त १४ गुणांवर नेईल जो प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा नसेल. कारण, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे १२ सामन्यांतून १४ गुण असून हे दोन्ही संघ पहिल्या चारमध्ये कायम आहेत.

यंदाच्या हंगामात दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी झालेल्या सामन्यात हैदराबादने कोलकात्याचा ७ गडी राखून पराभव केला. आता कोलकाता उद्याच्या सामन्यात पराभवाचा बदला घेण्यासाठी तसेच प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादलाही २ गुण मिळवून टॉप-४ साठी दावेदारी मांडायची आहे. हैदराबादसाठी चिंतेचे कारण म्हणजे त्यांचे प्रमुख गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांना झालेली दुखापत आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिकला चांगली कामगिरी करण्यात आलेली असमर्थता.

विरोधी संघांनी सनरायझर्सविरुद्धच्या गेल्या चार सामन्यांत १९० हून अधिक धावा केल्या यावरून त्यांच्या खराब गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. बंगळूरुविरुद्धच्या गत सामन्यात सनरायझर्सने फजल हक फारुकी आणि कार्तिक त्यागी यांना संधी दिली. पण तेही निष्प्रभ ठरले, त्यामुळे संघाच्या अडचणीत भर पडली आहे. दुसरीकडे, कोलकाता त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत बदल करण्याची किंमत मोजत आहे आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. अनुभवी टीम साऊदी आणि पॅट कमिन्स यांनी मुंबईविरुद्ध चार विकेट्स घेत जोरदार प्रयत्न केले; परंतु दुखापतीमुळे कमिन्स केकेआरच्या उर्वरित सामन्यांना मुकणार असून तो मायदेशी परतला आहे.

सनरायझर्सकडे दर्जेदार फलंदाज असून केन विल्यमसनला खांद्यावर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्याला आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. अभिषेक शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण या युवा फलंदाजाला डाव सांभाळता आलेला नाही. राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि एडन मर्करमही धावा करत आहेत.

ठिकाण : एमसीए स्टेडियम, पुणे वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -