Monday, May 20, 2024

दिव्य हृदय बँक

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

परमेश्वर कृपाही करत नाही व कोप ही करत नाही, तो दयाळू नाही व तो निष्ठुरही नाही. तो तुमच्या भानगडीतच पडत नाही, हस्तक्षेप करत नाही, भेदभाव करत नाही. तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची लुडबुड तो करत नाही, एवढे लक्षात ठेवले तरी हे समजते की महत्त्व कशाला आहे? तुम्ही काय करता त्याला महत्त्व आहे. कर्म व कर्मफळ! जीवनात कर्म महत्त्वाचे आहे. या कर्माला चार तोंडे आहेत. कर्म हा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव उत्पत्ती करायचा की नाही तसेच कर्म उत्पत्ती करते. चांगली किंवा वाईट उत्पत्ती कर्म करीत असते. कर्माला चार तोंडे आहेत. विचार, उच्चार, आचार व इच्छा या चार तोंडाचा हा ब्रह्मदेव आहे. हे कर्म आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे.

संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पापपुण्य, नियती, सुखदुःख व नशीब असे संचितापासून ते नशिबापर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास आहे. या सर्व प्रवासात परमेश्वर कुठेच येत नाही. तत्त्वतः तो कुठेही येत नाही. तुम्ही हे करा, ते करा असे परमेश्वर कधीही सांगत नाही. देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, कर्मस्वातंत्र्य दिलेले आहे, तुम्ही भजन करायचे की भोजन करायचे. उपवास करायचा की एकवेळ जेवायचे, दोन वेळा जेवायचे की निर्जळ उपवास करायचा हे देव सांगत नाही. हे सगळे मधले लोक सांगतात. हे सगळे धर्ममार्तंड सांगतात. जीवनविद्या सांगते ‘संचित येते कुठून ?’ ते आकाशातून पडत नाही व जमिनीतून वर येत नाही.

संचित हे सुद्धा कर्मातून येते. मग ते मागच्या जन्मीचे असेल किंवा या जन्मीचे असेल. संचितात पापपुण्य असते. पापपुण्य असते म्हणजे काय असते ? आज पापपुण्य म्हटले की लोकांना अंधश्रद्धा वाटते. पापपुण्य याचा अर्थ दुष्कर्म व सत्कर्म. तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे, “परपीडा ते पाप, परोपकार ते पुण्य.” परोपकार म्हणजे सत्कर्म व परपीडा म्हणजे दुष्कर्म. जीवनविद्या असे सांगते की तुकाराम महाराजांनी सांगितले आहे ते बरोबरच आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्याला आपण परोपकार म्हणतो ते सत्कर्म आहे व ज्याला आपण परपीडा म्हणतो ते दुष्कर्म. सत्कर्माचे फळ मिळालेच पाहिजे.

‘जसे कर्म तसे फळ’ जसे तुम्ही चांगले कार्य कराल तेवढेच चांगले फळ तुम्हाला मिळणार. हे ताबडतोब मिळेलच असे नाही. कधी लगेच होते तर कधी उशिरा होते. कधी एक दिवसाने होईल, कधी दोन दिवसांनी व कधी आठ वर्षानंतर. मी एक उदाहरण देतो. एका माणसाने खून केला व तो पळून गेला. आठ वर्षांनी सापडला व त्याला फाशीची शिक्षा झाली. तो म्हणेल की, ८ वर्षांपूर्वी गुन्हा केला होता, त्याची शिक्षा आत्ता कशाला? जरी आठ वर्षांपूर्वी गुन्हा केलेला असला तरी त्याची शिक्षा ही होणारच कर्म केल्याबरोबर त्याचे फळ मिळाले नाही तर ते संचितात जाऊन पडते. फळाला आले की ते वजा होते. जोपर्यंत फळाला येत नाही तोपर्यंत ते संचितात राहते. त्याला आम्ही हृदयबॅँक म्हणतो.

तसेच या बँकेला आम्ही दिव्य बॅँक असेही नाव दिलेलं आहे. मानवी बँक ही साधारण असते, तर ही बँक दिव्य असते. या बँकेत आपण पाप व पुण्य जमा केलेले असते. बँकेत जसे आपण पैसे जमा करतो तसेच या बँकेत पापपुण्य जमा होते. दुष्कर्म जे फळाला येत नाही ते पाप व सत्कर्म जे फळाला येत नाही ते म्हणजे पुण्य हे दोन्ही जमा करतो. बँकेत जसे खाते असते तसेच या दिव्य बँकेत खाते असते. या संचितातून आपण काय काढतो? पाप काढायचे की पुण्य काढायचे हे तू ठरव. इथे जीवनविद्येचे वैशिष्ट्य आहे.

इथे तुम्हाला पाप पाहिजे की पुण्य पाहिजे हे तुम्ही दिव्य बँकेकडे जाऊन मागता. हे मागता म्हणजे काय करता ? चिंतन करता. तसेच संचितात असलेले पापपुण्य आपण चिंतन करून काढून टाकतो. हे चिंतन दोन प्रकारचे असते. शुभ चिंतन व अशुभ चिंतन. अशुभ चिंतन असेल तर पाप बाहेर येते व शुभ चिंतन असेल तर पुण्य बाहेर येते. पाप पाहिजे की पुण्य पाहिजे हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -