Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखही कसली न्याय यात्रा?

ही कसली न्याय यात्रा?

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापासून दर्शन सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार यावरून भारतीय जनतेच्या मनात कुतूहल आहे. कधी एकदा आपल्यालाही रामलल्लाचे दर्शन घेता येणार, याची आतुरता हिंदू अस्मिता जागलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस, सपासह विरोधी पक्षांना देण्याचे राम मंदिर न्यासाने ठरविले आहे; परंतु राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावली तर अल्पसंख्याकांची मते दुरावणार नाहीत ना? अशी भीती विरोधकांना सतावत आहे. त्यातून जनतेचे लक्ष दुसरीकडे कसे वळविणार यावरून विरोधी पक्ष चिंतेत आहे.

हिंदूंची मने दुखावणार नाहीत आणि अल्पसंख्याक सुद्धा खूश होतील, असा काहीसा पर्याय निघावा यासाठी विरोधकांची व्यूहरचना सुरू होती. त्यातून काँग्रेस पक्षाने येत्या १४ जानेवारीपासून भारत न्याय यात्रेची घोषणा केली का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी आता पूर्वेकडून पश्चिमेच्या प्रवासाला निघणार आहेत. ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूरच्या इंफाळमध्ये सुरू होऊन २० मार्चला मुंबईत संपेल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत. ही ‘भारत न्याय यात्रा’ ६२०० किलोमीटरचे अंतर कापणार असल्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. एकूण १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांमधून या यात्रेचे मार्गक्रमण होणार आहे. यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली होती. ३,९७० किमी अंतर, १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून १३० दिवसांपेक्षा जास्त काळ चालल्यानंतर ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये या यात्रेचा प्रवास संपला होता.

भारत जोडो यात्रा ज्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमधून गेली आणि तेथील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यामध्ये तीन राज्यांत भाजपाने तर एका राज्यात काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत प्राप्त करीत वर्चस्व प्राप्त केल्याने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे, तर दुसरीकडे तीन राज्यांतील नऊ जिल्ह्यांतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र, त्यांच्या या भारत जोडो यात्रेचा करिष्मा मात्र निकालात कुठेच पाहावयास मिळाला नाही.

विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तेलंगणातील विकाराबाद, हैदराबाद या दोन, तर मध्य प्रदेशातील महू, इंदूर, उज्जैन या तीन जिल्ह्यांतून तर राजस्थानमधील झालावार, अलवर, कोटा, दौसा या चार जिल्ह्यांतून अशी तीन राज्यांतील नऊ जिल्ह्यांतून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र, त्यांच्या या भारत जोडो यात्रेचा करिष्मा मात्र निकालात फारसा कुठेच पाहावयास मिळाला नाही. तीन राज्यांत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीप्रमाणे त्यांच्या यात्रेचा परिणाम जाणवला असता तर काँग्रेसला यश मिळाले असते. मात्र तेलंगण वगळता राजस्थान, छत्तीसगडमधील पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे काँग्रेसला जे अल्प यश मिळाले त्याचे क्रेडिट भारत जोडो यात्रेला देता येणार नाही. त्यामुळे भारत न्याय यात्रा काढून काँग्रेस पक्ष स्वत:चे समाधान करून घेत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी प्रतिमेसमोर तोड देण्यासाठी विरोधकांसमोर एकही चेहरा नाही.

मोदींच्या वाढत्या प्रभावाशी आपण कसा सामना करणार यावरून विरोधक हे नेहमीच गोंधळलेले दिसतात. त्यामुळे मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करण्यासाठी इंडिया आघाडी तयार करण्यात आली आहे. या आघाडीत २८ पक्ष असले तरी त्यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने, जनतेसमोर कोणती उजळ प्रतिमा घेऊन जाणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे एकमेकांच्या कुबड्या घेऊन चालण्याचा प्रयत्न मोदी यांचे विरोधक करत आहेत. मणिपूर राज्यात दोन समुदायावरून निर्माण झालेला तेढ हा अजून शमायला तयार नाही. केंद्र सरकारने ही दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु देशाबाहेरील शक्तींचा हात या दंगली पेटविण्यात होता, हे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु मणिपूरमध्ये डबल इंजिनचे सरकार असल्याने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना भारत न्याय यात्रेचा शुभारंभ या राज्यातून करण्यामागे काँग्रेसची न्यायाची भूमिका कोणती हे न समजण्यापलीकडे आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशातील गरिबी हटावचा नारा दिला होता. पण, गरिबी हटली नाही तर गरिबांच्या संख्येत वर्षोनुवर्षे वाढ होत गेली. काँग्रेसच्या राजवटीत एवढा भ्रष्टाचार वाढला होता की, राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी पंतप्रधान असताना, केंद्रातून पाठवण्यात आलेला निधी कुठे जातो, हे कळत नव्हते. रुपयांतील ८५ पैसे हे खाबुगिरीत जातात हे त्यांनी मान्य केले होते. त्यामुळे भ्रष्ट यंत्रणा सुधारण्यासाठी न्याय यात्रा काढली असेल, असे जर मान्य केले तर राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामागे लाल डायरी, महादेव अॅपसारखी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे जनतेचे डोळे उघडले आणि या ठिकाणी बदल झाला होता. त्यामुळे राहुल गांधी यांची न्याय यात्रा कोणासाठी हा प्रश्न ते ज्या मार्गावरून जातील तेथे उपस्थित झाला तर त्याचे फलित काय निघणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -