Thursday, May 9, 2024
Homeक्रीडावॉर्नर-मार्श जोडीचा राजस्थानला धक्का

वॉर्नर-मार्श जोडीचा राजस्थानला धक्का

दिल्लीच्या विजयाने ‘प्ले-ऑफ’साठीच्या रेसमधील रंगत वाढली

नवी मुंबई (प्रतिनिधी) : डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियाच्या जोडीने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत बुधवारी राजस्थानविरुद्ध दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या विजयामुळे ‘प्ले-ऑफ’च्या रेसमधील रंगतही वाढली आहे. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीलाही चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात श्रीकर भरत भोपळाही न फोडता माघारी परतला. बोल्टने त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही ऑस्ट्रेलियाची जोडी दिल्लीसाठी धाऊन आली. या जोडीने १४४ धावांची भागीदारी करत दिल्लीला विजयासमीप आणले. त्यात मार्शने आपले अर्धशतक झळकावले.

शतकाच्या उंबरठ्यावर (८९ धावांवर) असताना धावा आणि चेंडू यातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात मार्शने आपली विकेट गमावली. मात्र त्यानंतर वॉर्नर (नाबाद ५२ धावा) आणि रीषभ पंत या जोडीने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने हा सामना ८ विकेट आणि ११ चेंडू राखून जिंकला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही. चांगलाच फॉर्मात असलेला जोस बटलर स्वस्तात माघारी परतला. सकारीयाने शार्दुलकरवी झेलबाद करत बटलरच्या रुपाने दिल्लीला मोठा बळी मिळवून दिला. बटलरला अवघ्या ७ धावा करता आल्या. त्यानंतर संयमी खेळत असलेल्या यशस्वी जयस्वालचीही एकाग्रता नाहीशी झाली. जयस्वालने १९ चेंडूंत १९ धावांचे योगदान दिले. मार्शने जयस्वालचा अडथळा दूर केला. त्यामुळे ५२ धावांवर त्यांचे २ तगडे फलंदाज तंबूत परतले होते.

रवीचंद्रन अश्वीन आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अश्वीनने ३८ चेंडूंत ५० धावा ठोकल्या, तर पडीक्कलने ३० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. त्यामुळे २० षटकांअखेर राजस्थानला ६ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीच्या चेतन सकारीयाने राजस्थानविरुद्ध प्रभावित केले. त्याने ४ षटकांत अवघ्या २३ धावा देत २ बळी मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -