Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपालघररासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट

रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट

कंपनीला कारणे दाखवा नोटीस

संदीप जाधव

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी घनकचऱ्याने भरलेले ड्रम जमिनीखाली गाडून ठेवल्याची घटना तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून उघड झाली आहे. तर आणखीनही काही कंपन्यांमध्ये असाच प्रयत्न केला गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारात आणखीनही काही कंपन्या रडारवर असण्याची शक्यता आहे.

औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक एम-४ आणि एम -१५ मधील कॅलिक्स केमिकल अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीने कंपनीच्या आवारातच घातक रासायनिक घनकचऱ्याने भरलेल्या ड्रमच्या साठ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खोदून जमिनीत गाडून ठेवलेल्या साठ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. घातक घनकचऱ्याचे नमुने घेत कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

घातक रासायनिक घनकचरा विल्हेवाटीसाठी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे पाठविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश आहेत. तळोजा येथे घातक घनकचरा पाठविण्यासाठी वाहतूक आणि वाहनभाडे आदी खर्चिक प्रक्रिया असल्यामुळे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रदूषणकारी कारखाने छुप्या मार्गाने रासायनिक घनकचरा बेकायदेशीरीत्या विल्हेवाट लावत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

छुप्या पद्धतीने बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावलेल्या घातक रसायनाच्या साठ्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाल्यानंतर उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने कॅलिक्स केमिकल अॅंड कंपनीच्या आवारातील जागेचे खोदकाम केले. खोदकामादरम्यान घातक रसायनाने वितळलेले प्लास्टिक ड्रम आणि उग्र वास असलेला घनकचरा आढळून आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घनकचऱ्याचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

कंपनीवर लवकरच उत्पादनबंदी

पर्यावरणास घातक रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कॅलिक्स केमिकल आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीवर उत्पादनबंदीच्या कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. लवकर कंपनीवर उत्पादनबंदीची कारवाई केली जाणार आहे.

– प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर एमआयडीसी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -