Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीरसायनीत सहा वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत

रसायनीत सहा वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत

रायगड मधील स्थानिक गुन्हे शाखेचे यश

अलिबाग : रसायनी पोलीस ठाणे हद्दीत सहा वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील दोन आरोपीना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा रायगड शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत दिली.

रसायनी पोलीस ठाणे हददीतील चावणे गाव ते पेट्रोनॉस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका नाल्यात एका इसमाचा धारदार शस्त्राने अंगावर वार करून निघृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची माहिती १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रसायनी पोलिसांना विश्वनाथ वामन गायकवाड (कष्टकरी नगर, ता. खालापूर) यांनी दिली होती. त्यानुसार ही फिर्याद रसायनी पोलिसात गु.रजि.नं.३०/२०१८ कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये दाखल झाली होती.

त्यानंतर रसायनी पोलीस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, रायगड यांनी याचा तपास सुरु केला होता. त्यावेळी मृताची ओळखही पटविण्यात आल्यानंतर त्याचे नाव जयेश काशिनाथ खुडे असे निष्पन्न झाले होते. यावेळी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला होता; परंतू आरोपी निष्पन्न झाले नव्हते. तसेच आरोपी पोलिसांना मिळुनही आले नव्हते. त्यामुळे सदरचा गुन्हा कायम तपासावर ठेवत या गुन्हयाची अ-समरी त्यावेळी न्यायालयात सादर करण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना रायगड जिल्हयातील उघडकीस न आलेले खुनाचे गंभीर गुन्हे उघड करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्हयातील उघड न झालेले खुनाचे गुन्हे पुन्हा तपासावर घेतले. त्यापैकी हा एक गुन्हा उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पोमण व पथकाला सुचना दिल्या.

त्याप्रमाणे सपोनि संदीप पोमण व पथकातील अंमलदार सहायक फौजदार राजेश पाटील, सहायक फौजदार प्रसाद पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांनी आपले कौशल्य पणाला लावुन गोपनीय बातमीदारांना सतर्क केले आणि या गुन्हयातील आरोपी ओमकार सुनिल शिंदे (वय-२५ वर्षे, रा. समर्थकृपा सदन, वावंढळ, ता. खालापूर) याला ताब्यात घेत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार आरोपी रोहीत विष्णू पाटील २७ (रा. चांभार्ली ता. खालापूर) याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यामुळे या गुन्हयातील आरोपी रोहीत विष्णू पाटील याला अहमदनगर येथील जामखेड येथून ताब्यात घेतले.

हा गुन्हा घडून सहा वर्षांचा कालावधी जाऊन देखील कुठल्याही प्रकारचा धागादोरा, पुरावा पोलिसांकडे नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले कौशल्य पणाला लावत पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि संदीप पोमण व पथकाने अहोरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणला.

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि संदीप पोमण व सहायक फौजदार राजेश पाटील, सहायक फौजदार प्रसाद पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे व सायबर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक तुषार घरत, अक्षय पाटील यांनी गुन्हयाच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजाविली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -