Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभाजावळीला अवकाळी पावसाचा अडथळा

भाजावळीला अवकाळी पावसाचा अडथळा

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे भाजीपाला व फळ पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना भाजावळ करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान तर झाले, त्याचबरोबर जमिनीमध्ये पीक उत्तम प्रकारे यावे यासाठी जमिनीची भाजावळ केली जाते. तीच कोपऱ्यात करण्यात आलेली भाजावळ भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आले असे म्हणता येईल. एक वेळ दुबार पेरणी करणे सोपे असले तरी दुबार भाजावळ करणे कठीण असते. अशा नैसर्गिक संकटाच्या वेळी शासनाने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजावळ पावसाच्या पाण्याने ओली झाली असेल, तर व्यवस्थित सुकवून पुन्हा भाजावळ करावी लागते. जर त्यानंतर ढगाळ वातावरण असेल तर भिजलेला पालापाचोळा कुजला जातो. त्यामुळे दुर्गंधी वाढून वातावरण दूषित होते. असे वातावरण आरोग्याला अपायकारक ठरू शकते.

भाजावळ झाल्यानंतर भाजावळीची एकत्र केलेली राख वाहून गेली असेल, तर झाडाखालील पातेऱ्याची भाजावळ केली जाते. कारण जमिनीची मशागत करण्यापूर्वी भाजावळ केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते. अशा वेळी राज्यातील कृषी तज्ज्ञांनी पुढे येणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू झाल्यावर शेतीच्या बांधावर जाण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना अशा संकटातून सावरले पाहिजे. म्हणजे शेतकरी शेतीची मशागत करताना अधिक जोमाने काम करतील. पिकाची पेरणी करणाऱ्या जमिनीची भाजावळ केल्याने जमिनीतील मागील पिकांचे मूळ नष्ट होते. जमीन भाजली जाते, त्यामुळे नांगरणी करताना जमीन भुसभुशीत होते. याचा परिणाम पावसाचे पाणी साठून राहून जमिनीत ओलावा निर्माण होतो. तसेच पेरलेले बियाणे सुद्धा लवकर रुजून यायला मदत होते.

भाजावळ हा शब्द नवीन पिढीला परिचित वाटत नसला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. शेतीचे पीक उत्तम प्रकारे व्हायचे असेल, तर शेतकऱ्यांना शेत जमिनीची भाजावळ करावी लागते. त्यासाठी एप्रिल व मे महिना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आता जरी आधुनिक पद्धतीने शेती करत असलो तर खेडोपाड्यात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे ज्या कोपऱ्यात भात पेरायचे असेल त्या कोपऱ्यामध्ये भाजावळ केली जाते. त्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये कवळा तोडली जातात. कवळा म्हणजे झाडाच्या फांद्या तोडणे व तोडलेल्या फांद्या दिंड्याने एकत्र करून बांधणे म्हणजे ‘कवळा’ होय. कोकणामध्ये ‘कवळा’ हा परिचित शब्द आहे. महिन्यानंतर म्हणजे, ओली असणारी कवळा वाळल्यानंतर कोपऱ्याच्या एका बाजूला उभी करून ठेवली जातात.

सध्या शेतकऱ्यांचा भाजावळीचा मोसम सुरू आहे. मात्र त्याला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वाळलेली कवळा भिजल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी राजा संकटात सापडला आहे. शेतीसाठी भाजावळ अतिशय महत्त्वाची असते. कोणत्याही पिकाचे शेतीतून उत्पादन घेण्यापूर्वी त्या जमिनीमध्ये भाजावळ करावी लागते. याचा परिणाम शेतीचे उत्पादन वाढण्याला मदत होत असते. त्याचप्रमाणे किडेमुंग्या नष्ट होतात. याचा परिणाम पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते. वाढ झाल्याने उत्पादन सुद्धा वाढण्याला मदत होऊन शेतकऱ्यांना अधिक चार पैसे मिळण्याला मदत होते. याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढण्याला मदत होते.

ज्या जमिनीमध्ये बियाणे पेरले जाते त्या कोपऱ्याची भाजावळ केली जाते. त्या कोपऱ्यात कवळा फोडून पूर्ण कोपऱ्यात पसरवली जातात. गायरीतील वाळलेले शेण बारीक करून त्यावर पेरले जाते किंवा लेंडी वरती पेरली जाते. त्याचप्रमाणे घराच्या बाजूचा किंवा बागेतील झाडाखाली असलेला पातेरा एकत्र करून तो झापातून घेऊन येऊन वरती टाकला जातो. अशा कामांना सर्रास चारकमान्यांच्या मुलांना मदतीला घेतले जाते. तशी मुले सुद्धा आनंदाने काम करतात. तेवढीच मदतीस मदत. अधिक उत्साहाने चाकरमान्यांची मुले गावची कामे करीत असतात. कोपऱ्यात कवळा फोडून लावणे, त्यावर आसपासचा पातेरा आणि त्यानंतर गायरीतील वाळलेले शेण, माळावरची गोवरी व लेंडी पेरली जाते. तीन ते चार दिवस चांगली सुकविली जाते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हवा कमी असेल अशा वेळी आसपासची मोकळी जागा साफ केली जाते.

वणवा जावू नये म्हणून त्याची काळजी घेतली जाते. त्यानंतर हवेचा अंदाज घेऊन आग लावली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच येऊन झालेली राख एकत्र केली जाते. जेव्हा मशागतीला सुरुवात करणार त्या दिवशी ती राख कोपऱ्यात पेरली जाते. त्या आधी त्या कोपऱ्यातील न जळालेल्या काट्या व दगड बाजूला काढल्या जातात. म्हणजे साफसफाई केली जाते. जाड काड्या असतील, तर घरी नेल्या जातात, तर दगड कोपऱ्याच्या मेरेला लावले जातात. ही कामे चाकरमान्यांची मुले सुद्धा करताना. बऱ्याच वेळा हात काळे होतात मात्र अशी कामे करणे कष्टाची असतात, असे चाकरमान्यांची मुले म्हणतात. तसेच ही कामे करताना त्यांचा आनंद काही वेगळाच असतो, असे पाहायला मिळते. तेव्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जमिनीची भाजावळ करताना जे नुकसान झाले आहे त्यासाठी सुद्धा आर्थिक मदत शासनाने देणे गरजेचे आहे. कारण जमिनीची उत्तम प्रकारे भाजावळ केल्यास शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तेव्हा शेती उत्पादनात वाढ झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होते, हे विसरता कामा नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -