Wednesday, May 8, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सध्वनी, गंध व स्पर्श माध्यमाची सांगीतिक ‘दृष्टी’

ध्वनी, गंध व स्पर्श माध्यमाची सांगीतिक ‘दृष्टी’

राजरंग – राज चिंचणकर

ध्वनीच्या माध्यमातून संगीत क्षेत्राला साज चढत असतो आणि त्यातून सूर-तालाशी संबंधित कलाकृती निर्माण होत असतात. अलीकडे या क्षेत्राला ग्लॅमर व आधुनिकतेचा स्पर्श झाला असला, तरी या क्षेत्रातल्या काही व्यक्ती आणि संस्था अशा आहेत की, सध्याच्या काळातही त्यांनी निस्वार्थपणे मानवतेचा झरा प्रवाही ठेवला आहे. कलेच्या मुख्य प्रवाहात सहज मिसळता न येणाऱ्या मंडळींना, या अनुषंगाने या क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देण्याचे काम काही जण करत आहेत. यातच आता नाव घ्यावे लागेल, ते गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांचे! गेली अनेक वर्षे दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्तींना, त्यागराज खाडिलकर भारतीय संगीत व गायनाचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत. यातूनच आता निर्माण झाला आहे, ‘तिमिरातूनी तेजाकडे’ हा संगीत अल्बम! दृष्टिहीन व दिव्यांग कलाकारांचा असा हा देशातला पहिलावाहिला संगीत अल्बम असल्याचे त्यागराज खाडिलकर यांनी स्पष्ट केले असल्याने, या कार्याचे मोल अधिक आहे. त्यायोगे येत्या महाराष्ट्र दिनी संगीत विश्व अनोख्या क्षणांचे साक्षीदार होणार आहे.

या अल्बमच्या निर्मितीची कहाणी हृदयस्पर्शी आहे. त्याविषयी बोलताना त्यागराज खाडिलकर सांगतात, “कर्जत लोकलमधून प्रवास करत असताना सोनू या दृष्टिहीन व दिव्यांग मुलीच्या गाण्याने माझे लक्ष वेधून घेतले. अतिशय सुरेल व टिपेचा आवाज; पण त्यावर संगीताचे संस्कार काही नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, अशा मुलांना जर आपण संगीताचे प्रशिक्षण दिले, तर केवळ लोकलमध्ये गाणी गात, भिक्षा मागण्यापेक्षा त्यांना एक व्यासपीठ मिळू शकते. त्यानुसार मी व माझी पत्नी वीणा, आम्ही आमच्या अकादमीमध्ये अशा मुलांना शोधून आणले आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यातून १५ दृष्टिहीन व दिव्यांग मुले अकादमीशी जोडली गेली आणि एका वेगळ्याच विश्वात माझा प्रवेश झाला. या विश्वामध्ये होते ते फक्त ध्वनी, गंध आणि स्पर्श! ही मुले दृष्टिहीन नसून दिव्यदृष्टी असलेले गायक आहेत, असे मला मनापासून वाटते; कारण जे मलासुद्धा दिसत नाही, ते त्या मुलांना ध्वनीच्या माध्यमातून दिसत असते. त्यांची आकलनशक्ती प्रचंड आहे. आम्ही त्यांना स्वतःचे गाणे देऊ शकलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे”.

१९८६ या वर्षी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वरकुल चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन झाली. गेली ३८ वर्षे ही संस्था सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यागराज खाडिलकर हे या संस्थेचे विश्वस्त आहेत. याच संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘त्यागराज म्युझिक अकादमी’ने ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या संगीत अल्बमची निर्मिती केली आहे. दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांमधल्या उत्कृष्ट गायकांना व्यावसायिक स्तरावर योग्य संधी मिळावी, असा उद्देश या उपक्रमाच्या मागे आहे. या अल्बमचे प्रकाशन महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी श्री शिवाजी मंदिरात होणार आहे. यावेळी हे दृष्टिहीन व दिव्यांग गायक या अल्बममधल्या गीतांचे सादरीकरणही करणार आहेत. या अल्बममधली गीते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या कवींनी लिहिलेली आहेत आणि त्यागराज खाडिलकर यांनी ही गीते स्वरबद्ध केली आहेत. आता या मंडळींना प्रोत्साहन देण्याची व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची जबाबदारी रसिकजन पार पाडतील, असा सूर संगीत क्षेत्रात उमटत आहे.

‘बाई समजून घेताना…’

कथाकार व कवी म्हणून किरण येले यांची साहित्यविश्वात ओळख आहे. युवा साहित्यिक मंडळींमध्ये किरण येले हे नाव विशेष लक्ष वेधून घेते, ते त्यांनी आतापर्यंत त्यांच्या खास पद्धतीने केलेल्या विविध विषयांच्या मांडणीमुळे! अनेक विषयांवर ते लिहिते झाले आहेत आणि त्यांचे लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. याच मांदियाळीत, ‘बाई समजून घेताना…’ या विषयावर किरण येले आता एका विशेष कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. साहजिकच त्यायोगे साहित्य रसिकांना किरण येले यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

माहीम सार्वजनिक वाचनालयाने सांस्कृतिक उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी किरण येले यांना निमंत्रित केले असून, यावेळी ‘बाई समजून घेताना…’ या विषयावर किरण येले संवाद साधणार आहेत. माहीमच्या ले. दिलीप गुप्ते मार्गावरच्या बृहन्मुंबई महानगरपालिका समाजकल्याण केंद्राच्या इमारतीत माहीम सार्वजनिक वाचनालय आहे. शनिवार, २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. या कार्यक्रमाच्या वेळी, वाचनालयाने घेतलेल्या साहित्यिक अनंत मनोहर स्मृती कथा रसग्रहण स्पर्धेचे पारितोषिक वितरणही किरण येले यांच्या हस्ते होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -