Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजTurkey : तुर्कीचा टर्की

Turkey : तुर्कीचा टर्की

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

तुर्कीचे मूळ निवासी असल्यामुळे या पक्ष्यांना “टर्की” म्हटले जाते. टर्की दिसायला कोंबडीसारखा, पण कोंबडीपेक्षा मोठा असतो. यांची अंडी आणि मांस यासाठी यांचे पालन करण्यात येते. हा वजनामुळे कमी उडतो, पण याला धावायला खूप आवडते. हे सर्वाहारी पक्षी आहेत.

वैज्ञानिकांची अनेक पक्ष्यांबद्दल अनेक मते असतात. बऱ्याचदा एकाच पक्ष्यांची अनेक नावे असतात. साधारणत: दिसण्यावरून, तर कधी भाषेवरून, परिसरावरून नावे तयार होतात. टर्की हा एक प्राचीन पक्षी आहे. हा मेलेआग्रीस वंशाचा एक मोठा पक्षी आहे. या वंशात दोन प्रजाती आहेत. ओसीलेटेड टर्की आणि उत्तर अमेरिकेतील जंगली टर्की. हे तुर्कीचे मूळ निवासी असल्यामुळे यांना “टर्की” म्हटले जाते. टर्की प्रथम मेक्सिकोमध्ये पाळला गेला. हे दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत आढळतात. उत्तर अमेरिकेत रंगाप्रमाणे यांच्या पाच प्रजाती आहेत. १८७१ मध्ये ओथनील चार्ल्स मार्श याने ओलीगोसिन जीवाश्म मेलीएग्रीस एंटिकम वंशावळीत टर्कीचे विवरण केले आहे. जंगली टर्कींना नदी, तलावाजवळ राहायला आवडते. यांची घरटी जमिनीवर असतात. पण रात्री हे झाडावर झोपतात. यांना उष्णता सहन होते. हे सामाजिक पक्षी असल्यामुळे कळपात राहतात. हे पक्षी दिवसा सक्रिय असतात. टर्की दिसायला कोंबडीसारखा पण कोंबडीपेक्षा मोठा असतो. यांची अंडी आणि मांस यासाठी यांचे पालन करण्यात येते. हा वजनामुळे कमी उडतो, पण याला धावायला खूप आवडते. हे सर्वाहारी पक्षी आहेत. हे धान्य, मांस, फळ, पाल सर्व खातात. टर्की सतत खात असतात.

मोसमाप्रमाणे त्यांचे खाद्य असते. यांची आयुर्मर्यादा जास्तीत-जास्त पाच वर्षांपर्यंत असते. टर्कीची उंची तीन फूट आणि वजन सहा ते आठ किलो असते. ६० मैल प्रति तासाने हे उडतात. हे खूप चपळ असून यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते.

टर्कीचे डोके पांढरे, निळे, लाल चमकते मांसल असते. यांची चोच पांढरट, काळपट, थोडी वळलेली. लाल मांसल बारीक मान, गळ्याला लाल लटकती चामडी असते. यांच्या चोचीला एक मांसल भाग डोक्यापासून चोचीच्या पुढपर्यंत लटकत असतो. ज्याला “स्नूड” असे म्हणतात. स्नूड म्हणजे चोचीवरील मांसल भाग जसा कोंबडीला असतो तसा. जेव्हा स्नूड लांब होतो, तेव्हा तो चोचीपेक्षा लांब होतो. प्रौढ स्नूडची लांबी सहा इंच असू शकते. हे जेव्हा उत्तेजित होतात, तेव्हा यांचे डोके निळे होते, तर राग आल्यावर लाल होते. जेव्हा तो मादीला आकर्षित करतो, तेव्हा तो स्नूड लांब करतो. स्नूडचा रंग बदलतो, एक विशिष्ट ध्वनी काढतो, त्याची चाल बदलते आणि मादीभोवती तो गोल गोल फेऱ्या मारतो. टर्की शांत असेल, तेव्हा स्नूड पिवळसर असतो. दोन ते तीन सेमीची त्याची मूळ लांबी असते. पण मादीला आकर्षित करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचा रंग लाल होतो आणि लांबीसुद्धा खूप वाढते. मादी त्याच नराकडे आकर्षित होते, ज्याचे स्नूड लांब असते. त्याच्या गळ्याकडील लोंबती लाल कातडी पूर्ण शरीरावर आपले लक्ष वेधून घेते. शरीरावरील सर्व पिसे फुलवून मादीभोवती गोल गोल फिरत नृत्य करणे, एेटीत चालणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. डोळे चॉकलेटी रंगाचे असतात. डोक्यापासून मानेपर्यंत जी कातडी लालसर, निळी असून चुरगळल्यासारखी दिसते. त्याला “वॅटल्स” असे म्हणतात. वॅटल्स आणि स्नूडचा उपयोग मादीला आकर्षित करण्यासाठी होतो. पक्ष्यांना घाम येत नाही. प्रत्येक पक्षाला सेन्सिटिव्ह अँटिना असतो जो त्याचे शत्रूंपासून संरक्षण करतो. हे वॅटल्स त्या पक्ष्यांना संरक्षित करत असतात. ती चोचीवर एक लालसर रंगाची बारीकशी सोंड म्हणजेच स्नूड जी चोचीपेक्षा हळूहळू मोठी होते, तिच्यावर बारीक बारीक लव असते. जेव्हा मादीला आकर्षित करायची वेळ येते, तेव्हा ती वाढते. मानेवर छोटे-छोटे लाल गोळे असतात. यांच्या अंगावर अनेक प्रकारचे पोत असणारे गोलाकार पंख असतात. ज्यात विविध छटा तांबूस, तपकिरी, राखाडी, निळ्या, हिरवट दिसत असतात. पंखातसुद्धा विविध पंख मोरासारखे इंद्रधनुषी चमचमते असतात. मोरांच्या नमुन्यातील छटा आणि नक्षीयुक्त पंख असतात. पंख फुलवण्याची कला फक्त नराकडेच असते. नराच्या शेपटीच्या पिसाऱ्यामध्ये लांबट गोलाकार पिसांवर फिकट तपकिरी पार्श्वभूमीवर काळ्या नागमोडी रेषा आणि टोकाला काळी जाडसर अर्धगोलाकार आणि शेवटी पांढरा पॅच खूपच आकर्षक असा पिसारा फुलवल्यावर दिसतो. टर्कीच्या शरीरावर खूप म्हणजे खूपच पंखांचे विविध भाग असतात. जेव्हा नर शरीरावरील सारी पिसे फुलवतो, तेव्हा तो खूपच सुंदर वाटतो. प्रत्येक टर्कीच्या छातीवर एक दाढी असते आणि वयोमानाप्रमाणे ती वाढते. कधी कधी ती मादीलासुद्धा दिसते.
मादीचे डोके निळसर भुरकट असते आणि नरापेक्षा ती लहान असते. तिच्या डोक्याच्या मागे तिचे पंख असतात. मादीचे पंख भुरकट असतात आणि शेपूट लहान असते. मादीचा प्रजनन काळ एप्रिलमध्ये चालू होतो आणि दोन आठवड्यांचे अवधीमध्ये ती ११ ते १२ अंडी देते. २८ दिवसांत पिल्ले बाहेर येतात आणि तीन-चार आठवड्यांमध्ये ते सक्षम होतात, पण कमीत-कमी चार ते पाच महिन्यांपर्यंत आपल्या पालकांबरोबर राहतात.

जर दोन टर्कींमध्ये युद्ध झालं, तर हेच स्नूड आणि वॅटलवर हल्ला करतात. ही त्वचायुक्त असल्यामुळे रक्तबंबाळ होऊन ते जखमी होतात. म्हणजे पक्ष्यांनासुद्धा एकमेकांचा कमकुवतपणा बरोबर माहीत असतो की युद्धात वार नक्की कुठे करावा?

हा सामाजिक आणि प्रेमळ असल्यामुळे मानव यांच्या अंड्याचा आणि यांचा व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिकार करतात. टर्कीमध्ये फॅट कमी असल्यामुळे याची अंडी खूप खाल्ली जातात. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. लंडनमधील एका स्पर्धेमध्ये १२ डिसेंबर १९८९ ला आतापर्यंतचा सर्वात मोठा टायसन नावाचा टर्की ज्याचे वजन ८६ पाऊंड होते त्याची नोंद झाली.

टर्कीला आध्यात्मिक महत्त्व असे आहे की, हा पक्षी पाहणे शुभशकुन आणि भाग्यशालीपणा समजतात. धैर्यवान, विचारवंत, जीवनात शांतपणे पुढे जाणारे, संकटाचा सामना नीडर होऊन करणारे, आत्ममय करणारे, आपल्यांची सुरक्षितता करणारे, शक्ती, साहस, कृतज्ञता, धन्यवाद याचे हे टर्की प्रतीक आहेत. हा एक प्रामाणिक मित्र, मदतगार, प्रेमळ आणि सकारात्मक पक्षी आहे. नैसर्गिकरीत्या कोणतीच गोष्ट नामशेष होऊ शकत नाही. कारण, परमेश्वराने निसर्गाला प्रत्येक जीवासाठी परिपूर्ण बनवलेले आहे. मानवाचा स्वार्थ, मानवाची हाव हे नैसर्गिक जीवसृष्टीची हानी करत आहे. त्यामुळे मानवाने हे सर्व थांबवून निसर्गनियमानुसारच वागले पाहिजे.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -