Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीNavratri Ghatsthapana : नवरात्र घटस्थापनेचा दिवस आला जवळ... जाणून घ्या विधी आणि...

Navratri Ghatsthapana : नवरात्र घटस्थापनेचा दिवस आला जवळ… जाणून घ्या विधी आणि पूजेची पद्धत…

नवरात्रीत महाराष्ट्रातील अनेक घरांत घटस्थापना करण्यात येते. तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सवही साजरा करण्यात येतो. ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळे देवीची मूर्ती आणतात व तिची नऊ दिवस यथासांग पूजा केली जाते. यानंतर दसरा सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. गरबा आणि दांडियाच्या वेळी मध्यभागी घट ठेवून त्याभोवती पारंपरिक नृत्य केले जाते. यंदा घटस्थापनेचा मुहूर्त १५ ऑक्टोबर रोजी आहे. पण ही घटस्थापना नेमकी कशी करतात? त्यासाठी काय तयारी करावी लागते? याबद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

घटस्थापना कशी करावी?

नवरात्रीत सर्व प्रकारची शुभ कार्ये करता येतात. या दिवशी देवी भक्तांच्या घरी येते. घटस्थापना करुन तिची पूजा केली जाते. घटस्थापनेकरता हळद-कुंकू, नागवेलीची पाने, सुपारी, नारळ, दुर्वा, पाच फळे, कापसाची वात, चौरंग, तांदूळ, हळकुंड, देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो. ज्वारी, किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य(मूग, मसूर, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तांदूळ), देवीची ओटी, अखंड नंदादीप, निरांजन, कापूर, उदबत्ती, धूपबत्ती, नैवेद्य हे सर्व साहित्य असावे लागते.

ईशान्य दिशा हे पूजेसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. त्यामुळे या दिशेला कलश ठेवून घटस्थापना करावी. सर्वात आधी मातेची मूर्ती लाकडी चौकटीवर किंवा आसनावर बसवावी आणि तिथे स्वस्तिक चिन्ह बनवावे. त्यानंतर रांगोळी व अक्षता यांचे मिश्रण करून तेथे मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. यानंतर मातीवर कलश ठेवावा. आंब्याची पाने कलशात ठेवावीत. सुपारी, काही नाणी, तांदूळ, दुर्वा, हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे.

कलशाच्या आठही बाजूंनी हळदी-कुंकवाची बोटे ओढावीत. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा. कलशावर नारळ ठेवताना नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये हे ध्यानात ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळावे.

कलशाची स्थापना करुन त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तदभावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात. ही पहिल्या दिवशी करुन नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो. अशा प्रकारे घटस्थापना करुन नवरात्र साजरी करतात.

महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये नव्या गोष्टी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे या काळात लोक अनेक गोष्टींची खरेदी करतात. गुजरातमधील गरबा आणि दांडिया महाराष्ट्रात खूप प्रसिध्द आहे त्यामुळे महाराष्ट्रात गरबा आणि दांडिया नाईटचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रमध्ये पांरपरिक पद्धतीने भोंडला खेळला जातो. मध्यभागी हत्ती मूर्ती किंवा चित्र काढून फेर धरून गाणी गायली जातात. यालाच भुलाबाई किंवा हादगा म्हणूनही ओळखले जाते. अशा प्रकारे नऊ दिवस आनंदात व उत्साहात नवरात्र साजरी केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -