Friday, May 10, 2024
Homeमहत्वाची बातमीदेशानं रत्न गमावलं!

देशानं रत्न गमावलं!

दत्तात्रय शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानं भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण १३ जणांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल. तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं झालेल्या या अपघातामध्ये भारतानं एक रत्न गमावलं आहे. अशा प्रकारची भारताच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती हीच भारताच्या इतिहासातली खूप मोठी गोष्ट होती. त्या आधी भारतात हे पदच नव्हतं. त्यामुळेच ही एक ऐतिहासिक घटना मानली गेली. योग्यता पाहूनच केंद्र सरकारनं या अतिशय महत्त्वाच्या पदासाठी त्यांना निवडलं होतं. प्रथमच संरक्षण मंत्रालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स या नावाचं डिपार्टमेंट उघडलं गेलं आणि बिपीन रावत त्याचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात अनेक मोठ्या सुधारणा बघायला मिळाल्या.

 शेकटकर कमिटी रिपोर्टमध्ये केंद्र सरकारला काही बाबी सुचवण्यात आल्या होत्या. त्यातच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पद ठेवण्याविषयीच्या सूचनेचा अंतर्भाव होता. या समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघताना या पदी कोणाची निवड करायची, हे आम्ही सुचवलं नव्हतं. तो निर्णय सरकारवर सोपवण्यात आला होता, मात्र हे पद आवश्यक असल्याचं या समितीनं निदर्शनास आणून दिलं होतं. याची दखल घेत केंद्र सरकारनं तत्काळ हे पद निर्माण करून बिपीन रावत यांची नियुक्ती केली. त्याअन्वये त्यांच्यावर हवाई दल, नौदल, पायदळ आणि तटरक्षक दल या सगळ्यांच्या कामामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आली. मुख्य म्हणजे, या पूर्वी हे पदच अस्तित्वात नसल्यामुळे ही जबाबदारी पेलण्याचं शिवधनुष्य खूप मोठं होतं. मात्र बिपीन रावत यांनी ते खंबीरपणे उचललं.

मागच्या वर्षी चीननं गलवानमध्ये आगळीक केली, त्यांच्या हल्ल्यात आपले काही जवान शहीद झाले, तेव्हा घटनेच्या अवघ्या दोन तासांच्या आत बिपीन रावत स्वत: तिथे पोहोचले होते. त्यांच्याबरोबर सेनाध्यक्षही होते. इतक्या कमी वेळेत इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती घटनास्थळी पोहोचण्याची घटना या पूर्वी कधीही घडली नव्हती. यालाच आपण कर्तव्यनिष्ठा म्हणतो. त्यांच्या त्या कृतीतून देशाप्रतीची निष्ठा दिसलीच, त्याचबरोबरच देशाची काळजीही दिसली. त्या घटनेनंतर त्यांनी अतिशय कडक सूचना दिल्या. त्याच्या अनुरूप सैन्याध्यक्षांच्या निर्देशानुसार रातोरात भारतीय सैन्यानं अशा जागी कब्जा केला, ज्याची चीननं कधीही कल्पना केली नव्हती. त्या जागेचा चीननं कधी विचारही केला नव्हता, तिथे आपण पोहोचलो. थोडक्यात सांगायचं तर, अशी दक्ष लोकं सैन्यामध्ये, सैन्यव्यवस्थेमध्ये येतात, तेव्हा जग त्या व्यवस्थेकडे आदरानं पाहू लागतं. ती व्यक्ती जगाची आपल्याकडे पाहण्याची नजर बदलवून टाकते. साहजिकच देशाच्या गौरवात भर पडते. बिपीन रावत यांनी भारताला हा गौरव मिळवून दिला. म्हणूनच त्यांचं अपघाती निधन धक्का देऊन जाणारं आहे.

मागच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर भारतानं मिळवलेलं मानाचं स्थान प्रकर्षानं दिसून येतं, यामध्ये रावत यांचं मोलाचं योगदान मान्य करावं लागेल. अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती भारतात येऊन गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्रीही होते. याचप्रमाणे आधी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांनी भारताला भेटी दिल्याचं आपण पाहिलं आहे. या देशांच्या उच्चपदस्थांच्या मनात भारताप्रती आदर आणि भारताच्या योग्यतेप्रती खात्री असल्याखेरीज हे घडणं शक्य नाही. याचं श्रेय बिपीन रावत यांच्याकडेच जातं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, त्यांच्या कार्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. आज अनेक देश भारताच्या वाटेला जाऊ नका, असं म्हणताना दिसतात. आजचा भारत दहा वर्षांपूर्वी होता तसा राहिलेला नाही, हे अनेक देशांनी आता मान्य केलं आहे. या बदलाचं श्रेयही केंद्र शासनाबरोबर आपल्या सेना अधिकाऱ्यांकडे जातं. त्यातलं एक नाव बिपीन रावत हे होतं. दुर्घटनेत आपण इतकं मोठं नाव गमावलं आहे. एखाद्या देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पत्नीसवे अपघाती निधन होण्याची घटनाही जगात पहिलीच आहे. हे देखील दुर्दैव म्हणावं लागेल.

हा अपघात घडलेल्या भागात एक वर्ष वास्तव्य केल्यामुळे मला तो परिसर पूर्णपणे परिचित आहे. पुणे-मुंबई प्रवासात लोणावळा, खंडाळा, खोपोली अशी पर्वतक्षेत्र लागतात, तशीच भौगोलिक रचना त्या भागातही पाहायला मिळते. हा अपघात झाला त्या कुन्नूर भागात अचानक वादळ येतं. अचानक वाऱ्याचा वेग वाढतो. मागच्या पाच-सहा दिवसांमध्ये या भागात मोठा पाऊसही झाला. वादळी स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून हवामान बिघडलं होतं. त्यामुळेच हेलिकॉप्टर भरकटलं आणि दुर्घटनाग्रस्त झालं. खरं पाहता अशा धोकादायक स्थितीमध्ये विमान अथवा हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी दिली जात नाही. अगदी ऐनवेळीही उड्डाणं रद्द केली जातात. मात्र सदर घटनेमध्ये अगदी अचानक पर्यावरणीय बदल घडून आल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच सगळी खबरदारी घेऊनही हा अपघात घडला, ज्यामध्ये देशानं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व गमावलं. त्यांची उणीव कायमच जाणवत राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -