Thursday, May 9, 2024
Homeमहत्वाची बातमीमुत्सद्दी सेनानायक 

मुत्सद्दी सेनानायक 

अनिल आठल्ये, (निवृत्त कर्नल)

जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे एका मोठ्या पर्वाचा अंत झाला, असं म्हणावं लागेल. ऐतिहासिकदृष्ट्या शांतता काळामध्ये सर्वसाधारणपणे सैन्यप्रमुखांची भूमिका गौण असते; परंतु जनरल रावत याला अपवाद होते. त्यांच्याच काळात सीएसएस म्हणजे तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख हे पद निर्माण केलं गेलं आणि ते पद भूषवण्याची प्रथम संधी जनरल रावत यांना मिळाली. त्या दृष्टीने भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात त्यांचं नाव नक्कीच नोंदवलं जाईल. आजवर आपण लढलेल्या सर्व लढायांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याचं नेहमीच दिसून आलं. जनरल रावत यांनी सीडीएस पदावर राहताना, हा अभाव दूर करण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला. अर्थातच, त्यामध्ये त्यांना बऱ्याच टीकेलाही तोंड द्यावं लागलं. उदाहरणार्थ, हवाई दल हे सेनेला मदत करणारं एक अंग आहे, असं वक्तव्य करून त्यांनी अनेक लोकांचा मुखभंग केला होता; परंतु आपण सत्य बघितलं, तर लष्कर तसंच नौदल या दोन्ही दलांना हवाई दलाची मदत नक्कीच लागते. पण हवाई दल स्वत:हून लढाई कधीच लढू शकत नाही. कारण हवेत राहून आपण ना काही जिंकू शकतो, ना काही ठेऊ शकतो. हे सत्य दुसऱ्या महायुद्धापासून समोर आलं आहे; परंतु सत्य हे आहे की, अनेकदा सैन्याच्या तिन्ही अंगांमध्ये असणारे अंतर्गत वाद हा प्रकार अतिशय महत्त्वाचा ठरतो. बाहेर त्याची विशेष वाच्यता होत नाही; परंतु हे प्रकार घडतात हे सत्य आहे. त्यामुळे या सगळ्या समस्यांना सामोरं जाऊन जनरल रावत यांनी आपल्या दोन एक वर्षांच्या कालावधीत तिन्ही सैन्यांचं एकत्रिकरण करून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल इतिहास आणि देश नक्कीच त्यांची आठवण ठेवेल.

सीडीएस किंवा तिन्ही सेनांचा प्रमुख म्हणजे सैन्य दलांच्या पाठीचा कणा आणि हे पद म्हणजे एक प्रकारे राजकीय आणि लष्कराचं मिश्रण आहे. त्यामुळे अनेकदा जनरल रावत यांनी राजकीय गोष्टींवर भाष्य केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की, युद्धाचं उद्दिष्ट हे नेहमीच राजकीय असतं! आपल्या इथे आतापर्यंत असं पद निर्माण केलं गेलं नव्हतं. त्यामुळे या पदाच्या मर्यादा किंवा या पदाचं महत्त्व किवा या पदावरील व्यक्तीची नेमकी भूमिका काय याबद्दल आपल्या राजकीय लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे काही कारण नसताना जनरल रावत यांना विशेषकरून विरोधी पक्षांकडून सतत टीकेला सामोरं जावं लागलं. त्यांच्याविरोधात अत्यंत चुकीची भाषाही वापरण्यात आली.

देशाचे पंतप्रधान कधीच दुसऱ्या देशाला धमक्या देत नाहीत. शत्रूला धमक्या देणं, हे तिन्ही सैन्य दलांच्या लष्करप्रमुखांचं काम असतं आणि हे काम जनरल रावत करत होते, यात अजिबात शंका नाही; परंतु आपल्याकडे अद्यापही गर्भित गोष्टी विरोधकांच्या पचनी पडल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनाठायी टीकेला सामोरं जावं लागलं. जनरल रावत यांच्या अनेक निर्णयांमुळे सैन्यातल्या काही लोकांचे हितसंबंध दुखवले गेले. त्यामुळे काही सैन्य अधिकाऱ्यांनी आणि त्यातही निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या एकंदर कारकिर्दीचा विचार केला, तर चीन, पाकिस्तानचं आव्हान, अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली स्थिती अशा अत्यंत कठीण प्रसंगी जनरल रावत यांनी तिन्ही सेनांचं उत्कृष्ट प्रकारे नेतृत्व करून देशाची खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आजही स्थिती फारशी सुधारलेली नाही. देशापुढे अनेक धोके आहेत. अशा वेळेला भविष्यकाळात त्यांच्यासारख्या खंबीर आणि रोखठोक अशा नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -