Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअभ्यास आणि उपासना

अभ्यास आणि उपासना

प्रासंगिक: स्वाती पेशवे

नव्या शालेय वर्षाच्या प्रारंभाचा हा काळ पावसाच्या आगमनाइतकाच महत्त्वपूर्ण… पाऊस जलधारांची शपण करतो तर शाळेमध्ये शिकवले जाणारे विषय मुलांच्या मनात विचारांची रुजवण करतात. ज्ञान, बुद्धी, शास्त्र, उपयोजन, उपयुक्तता या सर्व पातळ्यांवर त्यांना समृद्ध करतात. म्हणूनच शिक्षणाचे प्रत्येक वर्ष ज्ञानाची एक एक पायरी चढत विद्यार्थ्याला महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचवते. अर्थातच याचा पाया पक्का असायला हवा.

एकीकडे पावसाची सुरुवात तर त्यालाच लागून येणारी दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर होणारी नवीन शालेय वर्षाची सुरुवात. या दोन्ही बाबी हातात हात घालूनच येतात. अलीकडे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्रवेश आणि अभ्यासाला आलेले अपरंपार महत्त्व लक्षात घेता हा काळ आरंभ आणि स्थिरावण्यात कसा व्यतित होतो, तेच समजत नाही. अगदी बालवाडीतील प्रवेशापासून महाविद्यायलयीन पातळीपर्यंत प्रवेशाची वाढती लगबग, आवडीच्या, ख्यातकीर्त आणि घराजवळच्या व खिशाला परवडणाऱ्या शिक्षसंस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची होणारी लगबग आदी बघून जणू काही आखुडशिंगी आणि बहुदुधी धेनू शोधण्याइतक्या गंभीर व काही प्रमाणात अशक्यप्राय भासण्याच्या पातळीवर हा सगळा प्रकार सुरू असल्याचेही कधीकधी वाटून जाते. लहानांपासून पौंगडावस्थेपर्यंत वा त्यापुढची एखादी-दुसरी पायरी ओलांडलेली सर्व वयोगटातील मुले नव्या वर्गात, नव्या वातावरणात थोडीफार बुजतात पण काही दिवसांमध्ये वातावरणाला सरावतात. सरावण्याचा हा काळ काहीसा बावचळलेला, बराचसा उत्सुकतेने भारलेला आणि नवे काही शिकण्याच्या असोशीमध्ये रममाण झाल्याचा असतो. तेव्हा पावसाबरोबर या काळाचे स्वागत…

सध्या शिक्षणक्षेत्र अनेकानेक कारणांमुळे चर्चेत आहे. शिक्षणक्रमांमध्ये होऊ घातलेले महत्त्वपूर्ण बदल, परीक्षापद्धतींमधील बदल, गुणपडताळणीतील बदल यापासून पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषयांपर्यंत अनेक बाबी चर्चेत आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी वादग्रस्त मुद्दे असल्यामुळे त्यावर सविस्तर चर्चा होत राहते. मात्र या सगळ्यात लहानग्यांना घडवणारा हा काळ बराच बदलल्याचे जाणवते. अगदी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी मुलांचे फुले देऊन स्वागत करणे, त्यांना औक्षण करणे, शाळा सजवणे आदी बाबी लहान- मोठ्या शाळांमध्ये पाहायला मिळतात. विविध बोर्डाच्या शाळांमध्ये हा समारंभ भव्य ते अतिभव्य प्रमाणात पार पडताना दिसतो. शालेय उपयोगाच्या वस्तूंची मोठी आवश्यकता आणि उपलब्धता या बाबीही अलीकडे लक्षवेधी ठरतात. एकंदरच हे सगळेच वातावरण अनोखा उत्साह निर्माण करून जाते, असे आपण म्हणू शकतो.

शाळेची, शिक्षणाची, अध्ययनाच्या एका नव्या वर्षाची सुरुवात हा सरस्वती उपासकांसाठी नवा पाठ असतो, एक नवा अध्याय असतो. ते एक नवे आवर्तन असते. या वर्षभराच्या काळात विविध विषयांचे नवे आयाम समोर येतात, त्याचे आकलन करून घेण्याची संधी मिळते, विविध शाखांमध्ये डोकावण्यासाठी नवनवीन कवाडे खुली होतात आणि विद्याशाखांच्या दालनांमध्ये मनमुराद भ्रमंती करण्यासाठी संपूर्ण वर्षभराचा काळ समोर उभा ठाकतो. भारतीय संस्कृती विद्वजनांना वेगळे स्थान देणारी आहे. इथे लक्ष्मीपूजकांपेक्षा सरस्वतीपूजकांचा नेहमीच सन्मान होत आलेला आहे. धनाचा नव्हे तर बुद्धीचा साठा व्यक्तिमत्त्वाला अनोखी झळाळी देतो असे मानणारा एक समाज भारताने पाहिला आणि आजही संपूर्ण नाही पण समाजातील ठरावीक वर्ग नक्कीच या मताचा पुरस्कर्ता आहे. कोणीही चोरून न नेऊ शकणारी, वाटल्याने वृद्धंगत होणारी ही संपत्ती असणाऱ्या व्यक्तीच्या पायाला हात लावणारा एक वर्ग आजही समाजात संस्कारांची आणि भारतीय सभ्यतेची ओळख सांगताना दिसते. म्हणूनच शाळा या वास्तूकडे केवळ पंचतारांकित इमारत म्हणून नव्हे तर ज्ञानमंदिर म्हणून पाहिले जाते.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा गजबजताना पाहताना विचारांची ही मालिका तरळून जाते आणि शिक्षणक्षेत्रापासून दूर जाऊन बरीच वर्षं लोटली तरी मन भूतकाळाच्या गाभ्यात शिरून मनमुराद हुंदडून येते. असे असले तरी शिक्षणव्यवस्थेची आजची स्थिती मात्र अत्यंत केविलवाणी आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. एखाद्या विषयाचा चावून चोथा व्हावा तसे काहिसे यासंबंधी झाले आहे. पण देशाच्या भावी नागरिकांशी, त्यांच्या जडणघडणीशी, सर्वांगीण विकासाशी संबंधित असणाऱ्या या विषयाला हात घालणे क्रमप्राप्त ठरते. त्याकडे दुर्लक्ष करून चालतच नाही. सुरुवात होते अगदी आपल्या घरापासून. एक अथवा दोन मुले असणाऱ्या आजच्या घरांमधले विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या दृष्टीने मालामाल आहेत. न मागताच सगळे काही समोर हजर होण्याच्या या काळात त्यांना कुठल्याच गोष्टीची ददात नाही.

सगळेच नव्हे, पण बहुतांश विद्यार्थी याबाबत नशीबवान आहेत. इंटरनेटमुळे माहितीचे मायाजाल लहानपणापासून त्यांची सोबत करते. विविध विषय शिकवण्यासाठी सज्ज असणारे शाळेतील शिक्षक, क्लासेस आणि ट्युशन्समधील प्राध्यापक, गाईड्स-वर्कबूक्सच्या माध्यमातून अप्रत्यक्ष साथ देणारे अभ्यासक आणि संशोधक या सर्वांमुळे शिक्षणवाटांवरची ओबडधोबड वळणे संपून रस्ते अगदी गुळगुळीत झाले आहेत. मात्र दाही दिशांनी येणाऱ्या माहितीच्या या पुरात पिण्यायोग्य पाणी किती हा प्रश्न उरतोच. या सगळ्या माध्यमातून हवी ती, हवी तेवढी माहिती मिळते पण त्यातून ज्ञान किती मिळते हा खरा प्रश्न आहे. आजच्या या परिस्थितीत आपली मुले ज्ञानसंपन्न होतात की, माहितीवाहक याचाही विचार करायला हवा.

पालक म्हणून मुलांना घडवताना, त्यांना ज्ञानार्जनाच्या विविध संधी उपलब्ध करून देताना प्रत्येकाने या वेगवेगळ्या परिक्षेपातून विचार करणे गरजेचे आहे. आज किती तरी घरांमधून वह्या-पुस्तकांना कव्हर घालण्यापासून टाईमटेबलप्रमाणे वह्या-पुस्तके दप्तरामध्ये भरून देण्यापर्यंत बहुतांश कामे पालक अथवा मदतनीसाकडून होतात. मुलांना कामाचा अनुभव मिळावा यानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट्सचे काम घरांमधील वडीलधारी मंडळीच करताना दिसतात. मुलांच्या प्राथमिक संकल्पना स्पष्ट आहेत की नाही हे न बघता त्यांच्यावर नव्या संकल्पनांचा भडीमार केला जातो. मुलं ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ या न्यायाने पुढे जात असल्यासारखी भासतात, पण मुळात त्यांची प्रगती किती आणि कशी होते हा पुन्हा एकदा वादाचा प्रश्न ठरतो. आज पालकांमध्येही ही जागृती नाही आणि मुलांमध्ये तर नाहीच नाही.

मुलांमध्ये शिक्षणाची आस्था अभावानेच दिसून येते. आपण काय शिकतोय, का शिकतोय आणि शिकतोय त्याचा उपयोग कशासाठी करायचा, त्यातून काय मिळणार हेच माहीत नसल्यामुळे त्यांची संभ्रमावस्था संपत नाही. पालथ्या घड्यावर पाणी ओतावे त्याप्रमाणे ज्ञानगंगा त्यांच्या ज्ञानकोशिकांवरून ओघळून जाते आणि बुद्धीची शुष्कता घेऊन हा वर्ग व्यवहारी जगात प्रवेश करतो. अशा वेळी बुद्धीचा ओलावा नसल्याने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवातीपासून तडे जाऊ लागतात. नियतीने साथ दिल्यास पाट्या टाकून पैसे मिळत असले तरी कामाचे समाधान न मिळाल्याने ते अतृप्तच राहतात. आपल्या पाल्याबाबत ही स्थिती उद्भवणे नको असेल तर या प्राथमिक पातळीपासून काळजी घ्यायला हवी.

शरीर पोषित होण्यासाठी भौतिक गरजांच्या पूर्ततेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे मन पोषित होण्यासाठी समर्थ आणि सशक्त विचारांची आवश्यकता असते. विद्याभ्यास केवळ चरितार्थाचे साधन मिळवून देत नाही तर जगात कसे वावरायचे याचे धडेही देतो. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विद्याभ्यासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मुख्य म्हणजे विद्या केवळ पुस्तकातून नव्हे तर व्यवहार ज्ञानातूनही मिळते. विद्येचे सान्निध्य व्यक्तीला सहिष्णू, संवेदनशील, विचारी आणि विवेकी बनवते. त्यामुळेच शिक्षणाकडे एकाच अंगाने न बघता अशा सर्व अंगाने बघायला हवे. मुख्य म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाकडेही लक्ष द्यायला हवे. पुस्तकांमध्ये विद्या असते म्हणून त्यांची पूजा करायची आणि चुकून पाय लागला, तर नमस्कार करायचा, हा वरकरणी बाळबोध विचार वाटतो. पण, यातून प्रतित होणारा विचार मुलांना माणूस म्हणून श्रेष्ठ बनवतो. म्हणूनच शिक्षणात भावनेचा ओलावाही हवा. सध्या एकूणच समाजातील भावनिक ओलावा कमी होत असण्याच्या पार्श्वभूमीवर पालक आणि शिक्षकांनी या दृष्टीने विचार करायला हवा.

शिक्षणाने वैचारिक प्रगल्भता वाढायला हवी. तौलनिक अभ्यासाची प्रेरणा मिळायला हवी. समाजाला आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठीची धडपड कृतीतून जाणवायला हवी. वाचन, मनन या पातळ्या पार करून आतपर्यंत मुरलेले ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ जाणवायला हवी. वैयक्तिक विकास, पैसा-प्रसिद्धी-नावलौकिक आदींची प्राप्ती या उद्दिष्ट्यांशिवाय देशासाठी आपले ज्ञान उपयुक्त ठरावे हा विचार अंगी बाणवायला हवा. पूर्वीच्या पिढीने या जाणिवेने शिक्षण घेतले म्हणूनच ज्ञानाचा प्रवाह त्यांच्यापाशी न अडता प्रवाही झाला. समाजापुढे आदर्श निर्माण झाले. त्यानंतरच्या कैक पिढ्या आदर्श निर्माण करण्यात कमी पडल्या आहेत. नव्या पिढीने तरी या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. तिने आदर्शांचे पालक करण्याबरोबर आदर्श निर्माण करण्याची आस धरावी आणि पुढे चाल घ्यावी. शालेय वर्षाच्या सुरुवातीला कोणीही सहिष्णू व्यक्ती हाच विचार करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -