Wednesday, June 26, 2024
Homeदेशराज्य भाजपात होणार संघटनात्मक फेरबदल; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक

राज्य भाजपात होणार संघटनात्मक फेरबदल; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक

भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात भाजपाचे मिशन ४५ प्लसचे स्वप्न भंगले. महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळाले. त्यात भाजपाला २३ जागांवरून आता अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला. राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत राज्यातील भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकसभा निकाल आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यावर चर्चा होणार आहे.

भाजपातील केंद्रीय नेतृत्वासोबत ही बैठक पार पडणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही चर्चा होईल. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उद्या दिल्लीला जातील. त्याठिकाणी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात बैठक होईल. नुकतेच महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली त्याचसोबत मला सरकारमधून मुक्त करावे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली. फडणवीसांच्या या निर्णयावर भाजपा नेतृत्व मंगळवारी (दि. १८ जुन) विचारमंथन करेल. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहतील.

राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात विरोधकांना यश आले, संविधान बदलले जाणार ,असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. पहिल्या तीन टप्प्यात हा प्रचार अधिक झाला, त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांपैकी केवळ ४ जागाच आम्हाला जिंकता आल्या. मात्र उर्वरित टप्प्यात विरोधकांच्या या खोट्या नॅरेटिव्हला रोखण्यात महायुतीला यश आले. त्यामुळे त्यानंतरच्या २४ जागांपैकी १३ जागांवर महायुती विजयी झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपाने या चार राज्यांसाठी नवीन निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी म्हणून काम पाहतील. हरियाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी बनवण्यात आले आहे, तर विपलव कुमार देव सहप्रभारी असतील. शिवराज सिंह चौहान झारखंडचे प्रभारी असतील. त्यांच्या मदतीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि सहप्रभारी म्हून काम पाहतील. यासोबतच जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. नायबसिंग सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे यावेळी काँग्रेसचेही मनोबल उंचावले आहे. त्यांनी हरियाणात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -