Monday, May 27, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईतील २८ पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश

मुंबईतील २८ पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश

मुंबई : बृहन्मुंबई उपनगरीय पोलिस अधिक्षक, पोलिस उपायुक्त स्तरावरील २८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. काही अधिकारी नियु्क्तीच्या प्रतिक्षेत होते, त्यांना आता त्यांच्या नियुक्तीच्या नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मविआ सरकारच्या काळात ज्यांना मुंबईबाहेरची साईड पोस्टिंग देण्यात आली होती, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.

अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ ३ या ठिकाणी करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलिस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांची देखील नावे होती.

मविआ सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर साईड पोस्टिंग केली होती. तर मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र यापैकी एका गुन्ह्यात नाव आल्याने काही अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यानंतर मणेरे, पठाण आणि देवराज हे तिघे अधिकारी एकदम भूमिगत झाले. आता कुठेही त्यांच्या नावाची चर्चा नसताना राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच या तिन्ही अधिकाऱ्यांच्या पंखांना पुन्हा बळ देण्यात आलं. रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट दिल्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई करणं तर बाजूलाच राहिलं, उलट या अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करून त्यांच्यावर कृपादृष्टी दाखविली अशीच चर्चा पोलिस वतुर्ळात रंगली आहे. यांच्यामुळे खालचे अधिकारी लटकल्याचं चित्र आहे. पण उपायुक्त दर्जाचे मणेरे, पठाण आणि देवराज यांना पुन्हा चांगल्या पोस्टिंगवर नियुक्ती करण्यात आली. हे म्हणजे एकप्रकारे खालच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत कृष्णकांत उपाध्यय यांची गुन्हे शाखा, बालासिंह राजपूत यांची सायबर गुन्हे, प्रशांत कदम यांची गुन्हे शाखा, राजू भुजबळ यांची वाहतूक पूर्व उपनगरे, विनायक ढाकणे यांची सशस्त्र पोलिस नायगाव, हेमराज राजपूत यांची परिमंडळ ६, संजय लाटकर यांची बंदर परिमंडळ, डी एस स्वामी यांची गुन्हे शाखा अंमलबजावणी, प्रकाश जाधव यांची अमली पदार्थ विरोधी कक्ष, प्रज्ञा जेडगे यांची सशस्त्र पोलिस ताडदेव, योगेशकुमार गुप्ता यांची जलद प्रतिसाद पथक, शाम घुगे यांची सुरक्षा, नितीन पवार यांची सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कलिना, अभिनव देशमुख यांची परिमंडळ २, अनिल पारसकर यांची परिमंडळ ९, एम राजकुमार यांची मुख्यालय १, मनोज पाटील यांची परिमंडळ ५, गौरव सिंह यांची वाहतूक दक्षिण, तेजस्वी सातपूते यांची मुख्यालय २, प्रविण मुंढे यांची परिमंडळ ४, दिक्षीतकुमार गेडाम यांची परिमंडळ ८, मंगेश शिंदे यांची वाहतूक पश्चिम उपनगरे, अजयकुमार बन्सल यांची परिमंडळ ११, मोहित कुमार गर्ग यांची गुन्हे शाखा, पुरुषोत्तम कराड यांची परिमंडळ ७ आणि अकबर पठाण यांची परिमंडळ ३ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -