Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीRatnagiri news : मौजमजा जीवावर बेतली! आरे-वारे समुद्रकिनारी चारजण बुडाले

Ratnagiri news : मौजमजा जीवावर बेतली! आरे-वारे समुद्रकिनारी चारजण बुडाले

तिघांना वाचवण्यात यश तर एकाचा बुडून मृत्यू

राज्यात बुडण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत राज्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भावली, प्रवरा, नाशिक, सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमुळे मोठी जीवितहानी झाली. त्यातच आणखी एक दुर्घटना रत्नागिरीतून (Ratnagiri news) समोर आली आहे. रत्नागिरीतील स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात मात्र याच ठिकाणी केलेली मजा एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. सागरी पर्यटनासाठी (Marine tourism) रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनारी (Aare ware beach) आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबियातील चौघेजण समुद्रात बुडाले. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले तर एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

देवदर्शनासह सुट्टीतील मौज-मजा करण्यासाठी पुण्यातील गाडेकर कुटुंबीय रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रकिनारी आले होते. मात्र, त्या दरम्यानच चौघेजण समुद्रात बुडाले. त्यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले आहे. तर पंकज रामा गाडेकर (वय ३३ राहणार पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी गेले होते. विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्याने त्या समुद्रात न जाता गाडेकर कुटुंबीय आरे- वारे समुद्र किनारी दाखल झाले.

सुमारे साडेपाच वाजता गाडेकर कुटुंबीयातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेल्या लाटेने पंकज गाडेकर लाटेबरोबर आत ओढले गेले. ते आत जात असल्याचे लक्षात येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. यावेळी तेही पाण्यात बुडू लागले.

यावेळी किनाऱ्यावर असलेल्या व त्यांच्यासमवेत आलेल्या मुले, महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला, परंतु रुग्णवाहिका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले.

सागरी पर्यटनावर बंदी

काही दिवसांपासून समुद्राची वाढणारी पातळी आणि समुद्रकिनारी बुडण्याचा धोका लक्षात घेऊन ३१ मे पर्यंत सागरी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. तरी सर्वांनी यांची नोंद घेऊन समुद्रकिनारी जाणे टाळावे, असं आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -