Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीDuniyadari : नितेश राणे यांची 'ती' मदत आणि दुनियादारी चित्रपट झाला सुपरहिट!

Duniyadari : नितेश राणे यांची ‘ती’ मदत आणि दुनियादारी चित्रपट झाला सुपरहिट!

चित्रपटाच्या रि-रिलीजच्या निमित्ताने जागी झाली नितेश राणेंची एक खास आठवण

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi Cinema) अत्यंत गाजलेल्या सिनेमांपैकी ‘दुनियादारी’ (Duniyadari) हा एक सिनेमा आहे. दुनियादारी प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात त्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. मराठीतील उत्तमोत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या तितकेच लक्षात आहेत. दिग्या, श्रेया, शिरीन, मिनू या पात्रांना आणि त्यांच्यातील मैत्रीला प्रेक्षकांनी आपलंसं केलं. आजही या पात्रांवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत असतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर हा सिनेमा आजपासून पुन्हा एकदा थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) याने पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याच दरम्यान भाजपा आमदार व प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांची या चित्रपटाशी जोडलेली एक खास आठवण जागी झाली आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र ‘दुनियादारी’ तयार करताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाराष्ट्र कलानिधी’ या संस्थेनं चित्रपटाची मोठी मदत केली होती. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर आधारित ‘दुनियादारी’ चित्रपटात तरुणाईची कथा, कॉलेजचं जीवन दाखवण्यात आलं होतं. कॉलेजमधील बहुतांश शूटिंग ही पुण्यात झाली होती. पण पुण्यातील लोकेशन्सचा मोठा खर्च ते उचलू शकले नव्हते. त्यावेळेस नितेश राणे त्यांच्या मदतीला धावून आले होते.

संजय जाधव याविषयी सांगताना म्हणाले होते की, “माझा चित्रपट कॉलेज, तरुणाई आणि त्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. मला लोकेशन्सच्या बाबतीत तडजोड करायची नव्हती. आधी सांगलीचं एक कॉलेज आणि नंतर कोल्हापुरातील शालिनी पॅलेस ठरवलं होतं. पण तिथे शूटिंग होऊ शकलं नाही. नंतर मला पुण्यातील कृषी महाविद्यालयाचा परिसर त्यासाठी अगदी योग्य वाटला. पण या लोकेशनची एका दिवसाची फी तब्बल दोन लाख रुपये होती. आम्हाला तिथे पंधरा दिवस शूटिंग करायचं होतं. त्यामुळे संपूर्ण लोकेशनचा खर्च एका मराठी चित्रपटाच्या बजेटइतका होता.”

विशेष म्हणजे याच कॉलेजमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाची शूटिंग झाली होती. अखेर गुणवत्तेशी तडजोड होऊ न देता मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळावेत यासाठी नितेश राणे यांनी महाराष्ट्र कलानिधीची स्थापना केली. चित्रपट निर्मात्यांना लोकेशन्सच्या खर्चात मदत करण्यासाठी व्हिडीओकॉन कंपनी मिळाली, असं नितेश राणे यांनी सांगितलं. याच्याच माध्यमातून संजय जाधव यांना पुण्याच्या कॉलेजमध्ये यशस्वीरित्या शूटिंग करता आलं आणि त्यानंतर या चित्रपटाने जो इतिहास रचला तो सर्वश्रुत आहे.

दुनियादारी झाला सुपरहिट; रचले नवे विक्रम

१९ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच ‘दुनियादारी’चे सर्व शोज हाऊसफुल होते. निर्माते-दिग्दर्शकांना त्याविषयीचे सतत फोन कॉल्स येत होते. मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टिस्टारर चित्रपट ‘दुनियादारी’ने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते. २७० थिएटरमध्ये दररोज ७१० शोज आणि दर आठवड्याला ५ हजारांहून अधिक शोजचा या चित्रपटाचा विक्रम आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर यांसोबतच इतर बऱ्याच कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

पुन्हा प्रदर्शित होणार दुनियादारी

ठाणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, मरिन लाइन्स, हिंजेवाडी, बंड गार्डन रोज, अकुर्डी येथील थिएटर्समध्ये दुनियादारी हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. अंकुश चौधरीने याबाबत पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ‘११ वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… दुनियादारी’. यासोबतच या चित्रपटाचे शोज कुठे आणि किती वाजता असणार आहेच याबाबत त्याने एक पोस्टर शेअर केलं आहे. आता प्रेक्षक दुनियादारी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -