Tuesday, June 18, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वसोन्याच्या बाजारपेठेत काय घडतेय?

सोन्याच्या बाजारपेठेत काय घडतेय?

परामर्ष – हेमंत देसाई

ज्येष्ठ पत्रकार

सध्या जगातील वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत सुटल्या असल्या, तरी आगामी दोन तिमाहींच्या दरम्यान या खरेदीचा वेग घटेल, असा अंदाज आहे. मागील पाच वर्षांमध्येच भारतातील सोन्याचे भाव दुपटीपेक्षा जास्त झाले. आज अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. मात्र गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांच्या आमिषांपासून कर्जदारांनी सावधचराहिले पाहिजे.

प्रगतिशील, सुधारणावादी, विचारी आणि सर्वसमावेशक सरकारला सत्तेवर आणायचे की, १९९२ पूर्वीची अराजकसदृष्य व्यवस्था स्वीकारायची असे दोनच पर्याय देशापुढे आहेत. कोणताही गुंतवणूकदार दुसऱ्या पर्यायाला नापसंतच करेल, असे उद्गार देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) मुंबईतील मुख्य इमारतमध्ये ‘अॅन्मी’ या शेअर दलालांच्या संघटनेने आयोजित केलेल्या भांडवली बाजाराबाबतच्या परिसंवादात भाषण करताना त्यांनी हे विचार मांडले. मात्र दोन वर्षांपूर्वी एनएसईच्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांना ‘धांदली’ केल्याबद्दल अटक करावी लागली होती, याचे विस्मरण जयशंकर यांना झाले असावे. त्याचप्रमाणे ‘पेटीएम’सारख्या कंपनीबाबत काही आक्षेपार्ह घटना घडल्या होत्या. शेअर बाजारावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज ‘सेबी’ला वाटण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे केवळ १९९२ नंतरच नव्हे, तर २०१४ नंतरही गुंतवणुकीची बाजारपेठ बऱ्याचदा संकटात सापडली होती, हे विसरता कामा नये. सार्वत्रिक निवडणुकांनंतर स्थिर आणि समर्थ सरकार येईल का, यावर शेअर बाजारात तेजी की मंदी, हे अवलंबून असेल. परंतु केवळ शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि जमिनी-फ्लॅट्स एवढेच नव्हे, तर सोन्यातही लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

जगभर लोक सोन्यात गुंतवणूक करतात आणि भारतात नागरिकांची सोन्यामध्ये भावनिक गुंतवणूकही असते. मुला-मुलींच्या लग्नासाठी लोक सोने खरेदी करून ठेवतात. ऐपत नसतानाही प्रथा म्हणून सोने घेतात. तसेच संकटाच्या वेळी उपयोगी पडेल, म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते. गेल्या अडीच वर्षांमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीवर ५० टक्के ‘कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट’ मिळाला, अशी माहिती अॅक्सिस सिक्युरिटीजच्या वस्तू बाजार विभागाच्या तज्ज्ञांनी दिली आहे. यावेळी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतात सोन्याची तुफान खरेदी झाली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, त्याचप्रमाणे विवाह सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. गोल्ड एकस्चेंज ट्रेडेड फंडातही लक्षणीय प्रमाणात पैसे टाकले जातात. सध्या युक्रेन, गाझापट्टी अशा विविध ठिकाणी युद्धे सुरू असल्यामुळे बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे जगातील मध्यवर्ती बँका आपले सुवर्णसाठे वाढवत आहेत.

सोन्याचे भाव दहा ग्रॅमला ७० हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. मार्चमध्ये तर ते भाव ७३ हजार रुपयांवर गेले होते. शेअर्स आणि कर्जरोख्यांप्रमाणेच एकदा बाजाराने शिखर गाठले की सुवर्ण बाजारातही तांत्रिक घसरण होऊ शकते. तशी ती एप्रिलमध्ये झालीही. २०१४ मध्ये २४ कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये होती. ती २०१५ मध्ये २७ हजार रुपयांवर आली आणि नंतर मात्र २०१७ चा अपवाद वगळता, सातत्याने वाढत वाढत आजच्या पातळीवर आली आहे. विशेष करून २०२० मध्ये एकाच वर्षात सोन्याचे भाव ३१ हजारवरून ४६ हजार रुपयांवर गेले तर २०२३ मध्ये अंदाजे ५९ हजार रुपये असणारा भाव २०२४ मध्ये ७० ते ७३ हजारच्या आसपास गेला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोन्यावरील परतावा कमी होईल. याचे कारण, २०२४ च्या उत्तरार्धात अमेरिकेतील व्याजदर घटतील आणि नंतर डॉलर वधारेल. या सर्व पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरवाढीचा वेग मंदावेल, अशी शक्यता संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या जगातील वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत सुटल्या असल्या, तरी आगामी दोन तिमाहींच्या दरम्यान या खरेदीचा वेग घटेल, असा अंदाज आहे. सोन्यात निधी गुंतवल्यास सुरक्षितता आणि बऱ्यापैकी फायदा या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. मागच्या पाच वर्षांमध्येच भारतातली सोन्याचे भाव दुपटीपेक्षा जास्त गतीने वाढले आणि २००३ च्या तुलनेत दहापट अधिक आहेत. ज्या ज्या वेळी सोन्याच्या भावात घसरण होते, त्या त्या वेळी संधी मानून त्यात गुंतवणूक करता येऊ शकते. अर्थात सोने टप्प्याटप्प्याने आणि कमी मात्रेत खरेदी करणे इष्ट असते. शिवाय आपली गुंतवणुकीची अल्पकालीन तसेच मध्यम व दीर्घ कालावधीची उद्दिष्टे काय आहेत, याचाही विचार करावा लागतो. भारतात प्रत्येक घरात सोने साठवून ठेवलेले असते, ते अडीअडचणीला कामी येते म्हणून. भारतीय स्त्रियांना स्त्रीधन, सौभाग्यालंकार म्हणून सोन्याचे एक आकर्षणही असते. त्यामुळे बरेचदा गरज असतानाही घरातले सोने न विकण्याकडे त्यांचा कल राहतो. म्हणूनच एखाद्या कुटुंबावर बेरोजगारीची संक्रांत येते आणि उत्पन्नपातळी खालावते, तेव्हाच गोल्ड लोन्स किंवा सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यावर सर्वांचा भर असतो. आर्थिक संकटाच्या वेळी पटकन पैसे उभारण्याचा हा एक सहजसोपा मार्ग आहे.

या पार्श्वभूमीवर मुथुट, मणप्पुरम फायनान्ससारख्या कंपन्या फोफावलेल्या दिसतात. महानायक अमिताभ बच्चनला भरपूर मानधन देऊन जाहिरात करणेही अशा कंपन्यांना परवडते. कल्याण गोल्डसारखी कंपनी तर कॉर्पोरेट सुवर्णपेढीच आहे. सोने गहाण ठेवून, त्याच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज मिळू शकते. जेव्हा व्यक्तिगत वा गटकर्जे (अनसिक्युअर्ड लोन्स किंवा असुरक्षित कर्जे) ही उपलब्ध होत नाहीत, तेव्हा गोल्ड लोन्सची मागणी वाढते. बाजारात खूप अनिश्चितता असते, तेव्हा असुरक्षित कर्जे मिळत नाहीत. त्यावेळी गोल्ड लोन्सची मागणी जास्त असते. गोल्ड लोन अर्ध्या तासात मंजूर गेले जाते. या कर्जावर फक्त व्याज द्यायचे आणि मुदत संपताना मुद्दल फेडायचे, असा पर्याय उपलब्ध होत असल्याचे मार्केटिंग या कंपन्यांकडून केले जाते. या कर्जाची फेड झाली नाही तर ते सोने ताब्यात घेऊन लिलाव केला जातो. एके काळी मुंबईत मोठ्या संख्येत कापड गिरण्या कार्यरत होत्या. तेथे हजारो कामगार काम करत होते. परळ, लालबाग, शिवडी, चिंचपोकळी, भोईवाडा, सातरस्ता या परिसरात चाळींमधून मराठी कामगारांच्या वस्त्या होत्या.

त्यामुळे त्या परिसरात सराफांची संख्या लक्षणीय प्रमाणात होती. सोने विकण्यापेक्षा गहाणवटीचा व्यवसाय करणारे सोनार या भागात असत. आज बड्या बड्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. मात्र गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांच्या आमिषांपासून ऋणकोंनी सावधच राहिले पाहिजे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने जून महिन्यात व्याजदरात कोणताही बदल न केल्यास डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न वाढेल. त्यानंतर सोन्याच्या दरात आठ ते दहा टक्क्यांची घसरण दिसून येऊ शकते. फेडरल रिझर्व्हने जूनमध्ये व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आणि येत्या काही दिवसांसाठी व्याजदरांबाबत आपली भूमिका स्थिर ठेवली तरी सोन्याच्या किमतीत घट दिसून येईल. सोन्याच्या भावाने व्याजदरात कपातीचा फायदा घेतला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जून महिना सोन्यासाठी खूप मनोरंजक असणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जूनच्या बैठकीत सोन्याच्या दराचे भवितव्य ठरणार आहे. गेल्या १८० ते २०० दिवसांमध्ये सोन्याच्या दरात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा स्थितीत दरात सुधारणा अपेक्षित आहे; मात्र या दुरुस्तीसाठी कारक असा कोणताही घटक अद्याप समोर आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तणावापासून चीनची खरेदी आणि फेडरलकडून होणारी संभाव्य कपात सोन्याच्या भाववाढीला समर्थन देत असल्याचे दिसते. अशा स्थितीत जूनच्या बैठकीत फेडरल रिझर्व्हची भूमिका सोन्याच्या किमती ठरवेल. जूनमध्ये फेडरल रिझर्व्हची दरकपातीची शक्यता ५१.१ टक्क्यांवर आली आहे. याचा अर्थ फेडरल रिझर्व्हने जूनमध्ये व्याजदरात कोणतेही बदल न केल्यास सोन्याच्या किमतीत घसरण होईल. जूनच्या बैठकीत महागाईची आकडेवारी दाखवल्यानंतर फेडरल रिझर्व्हने दरावरील पॉज बटण पुन्हा दाबले तर सोन्याच्या किमतीमध्ये सुधारणेचा ट्रिगर दाबला जाईल आणि किमती आठ ते दहा टक्क्यांनी घसरतील.

याचा अर्थ सध्याच्या पातळीवरून सोन्याच्या दरात ६ ते ७ हजार रुपयांची घसरण दिसू शकते. म्हणजेच सोन्याचा भाव पुन्हा ६४ ते ६५ हजार रुपयांच्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. देशातील फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ७१ हजार ७३९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता, जो सोन्याचा नवा आजीवन उच्चांक ठरला. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे तर चालू वर्षात गुंतवणूकदारांनी सोन्याच्या किमतीत बऱ्यापैकी कमाई केली आहे. बँकांना त्यांच्याकडील सोने बाजारात आणायला भाग पाडले गेले आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दरकपातीची घोषणा केली नाही, तर सोन्याची झळाळी कमी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -