Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदक्षिणेतील हिंदूंना मोदींचा आधार

दक्षिणेतील हिंदूंना मोदींचा आधार

भारतीय राज्यघटना १९५० साली देशाला बहाल केली गेली. त्यावेळी सर्वधर्मसमभाव अर्थात सेक्युलर हा शब्द त्यात नव्हता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात सेक्युलर हा शब्द नंतर समाविष्ट केला. देश स्वतंत्र झाला, त्यावेळी पाकिस्तानची निर्मिती ही धर्माच्या आधारावर झाली होती. सेक्युलरची ढाल पुढे करून ७५ वर्षांनंतर भारतात राहणाऱ्या हिंदूंवर सातत्याने अपमानाची वागणूक देण्याचे काम सुरू आहे; परंतु हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर ‘ब्र’ काढण्याची ताकद मतांच्या लाचारीमुळे तथाकथित सेक्युलर राजकीय पक्षांकडे आजही नाही.

देशाच्या दक्षिण प्रांतात हिंदू देवदेवतांना मानणारा, पूजा-अर्चा करणारा मोठा वर्ग आहे. कन्याकुमारीपासून रामेश्वर येथील प्राचीन देवालये, देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान तिरूपती बालाजी अशी अनेक उदाहरणे देता येतील; परंतु दक्षिणेतील हिंदू हा संघटित नसल्याने त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी उठवला. सनातन हिंदू धर्माचा तिरस्कार करणारे परियारचे तत्त्वज्ञान हा गाभा येथील काही राजकीय पक्षांचा आहे. त्यातून डीएमके आणि काँग्रेससारखे पक्ष हे सातत्याने हिंदू धर्माला कमी लेखताना दिसतात.

हिंदूविरोधी बोललो, तरच त्यांना अन्य धर्मियांची मते मिळू शकतात, असा विश्वास वाटत असावा. तोच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमके, काँग्रेसवर प्रहार केला आहे. त्यामुळे मोदींच्या रूपाने दक्षिणेतील हिंदू धर्मियांना एवढ्या वर्षांत आपल्या बाजूने बोलणारा आधार लाभला आहे, असे वाटू लागणे स्वाभाविक आहे.

‘‘इंडिया आघाडीचे सदस्य असलेले काँग्रेस आणि डीएमके हे इतर कोणत्याही धर्माचा अपमान करताना आपण पाहिले आहे का?, ते इतर कोणत्याही धर्माविरुद्ध एक शब्दही उच्चारत नाहीत, पण हिंदू धर्माला तुच्छ लेखण्यास एक सेकंदही वाया घालवत नाहीत’’, ही बाब तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निदर्शनास आणून दिली. भारतीय जनता पार्टीचा दबदबा हा उत्तर भारतात आहे. दक्षिण भारतात भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जागा मिळतील, असे चित्र कर्नाटक विधानसभेतील भाजपा सरकार गमावल्यानंतर उभे करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित करून अनेक प्रचार रॅली तसेच विकासकामांचा शुभारंभ केला. देशाचा पंतप्रधान आपल्या भावना जाणून घेत आहे, अशी भावना आता दक्षिणेत दृढ होऊ लागली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये आश्चर्यकारक यश भाजपाला मिळाल्यास कोणाला धक्का बसू नये, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

तसे पाहिले, तर भाजपाने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी एक व्यूहरचना आखली. यामध्ये देशाची तीन प्रदेशांत विभागणी करून निवडणूक अभियान राबवण्याचे ठरले. तिन्हींची आखणी वेगळी असेल आणि धोरणही पूर्णपणे वेगळे राहील, असे त्यात ठरले होते. पहिला प्रदेश हिंदी पट्ट्यातील १० राज्ये, दुसरा ईशान्य आणि तिसरा दक्षिण भारत आहे. पक्षाने जागांच्या दृष्टीने तीन प्रदेशचा फॉर्म्युला तयार केला. तसेच गुजरात, पंजाब, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांसाठी स्वतंत्र धोरण आखण्यात आले आहे.

गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपैकी ८०% जागांवर विजयाचे अंतर वाढवणे. प. बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यांत जिंकलेल्या जागांची संख्या वाढवणे; तामिळनाडू, केरळ आणि आंध्रमध्ये कमीत-कमी ३० ते जास्तीत-जास्त ७० जागा जिंकणे, एनडीएची व्याप्ती वाढवण्यासाठी दक्षिणेत कनिष्ठ पक्ष बनण्यास हरकत नसणे, दक्षिणेत प्रभावशाली लोकांच्या माध्यमातून हिंदीवादी पक्ष ही प्रतिमा मोडून काढणे, यावर भर देण्यात येत आहे. दक्षिणेत लोकसभेच्या १३० जागा आहेत. येथील अस्मिता ‘दक्षिण गौरव’ ठेवून काम केले जात आहे. यात सांस्कृतिक व भाषिक मूल्यांचे रक्षण करणे, हिंदूंच्या मागास जातींना प्राधान्य देणे, धर्मांतर-तुष्टीकरण या मुद्द्यांवर प्रहार करणे आदींचा समावेश आहे.

संपूर्ण हिंदी पट्ट्यातच नव्हे, तर ईशान्य आणि पश्चिम भारतात गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शिखर गाठले आहे. यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ३०३ जागांचा आकडा गाठता आला. अशा परिस्थितीत, २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी ठेवलेले लक्ष्य दक्षिणेकडील राज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाशिवाय साध्य करणे सोपे नाही, हे ओळखून पंतप्रधान मोदींनी दक्षिणेकडील विशेषत: तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा या राज्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसले. या वर्षी जानेवारीपासून गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडूच्या चार दौऱ्यांसह दक्षिणेकडील राज्यांना अर्धा डझनहून अधिक भेटी घेतल्या आहेत. हिंदूंविरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आणि तेथील प्रादेशिक पक्षांवर जोरदार हल्ला करण्याची संधी पंतप्रधान मोदी सोडत नाहीत, त्यामुळे देशाच्या राजकारणाच्या पटलावर नवे रंग उगवण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

२०२४ मध्ये भाजपाने लोकसभेच्या ३७० जागा मिळवून एनडीएच्या ४०० जागांचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दक्षिणेतील हिंदूंना आधार देणारा नेता दृष्टिपथास आल्याने मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा राजकीय जनाधार मिळवू शकतो, हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -