Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकवितेच्या प्रांगणातील दरवळ

कवितेच्या प्रांगणातील दरवळ

लता गुठे, विलेपार्ले

जागतिक कविता दिवस  म्हणजे २१ मार्च. युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) या संस्थेच्या वतीने १९९९ मध्ये काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेचे समर्थन करणे व लुप्त होत चाललेल्या भाषांना पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. साहित्यातील काव्य हा प्रकार सर्वश्रेष्ठ मानला जातो, कारण पुरातन काळापासून साहित्य हे काव्याच्या द्वारे रसिकांपर्यंत पोहोचले आहे. रामायण, महाभारत, वेद, पुराणे ही सर्व काव्यरूपात लिहिली गेलेली आहेत.

जगभरातील  कविता  वाचक, कवी, प्रकाशन आणि अध्यापनाला प्रोत्साहन देणे आणि मूळ युनेस्कोच्या घोषणेनुसार, “राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय काव्य चळवळीला नवीन ओळख आणि प्रेरणा देणे” हा त्याचा उद्देश आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये कवितेच्या प्रांगणात मुशाफिरी करताना अनेक अनुभवांनी जीवन समृद्ध झाले आणि कविता ही माझ्या अंतरात्म्याचा आवाज बनली. पाहता पाहता ५०० पेक्षा जास्त कविता हातून लिहिल्या गेल्या आणि नऊ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यामुळेच की काय, मला अनेक जण म्हणतात, “तू हाडाची कवयित्री आहेस.”

शाळेच्या बाकावर बसून अभ्यासक्रमातील पाठ केलेल्या कविता आजही जशाच्या तशा आठवतात आणि उत्स्फूर्तपणे आपसूकच ओठांमधून बाहेर पडतात. ज्येष्ठ श्रेष्ठ कवी मर्ढेकर, केशवसुत, बा. भ. बोरकर, इंदिरा संत, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शांता शेळके अशा कितीतरी कवींच्या कवितांनी मनावर गारुड केले. बहिणाबाईंच्या अहिराणी बोलीतील अंगभूत लय असलेल्या कविता ऐकताना मन उल्हासित होतं.

येरे येरे पावसा, नाच रे मोरा, टप टप पडती अंगावरती, गवतफुला या कवितांनी तर अक्षरशः वेड लावलं आणि बालपणातील एक आनंदाचा ठेवा म्हणून या कविता मनाच्या अंगणात कायमच रेंगाळत राहिल्या. जरा मोठी झाल्यानंतर ओळख झाली ती बालकवींच्या श्रावणमासी, औदुंबर, कुसुमाग्रजांच्या स्वप्नाची समाप्ती, पृथ्वीचे प्रेमगीत, कणा, शांताबाईंची पैठणी या कविता अगदी जीवाभावाच्या झाल्या. याच कवितेच्या पाऊलखुणा माझ्या नव्या कवितेच्या प्रांगणात जाणवू लागल्या आणि सहजच कल्पनेला प्रतिमांचा नवा साज मिळाला. अलंकाराने कवितेचे भावविश्व सजले आणि एका एका कवितेतून जगण्याचं प्रतिबिंब कवितेतून अधोरेखित होऊ लागलं तेव्हा माझी प्रिय सखी कविता झाली… असं म्हणतात कविता ही विजेसारखी आहे. याचा प्रत्यय माझ्या पुढील ओळींमधून जाणवेल.

ऊर चिरत नभाचा जशी वीज कोसळावी
तशी भेट वेदनेची शब्दांतून मला व्हावी
तप्त शब्दांचे निखारे ओघळत गाली यावे
कवितेत कोरताना निखाऱ्याचे मोती व्हावे
कवितेचे शब्द जेव्हा कोऱ्या पानावर उमटतात तेव्हा कवितेची सुरेख लेणी तयार होते आणि त्या कवितेचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. मी जेव्हा कविता लिहीत असते तेव्हा सर्व जगाचा विसर पडलेला असतो. ही सृजनाची प्रक्रिया किती सुखकारक असते, ते नाही सांगता येणार. हे मात्र खरं कवितेची प्रक्रिया ही जीवघेणी असते. मनाच्या अंगणात शब्द घिरट्या घेऊ लागतात तेव्हा मन सैरभैर होतं. मनाची ती अवस्था कविता लिहायला भाग पाडते. एक – दोन ओळी सहजच येतात आणि मग पुढच्या ओळी काय येतील याचाही अंदाज आम्हा कवींना लागत नाही. कविता ही कवीला मिळालेली दैवी देणगी आहे. सरस्वतीचा वरदहस्त असल्याशिवाय सिद्धहस्त कवी होऊ शकत नाही, असे मला वाटते. कविता ही ओढून-ताणून कोणीतरी लिही म्हटलं की लिहिण्याची गोष्ट नाही. तिला हवं तेव्हा ती येते आणि तिचं रूप धारण करते. मला एका मित्राने एकदा म्हटलं या विषयावर तू कविता लिही, त्या वेळेला कविता जन्माला आली… आणि याचे उत्तरही कवितेतूनच मिळाले. ते असे…

तुला काय होतं कविता लिही म्हणायला
कविता लिहिताना काळीज तळहातावर
ठेवावं लागतं
आंजारून गोंजारून वेदनांना आपलंसं करावं लागतं
तेव्हा कुठं कागदावर उतरते कविता…
आणि असं करता करता एक दिवस जगण्याची होऊन जाते कविता…

तेव्हा मग… श्वासात जाणवते कविता
अन् कवितेत जागतो श्वास
वास्तवाच्या बीजातही दरवळतो
भासांचा अनामिक सुहास
स्पंदनात मनाच्या अस्वस्थ
शब्द नवे भिरभिरत येती
झोपल्या संवेदनांना तेच
हाका मारुनी जागे करिती
भाव वेड्या मनास मग
शब्द लाघवी घालती उखाणे
शब्दांचीच होते कविता
अन् कवितेत सामावते जगणे

शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की, उत्तम कविता ही तीच असते ज्या कवितेमध्ये आशय समृद्ध असतो. जी कविता परत परत वाचावीशी वाटते ती कविता सर्वात सुंदर असते, असे मला वाटते. म्हणूनच मी म्हणेन कवितेकडे इतकं सहज पाहू नका. तिला समजून उमजून तिचं काळजाच्या कुपीत जतन करा. कवितेचे दान माझ्या पदरात टाकलेल्या त्या ईश्वराचे मी आभार मानते आणि काव्य दिनाच्या निमित्ताने मी माझ्या वाचकांचे ऋण व्यक्त करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -