Saturday, April 27, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ मार्च ते १ एप्रिल २०२३

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ मार्च ते १ एप्रिल २०२३

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, रविवार दि. २६ मार्च ते शनिवार १ एप्रिल २०२३

परदेश प्रवासाची संधी
मेष – धार्मिक प्रवासाची योजना आखाल. त्यासाठी खर्चात वाढ झालेली दिसेल. सर्व कुटुंबाचा सहभाग आनंद देणारा ठरेल. दानधर्मासाठी खर्च कराल. जोडीदाराच्या सहकार्यासाठी पूरक राहा. उद्योग-व्यवसायासाठी विशेष श्रम घेतल्यास नियोजन यशस्वी झालेले दिसेल. परदेश प्रवासाची संधी. कुटुंब-परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. तसेच
कुटुंब व परिवारातील वातावरण सुखद राहील. आरोग्याविषयी फारशी चिंता नसेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. दुरावलेले मित्र पुन्हा जवळ येऊ शकतात. गूढ शास्त्राच्या अभ्यासात प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ समाचार मिळतील.
पत-प्रतिष्ठा वाढेल
वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. सर्वांना मदतीचा हात द्यावा. प्रसिद्धीचे योग आहेत. धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन त्या जोरावर मदत मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. बेरोजगारांना रोजगार मिळतील. नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी मिळू शकते, पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक आहे. कुटुंब-परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय-धंद्यात परदेशी संबंध येऊ शकतो.
उन्नतीसाठी अनुकूल काळ
मिथुन – सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग-व्यवसायात धडाडीने काम कराल. अपेक्षित पत्रव्यवहार घडेल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्य-कौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहकार्य लाभेल. सारख्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचा संभव आहे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे सर्वस्व मार्गदर्शन मिळेल. मात्र इतरत्र वेळ घालवू नये तसेच कुसंगत टाळावे. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चामध्ये वाढ होईल.
सामाजिक – धार्मिक क्षेत्रात रस 
कर्क –काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील आणि काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतात. आपल्या विरुद्ध काही घटना घडल्याने येणाऱ्या काळासाठी आपण मनात साशंक असाल व्यवसाय – धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपल्याकडून फारसे काही होत नाही, असे वाटेल; परंतु आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर, आत्मविश्वासावर व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीवर दोन हात करू शकता. यश आपलेच आहे, मात्र धीम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. कुटुंबातील धार्मिक कार्य आनंदाने पार पाडाल. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्या. मानव अधिकाराबाबत दक्ष राहा.
व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल
सिंह – उद्योग-व्यवसायातील अडी-अडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन, मदत मिळेल. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करू शकाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकाराल. जिद्द व चिकाटीने मार्गक्रमण कराल. आपल्या कार्याची अथवा कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. उत्पन्न वाढेल. नातेवाईक व भावंडांचे सौख्य लाभेल.
मंगलकार्य घडेल
कन्या – कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबात मंगलकार्य अथवा शुभकार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सूचनांचा आदर कराल. विविध खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला असला तरी विविध मार्गांतून धन आगमन होईल. हे दिवस आपणासाठी चैतन्याने भरलेले असतील. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

आनंददायी काळ
तूळ –या दिवसांत काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहेत. आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण चांगले दिसावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, त्यासाठी उपाययोजना कराल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्या व्यक्तीशी बोलून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने हे दिवस उत्तेजनापूर्ण असतील. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक आणि योग्य फायद्यासाठी आशादायी असतील.
संतती सौख्य मिळेल 
वृश्चिक – कुटुंब परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर सुवार्ता समजतील. त्यांचे अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्या कामी गुरुजन तसेच इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक कार्य होऊ शकते. त्यासाठी खर्च होईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील. नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर-सत्कार होईल; परंतु लहान-सहान कारणांवरून वाद-विवाद टाळावेत.
कामात बदल होईल
धनु – आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. विविध मार्गांनी धनलाभ होईल. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकतील. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील, मात्र वसुली करताना वाद-विवाद सांभाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंब-परिवारात वातावरण चांगले राहील. जीवनसाथीची साथ मिळेल. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तसेच स्थानांतराचे योग आहेत.
व्यवहार गतिमान होतील
मकर – नोकरी-व्यवसाय धंद्यानिमित्त जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक राहील तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. कुटुंबातील वातावरण सर्वसामान्य राहील. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मुलांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन, वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील.
संयम ठेवा
कुंभ – सध्याच्या कालावधीमध्ये आपण संयम ठेवणे आवश्यक ठरणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसाय-धंद्यामध्ये अचानक काही समस्या आयत्या वेळेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या नियोजनामध्ये बदल करावा लागेल. धावपळ होण्याची शक्यता. निराश न होता कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. जे जातक फॅशन, मॉडेलिंग अथवा ग्लॅमर असलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, अशांना प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. नवीन कामे मिळू शकतात. उत्पन्नामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडतील.
कौटुंबिक सुख मिळेल
मीन – कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आपल्याला समाधान लाभेल. आपल्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. आपले निर्णय योग्य ठरतील. नोकरी-व्यवसायात आपण या अगोदर केलेल्या कामांचे फळ मिळेल. पदोन्नती, वेतन वृद्धीचे योग आहेत, मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखादी विशेष प्रकारची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -