Thursday, May 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहिंदू संस्कृती आणि प्रकृती

हिंदू संस्कृती आणि प्रकृती

निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

प्रत्येक भारतीय सण हा ऋतू आणि महिने यांच्याशी संबंधित आहे. सणांची निर्मिती का झाली याबद्दलच्या माहितीची गेल्या लेखात नुकतीच सुरुवात केली होती.

जूनमध्ये येणारी वटपौर्णिमा त्यात आपल्याला सावित्रीची कथा माहीतच आहे. या कथेनुसार आपण जी काही वडाची पूजा करतो ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी एवढेच आपल्याला माहीत आहे. सर्वात महत्त्वाचे कारण अध्यात्मिकतेनुसार येथे पती-पत्नीमधील नाते हे सुदृढ करण्यासाठी आणि वैज्ञानिकतेनुसार वडाचे झाड या विश्वात या निसर्गात ऑक्सिजनचा स्तर वाढविण्याचे सर्वात मोठे कार्य करीत असते. याचे जर संरक्षण आणि संवर्धन करायचे असेल, तर त्यासाठी वटपौर्णिमा हा सण सर्वात महत्त्वाचा आहे. जूनमध्ये सर्व झाडांना पालवी फुटत असते.

परमेश्वराने वडाच्या झाडांना अनेक पारंब्या, अनेक पालव्या नैसर्गिकरीत्या निसर्गाचे संतुलन कार्य करण्यासाठी दिलेल्या आहेत; परंतु या अतिप्रमाणात होऊन भूमीची जास्त प्रमाणात व्याप्तता होऊ नये, तिला कुठेतरी आळा बसावा म्हणून ही वटपौर्णिमा. म्हणजेच स्त्री आणि पुरुष यापैकी फक्त स्त्रियांचीच निवड यासाठी केली आहे. पुरुषांची का नाही? कोणत्याही वृक्षाला येणारी पालवी ही नाजूकच असते आणि त्यामुळे स्त्रिया जेव्हा वटपौर्णिमेच्या निमित्ताने झाडाला धागा बांधतात तो अगदी हळुवारपणे देवाचे नाव घेत मनात नवऱ्याच्या दीर्घायुष्याचे चिंतन करीत बांधतात. कारण स्त्रीसाठी तिच्या पतीचे दीर्घायुष्य हे तिच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि मनात अशी सकारात्मक भावना घेऊन तो धागा बांधल्यामुळे येणारी पालवी ही हळुवारपणे झाडांच्या जवळ येऊन एका बंधनात राहते आणि तिचे संरक्षण आणि संवर्धनही होते हे मी अध्ययन केल्यानंतर पूर्णपणे लक्षात आले.

पावसाळ्याच्या वेळेस खूप झाडं तोडली जातात. मुळात वडाचे झाड हे भवितव्यात तोडावे लागणारच होते कारण त्याची वाढ, त्याचा पसाराच केवढा असतो. झाड तोडल्यास पक्षी बेघर होऊ शकतात, मग त्यापेक्षा वडाच्या झाडाला खालूनच फांद्यांना रोखलेलं काय वाईट? पण त्या नाजूक फांद्याला कुठे हानी न पोहोचता त्याचा पसारा आटोक्यात राहावा म्हणून ही वटपौर्णिमा. फाल्गुन म्हणजे मार्चमध्ये येणारा होळीचा सण. होळीच्या दिवसात झाडांच्या फांद्यांचा, खोडांचा जाळण्यासाठी उपयोग केला जातो. का? याच महिन्यात आपण हा पालापाचोळा, खोड का जाळतो? त्याभोवतीसुद्धा प्रत्येक राज्यानुसार कथा गुंफल्या गेल्या आहेत. त्यानुसार वाईट विचारांची आहुती देणे हा उद्देश यामागे आहेच. पण आता याचे शास्त्रीय कारण काय, तर जेव्हा वृक्ष जुनी होतात, तेव्हा निसर्गनियमानुसार आपोआप त्याच्या फांद्या पडतात.

एप्रिल-मे महिन्यात परत उन्हामुळे सर्व झाड सुकतात, तर त्या आधी सुकलेल्या झाडांचा, पालापाचोळ्यांचा निचरा व्हावा, उन्हाळ्यात कुठेही वणवा पेटून निसर्गाची अति हानी होऊ नये यासाठी असलेली ही उत्कृष्ट नैसर्गिक होळीच्या रूपाने केलेली योजना. दरवर्षी त्या फांद्यांचा, पालापाचोळ्यांचा, खोडांचा व्यवस्थित पद्धतीने शेवट व्हावा आणि त्यासाठी आपण त्या वनस्पती-वृक्षांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचे आभार मानावे यासाठी त्याची पूजा करून होणारा अत्यंत आदराने केलेला एक होम एवढेच मूळ कारण; परंतु आपण मानवाने पूर्णपणे चुकीच्या मार्गाने झाड तोडून ती जाळायला लागलोत. रस्ता विकास प्रकल्पात अनेक ठिकाणी वृक्षतोड गेली गेली. किती दुर्मीळ वृक्षांना आपण मुकलोत? आता यात आपण पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करतोय का? रंगपंचमीच्या दिवशी एकत्र येऊन जल्लोषात आनंद साजरा करणं आहेच; परंतु हे रंग त्या काळात नैसर्गिक रंगांपासून बनत होते. त्यात हळद, चंदन आणि नैसर्गिक रंगांचा समावेश होता. ज्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक शुद्धता व्हावी हाच उद्देश होता. पण आज त्याची जागा अनेक रासायनिक रंगांनी घेतली आहे आणि त्यापासून होणारी हानी ही सर्वश्रुत आहे.

प्रगत मानवाने कुठेतरी सणांना अंधश्रद्धेचे रूप देऊन वेळेच्या अभावाचे कारण सांगून या सणांकडे दुर्लक्ष केले आहे. आताच्या काळात जेमतेम दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, महाशिवरात्र असे थोडेफार सण साजरे केले जातात. सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात बघून आपण प्रभाते कर दर्शनम् हा मंत्र… म्हणतो का? सर्व परमेश्वराची चिंतन आहेच, पण त्यामागे शास्त्रीय कारण आहे. आपण झोपल्यावर आपल्या चेहऱ्यावरील रक्तप्रवाह हा हलकेपणाने आणि पायाच्या दिशेने होत असतो, कारण आपले डोके हे उशीवर असते. आपण मंत्र म्हटल्यानंतर आपले दोन्ही हात एकमेकांना चोळून चेहऱ्यावरून फिरवतो आणि हा रक्तप्रवाह त्या उबेमुळे सुरळीत होतो. दुसरे त्या उबदारपणामुळे रात्रभर बंद असलेले डोळे ऊर्जितावस्तेत येतात. त्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साहित राहता. आता कितीजण हा मंत्र म्हणतात? आता कोणीही गीता महापुराण वाचत नाहीत, सकाळी उठल्यावर मंत्रोच्चार कुठे दिसत नाहीत, ना मुले संध्याकाळी दिवेलागणीला हात जोडून कधी देवाकडे उभे राहत, ना नमस्कार करत, ना आरती.

होम हवन, ध्यानधारणा, परमेश्वराचे चिंतन कमी झाले. हात जोडल्यामुळे चोळल्यामुळे आपले रक्ताभिसरण प्रक्रिया शरीर शास्त्रानुसार योग्यरीत्या होते, कारण आपल्या हाताच्या पंजामध्ये आणि पायाच्या तळव्यात ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात. जर येणाऱ्या पिढीला हात जोडणे, मोठ्यांना नमस्कार करणे हीच शिकवण नसेल, तर याची मुळापासून सुरुवात होणारच कशी? त्याचे परिणाम कुठेतरी मानसिक आणि शारीरिक १००% होतच आहेत. येणारी पिढी ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होणार.

भारतात एवढ्या सगळ्या रूढी, परंपरा, संस्कार-संस्कृती असताना ही पिढी अशी का होत चालली आहे, याचे कारण काय? एकच कारण, येणाऱ्या पिढ्या अनुकरणप्रिय, खूपच बुद्धिमान आहेत; परंतु त्यांच्या विचारांची दिशा चुकली आहे. याचे कारण पालकच आहेत. पालक आणि मुलं एकमेकांना किती वेळ देतात? सध्याच्या काळात किती कुटुंब एका वेळेला तरी एकत्रितपणे भोजन करतात? किती विचारांची देवाण-घेवाण होते? खरं तर पालक हे मार्गदर्शक असतात मुलांचे. पण हे या मुलांना का बरं कळले नाही? कारण पालक कुठेतरी संस्कार करण्यात कमी पडत आहेत. एकत्रित कुटुंब पद्धती नसल्यामुळे कौटुंबिक जवळीक कमी झाली आहे. ज्या घरात गीता पठण होते, देवाची पूजा होते तिथे ते संस्कार टिकवले जातात. आपल्या प्रत्येक सणांसाठी असणारे उपवास, पूजाअर्चा या सर्व कौटुंबिक व्यवस्था सुदृढ करणाऱ्या आहेत आणि पर्यावरणपूरक सुद्धा. प्रत्येक सजीव सृष्टीचे संतुलन करणारेच आहेत. सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कणांकणाला सशक्त करणारेच आहेत.

मुळातच भारतात सण आणि उत्सव जास्त आहेत त्याचे कारण समाजाची सुदृढता आणि निसर्गाशी जवळीक करणे. आपोआपच पर्यावरणाचे संतुलन होण्यासारखे आहे. मानवाला आनंदी वातावरण आवडत असल्यामुळे कुठेतरी त्याची आनंदाची योग्य दिशा त्याला या सणांमधून मिळते. सणांच्या निमित्ताने एकत्रित आल्यामुळे मानसिक आणि शारीरिक सशक्तिकरण होते. पण आपण आपली शक्ती, संतुलन वाढवतो का? हे सर्व सण, उत्सव आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे करावेच लागतील. क्रमशः
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -