Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजब्राईट साईड ऑफ मिस्टेक्स

ब्राईट साईड ऑफ मिस्टेक्स

आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू

मूल चुकलं की काय होते तुमची प्रतिक्रिया? स्वतःशीच खरं खरं बोला. रिस्पॉन्ड करता की रिॲक्ट होता. बाकी तुमची तरी काय चूक आहे म्हणा. कितीतरी शतकांपासून मुलं चुकली की चेहरा त्रासिक होणं, कपाळावर आठ्या, स्टुपिड, मूर्ख म्हणून हिणवणं, अशा चुका करायला तू लहान आहेस का? डोकं आहे की खोकं? इ. इ. सुरू राहतं. चुकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच तसा तयार केला गेला आहे. पण जर चुकांबद्दलचा आपला परस्पेक्टिव्ह बदलला तर… चुकांबाबत कसं व्यक्त व्हायचं, मुलांमध्ये सुधारणा कशा करायच्या यासाठीही नक्कीच विचार करता येईल. एक लक्षात घ्या की मूल चुकलं की आपण किंवा शिक्षक मोठी माणसं ओरडतो. आपला हेतू चुकीची जाणीव देणं हाच असतो. पण त्या जाणिवांच्या आधी उत्पन्न होते ती म्हणजे भीती, मग सजग होणं आपोआपच मागे पडतं. तुम्ही म्हणाल मग काय सांगायचं, रागवायचंच नाही का? सोडून द्यायचं का वाऱ्यावर? हा त्रागा करण्यापेक्षा चुकांबद्दल समजावून घेऊ या.

चुका म्हणजे काय, तर ठरवून दिल्याप्रमाणे गोष्टी होणं, करणं. जेव्हा एखादी पायरी नेमून दिल्याप्रमाणे होत नाही, तेव्हा गोष्टी बिघडतात. पण लहान मुलं असो की, ॲडोलेसन्ट वयातील मुलं, mistakes and errors मधून शिकणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. बहुतेक मोठ्या माणसांना हे माहीतही असतं. पण तरीही चुकांकडे पाहण्याची एक ब्राईट, पॉझिटिव्ह साईडदेखील असते हे शिकवण्यात आपण पालक म्हणून कमी पडतो का? चूक झाली की लगेच मुलांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय का? आपल्यापैकी बरेच पालक परफेक्ट बनण्याचं प्रेशर मुलांवर टाकत असतात. त्यांचे परीक्षेतील पर्सेंटेज वाढावे याकरिता. त्यातून मुलांना प्राईजेस, स्कॉलरशिप मिळाव्यात हा पालकांचा विचार असतो. काहीजण तर मुलांना उत्तम ग्रेड मिळाव्यात म्हणून मुलांचा होमवर्क स्वतः करतात आणि काही पालक असेही असतात की, शिक्षकांनी मुलांच्या वीक एरियाज आणि त्यात सुधारणेची गरज सुचवली, तर चक्क वाद घालतात.

मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर या टेस्टिंग आणि परफेक्ट राहण्याच्या फोकसचा काय परिणाम होतो हे जाणून घ्यायलाच हवं. चुकांमधूनही कसं शिकता येईल हे समजून घेण्यात आपण मुलांना मदत करायला हवी. गृहपाठ करणं असो, मैत्री करणं किंवा खेळ शिकणं या सगळ्यात आपण चुकत चुकतच शिकत असतो. एनरिच होत असतो. कारण चुकल्यामुळेच आपल्याला वेगळ्या पद्धतीने कसं काम करायचं हे समजतं, आपल्याला नवीन पद्धतीने गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. एक इनोव्हेटिव्ह ॲप्रोच तयार होतो. मुख्य म्हणजे चुकांमधून आपण जे शिकतो त्यातून आपल्याला अंदाज यायला लागतो. आपली समजशक्ती (wisdom) हुशारीही वाढत जाते.

तसंच मुलंही चुकांमधून शिकणं, काम करणं, नातं टिकवणं, गोष्टी करणं यात अचूकतेकडे जायला लागतात. जसं आपण मुलांच्या हुशारीचं कौतुक करतो तसंच त्यांच्या प्रयत्नांचंही कौतुक केलं, तर त्यांना स्वतःविषयी विश्वास वाटेल. आपण प्रयत्न करतोय हे कोणी नोटीस करतंय हे समजलं की मुलं कठोर परिश्रम करायला तयार होतात. त्यांचा परफाॅरर्मन्स सुधारतो. ही स्तुती करताना ती अवाजवी, उगाचच नसावी तर अर्थपूर्ण आणि अचूक असावी. ज्या कौतुकातून मुलांना प्रेरणा मिळेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानांना विकसित होण्याची संधी मिळेल. त्यांच्यातील क्षमतांची जाणीव होईल. त्यांच्यातील रिझायलन्स (resilience), लवचिकता, आनंदाने जुळवून घेण्याची वृत्ती विकसित करण्याची संधी त्यांना मिळते.

आता पाहू या, लहान मुले आणि टीनएजर्सना चुकांमधून शिकायला कशी मदत करता येईल? मुलांना हे सांगा…

१) तू कोणतीही गोष्ट शंभर टक्के परफेक्ट करावीस असा माझा अट्टहास नाही, पण प्रयत्न केलास तर छान होईल.
२) तुझा अंदाज चुकला तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी थोडंच होणार आहे. चुका झाल्या की कमी आणि परफेक्ट राहिलास की प्रेम जास्त वाढतं असं नसतं, कारण आई-बाबांचं प्रेम अनकंडिशनल असतं.
३) चुका झाल्या की मदत करून त्यातून बाहेर काढण्यात तुम्ही स्वतः धडपड करण्याऐवजी त्या दुरुस्त करण्याचा विचार करायला मुलांना मार्गदर्शन करा.
४) कधी मोकळा वेळ असेल तेव्हा आपणही काही चुका केल्या होत्या, त्याचे काय परिणाम झाले आणि तुम्ही त्यातून कसं शिकलात हे मुलांशी शेअर करायला काहीच हरकत नाही.
५) मुलांच्या जुन्या चुका उगाळत बसू नका. उलट एकावेळेस एकाच गोष्टीवर फोकस करा.
६) आपल्या चुकांबाबत दुसऱ्यावर दोष ढकलण्यापेक्षा त्याची जबाबदारी घ्यायला मुलांना तयार करा.
७) तू आपली चूक कबूल करतो आहेस हे तुझं वागणं मला आवडलं असं जरूर म्हणा.
८) मुलांना त्यांच्या प्रयत्न करण्याबद्दल, चुकांमुळे मागे पडलो तरी पुन्हा काम करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल प्रोत्साहन द्या.
९) आपल्याकडून चूक झाली त्यामुळे कुणाचं मन दुखावलं, तर क्षमा मागण्याची सवय नक्कीच लावा. क्षमा कशी मागावी तेही शिकवा.
१०) चुकांची चांगली बाजू मुलांना समजावून सांगा.

चुकांमधून आणि अपयशातून शिकणं खरंच इतकंही सोपं नसतं म्हणूनच मुलांना शिकून यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावचं लागतं. कठीण प्रसंगात, परिस्थितीत पालक, शिक्षक आणि मेन्टॉरसनी जर मुलांना चार प्रेमाचे, धीराचे शब्द सांगितले तर मुलं आव्हानं पेलू शकतील. याकरिता त्यांची वाढ आणि विकास होईल.

ही वाक्यं पाहा काय सांगतात…

  • मी वेळ वाया घालवतोय असं मला कधीच वाटत नाही. सायन्स ही ट्रायल आणि एरर अशीच प्रोसेस आहे. – अलबर्ट आईनस्टाईन
  • प्रयोगशीलता, वाढ होणे, रिस्क घेणे, नियम मोडणे, चुका करणे आणि मजा करणे ही खरी क्रिएटिव्हिटी आहे. – मेरी लुई कुक
  • ज्ञान हे केवळ सत्यावरच आधारित नसते तर ते चुकांमधूनही बाहेर येत असते. – कार्ल जुंग
  • तुम्ही जर चुका करत नसाल तर तुम्ही निर्णय घेत नाहीत. – कॅथरिन कुक
  • Mistakes are the portal of discovery. – James joyee
  • चुका करा, पण प्रत्येक वेळी नवीन चूक हवी. – जॉर्ज बर्नाड शॉ

एक माणूस काम करायला जेव्हा घाबरत असतो, तेव्हा दुसरा चुकत चुकत ते काम करतो आणि सुपिरिअर बनून जातो. म्हणूनच मुलांनी चुका केल्या की आता सारं संपलंच असं मानू नका. लगेच रिॲक्ट होऊ नका. दुरुस्त करायला संधी द्या, विचार करू द्या. गरज भासल्यास जरूर मदत करा. चुकांची ब्राईट साईड स्वतः समजून घ्या आणि मुलांनाही समजवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -