Tuesday, April 30, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखउष्णतेचा प्रकोप आणि दुष्काळाचे सावट

उष्णतेचा प्रकोप आणि दुष्काळाचे सावट

संपूर्ण देशभरात उष्णतेचा प्रकोप सुरू झाला आहे आणि हवामान खात्याने इशारा दिला आहे की, तापमान आता ४० डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. या इशाऱ्यातच भावी दुष्काळाचे गर्भित सावट आहे. कारण अजून दुष्काळाची परिस्थिती नसली तरीही ग्रामीण भागात दुष्काळ आणि पाण्याची टंचाई ही संकटे दबक्या पावलांनी येत आहेत. टँकर लॉबी सक्रिय झाली आहे आणि त्यांचा धंदा जोरात होण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच उन्हाच्या काहिलीने अंग होरपळत आहे आणि अजून तर मे महिनाही जायचा आहे. भारतात उष्णतेच्या प्रकोपाचा प्रश्न दरवर्षी असतो आणि ग्रामीण भागात तर त्याची तीव्रता इतकी प्रचंड असते की ग्रामीण भागात महिला, मुली डोक्यावर हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करत जाऊन पाणी आणत असतात. जमिनीतील पाण्याचा स्तर कमी होण्याचे हेच कारण असते.

हवामानातील सातत्याच्या बदलामुळे तापमान प्रचंड वाढत आहे आणि यालाच काही शास्त्रज्ञ ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. पण सत्य हे आहे की हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलाचा खरा फटका नेहमी शेतकऱ्यांना बसतो. आताही मे महिनाही आला नाही तोच राज्यात अनेक भागांत उभी पिके उन्हात जळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई याच महिन्यात होते आणि लोक पाणी पाणी करत असतात. मराठवाडा, विदर्भ या कायम दुष्काळी भागात दहा दहा किंवा वीस दिवसांनी पाणी येते. हे दरवर्षी दिसणारे चित्र आहे आणि ते बदलले पाहिजे. पण ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न अति गंभीर होण्याचे कारण म्हणजे बहुतेक लोक पाण्याच्या दैनंदिन गरजांसाठी भूजलावर अवलंबून राहतात.

पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असतो आणि अनेक तज्ज्ञांनी भूजलाचा स्तर खाली खाली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण सरकारने आणि स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना भूजलाचा कमी उपसा करण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होत नाही आणि मग ग्रामीण भागात पाण्यासाठी भगवान म्हणण्याची वेळ येते. पाण्याचा उपसा एकीकडे अनिर्बंध केला जात असतानाच दुसरीकडे भारतीय शेतकरी उसाची शेती करत असतात. ऊस कोकणात होत नाही पण पश्चिम महाराष्ट्रात कित्येक एकर जमिनीवर ऊस उभा असतो.

उसाला पाणी जास्त लागते आणि कमी पाणी लागणारी पिके घेण्यास सरकारने प्रयत्न केले तरीही त्याला विरोध केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना उत्पादनही जास्त मिळते. बाजरी, ऊस या पिकांना पाणी जास्त लागते आणि म्हणून ही पिके कमी प्रमाणात घ्या, असे पंतप्रधान मोदींनी आवाहन केले होते. अशी पिके मोठ्या प्रमाणावर घेतल्याने पाण्याचा उपसा जास्त होतो आणि त्याचा तोटा अखेरीस ग्रामीण भागातील लोकांनाच जास्त होतो. पण मोदी यांना त्यावेळी मोठा विरोध करण्यात आला.

भारतीय हवामान खात्याने जो उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तो संपूर्ण भारतासाठी गंभीर आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक दुष्परिणाम होणार आहेत आणि त्यात लोक आजारी पडणे, दुष्काळ, पाण्याची टंचाई निर्माण होणे आणि विजेची मागणी वाढणे अशा अनेक उपसंकटांचा समावेश आहे. आताच अगदी राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाच्या झळा सुरूच झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. राज्याच्या अनेक भागांत पाणी आताच मिळेनासे झाले आहे आणि टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. मागे महाराष्ट्रातील एका वयोवृद्ध नेत्यानेही दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उसाचे पीक कमी घेण्याचा सल्ला दिला होता. पण कुणीच तो मनावर घेतला नाही. राज्यात जी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेकांचे उखळ पांढरे होते, त्यामुळे दुष्काळ आवडे सर्वांना ही म्हण आजच्या परिस्थितीला योग्य वाटू लागते.

अद्याप दुष्काळी स्थिती निर्माण झाली नसली तरीही भावी दुष्काळाची पहिली पायरी म्हणजे ही उष्णतेची लाट आहे. शेतीसाठी पाणी पुरवताना राज्यात मानवांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून राज्यातील फडणवीस सरकारने जी जल शिवार योजना राबवली होती, तिचा लाभही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना झाला होता. पण नंतर आलेल्या शिवसेना उबाठा सरकारने दुष्ट हेतूने ती चांगली योजना हाणून पाडली होती. पण आता ती पुन्हा नव्या जोमाने सुरू आहे. राज्याचा विकासाचा दृष्टिकोन असलेले सरकार असले की शेतीला आणि मानवांना पाणी पुरवण्याच्या योजना राबवल्या जातात. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे अगोदरच देश ऊर्जेच्या वाढत्या मागणीशी झुंज देत असताना त्याच्या चिंतेत भरच पडली आहे.

ऊर्जेचा वापर शेतीसाठीही जास्त केला जातो आणि त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कृषी पंपांसाठीही वीज पुरवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवतानाच ग्रामीण भागातील शेतीला ऊर्जा पुरवण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. मोदी सरकारने या संकटाची नोंद घेऊनच सूर्यघर योजना राबवली आहे. ज्यामुळे सौर पॅनल बसवून घरात विजेचा पुरवठा केला जात आहे. त्याचे ग्राहक सध्या कमी आहेत पण मोदी यांना हा आकडा शंभर कोटींपर्यंत न्यायचा आहे. एकूण काय तर उष्णतेची लाट आणि त्यामुळे नंतर येणाऱ्या संकटांचा एकूण आढावा घेतला, तर असे दिसते की अजून देशाला खूप मोठी मजल मारायची आहे. सरकार शेतकऱ्यांचे मन वळवण्यात खूप प्रमाणात यशस्वी झाले असले तरीही शेतकऱ्यांनी स्वत:हूनच संकट ओळखून त्याच्याशी मुकाबला करण्याची तयारी दर्शवली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -