Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीRachna Lachke Bagwe : @ थ्री सिक्स्टी फाईव्ह

Rachna Lachke Bagwe : @ थ्री सिक्स्टी फाईव्ह

वर्षाचे ३६५ दिवस. प्रत्येक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी नवीन घेऊन येतो. प्रत्येक दिवसाचे एक वैशिष्ट्य असते. हे विचारात घेऊन, एका ध्येय वेड्या तरूणीने प्रत्येक नवा दिवस एका नव्या मुलाखतीने साजरा केला. ती तरूणी आहे, रचना लचके- बागवे. रचना यांनी ३६५ दिवस, ३६५ मुलाखती घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली. हा रोमांचित करणारा प्रवास त्यांनी दैनिक ‘प्रहार’च्या ‘गजाली’ या कार्यक्रमात उलगडला. यावेळी ‘प्रहार’चे प्रशासन व लेख विभागप्रमुख ज्ञानेश सावंत तसेच संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

सीमा पवार

आपण एखादी निवडलेली कृती सर्वात चांगली किंवा सर्वात प्रभावी होईल, यावर तुमच्यातला आत्मविश्वास अवलंबून असतो. कारण कोणत्याही क्षेत्रात यश सहज साध्य गोष्ट नसते. त्यासाठी तुमची जिद्द, जबर महत्त्वाकांक्षा, मेहनतीची इच्छा आणि स्वप्न पाहण्याची दूरदृष्टी तुमचे भविष्य घडवीत असते. अशाच जिद्दीने, समोर यईल त्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जात ३६५ दिवस, ३६५ विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती घेत, ज्यांनी एक विश्वविक्रम केला, त्या रश्मी लचके-बागवे. त्यांना प्रहारच्या ‘गजाली’ या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या यशापर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग सोपा नव्हता, पण पुढे जाताना मागे वळून न पाहता, अनेक गोष्टींचा त्याग करत त्यांनी @ थ्री सिक्स्टी फाईव्ह हे विश्व विक्रमाचे शिखर कसे गाठले, हे त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून जाणवले.

रचना लचके बागवे यांनी ३६५ दिवस, ३६५ मुलाखती घेत विश्वविक्रम केला. सलग ३६५ दिवस रोज एक नवीन मुलाखत त्यांनी घेतली. २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर याची झालेली सुरुवात २० एप्रिल २०२४ रोजी ३६५व्या मुलाखतीने पूर्ण झाली. या मुलाखतींच्या क्रमवारीत अनेक उद्योजक, शासकीय अधिकारी, समाजसेवक, कलाकार असे विविध क्षेत्रांतील लोकांचा जीवनप्रवास रचना यांनी त्यांच्या ‘युट्यूब वाहिनी’वर उलगडला. रचना यांच्या मुलाखतींचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यात सातत्य राखणे गरजेचे होते आणि तेच त्यांना सिद्ध करायचे होते. यात खंड पडू न देता, निवडलेला मार्ग अधिक प्रभावी करायचा होता. त्यांनी यावर लक्ष केंद्रित करत, हा प्रवास सुरू केला.

घेतलेल्या मुलाखतींमधल्या काही नावाजलेल्या उद्योजकांच्या मुलाखती वर्तमानपत्रांमधून छापून आल्या होत्या. त्यामुळे आता अशा लोकांना व्यासपीठ मिळवून द्यायचे होते की, जे लोकांसमोर कधीच आले नाही. त्यामुळे स्वतःचे यूट्युब चॅनल सुरू करून, या मुलाखती सुरू केल्याचे रचना यांनी सांगितले. रचना यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये समोरच्याला प्रेरणा कशी मिळेल किंवा स्वतःच्या क्षेत्रात असलेली एक ग्रेट व्यक्ती अजूनही लोकांच्या समोर आलेली नाही, ती कशी येईल अशा व्यक्तींसाठी हे व्यासपीठ असल्याचे सिद्धही केले. या ३६५ दिवसांमधला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. हे सांगताना अनेकदा असे प्रसंग आले की, उद्या काय? पण दुसऱ्या दिवशी सकाळी १०च्या ठोक्याला ‘यूट्युब’वर एक मुलाखत अपलोड होत होती. प्रत्येक मुलाखत ही रचना यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. प्रत्येकाचा अनुभव काळजाचा ठोका चुकवणार होता. अनेकांशी बोलताना नकळतच डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तरीही मुलाखतीनंतरचा तो प्रत्येक दिवस एक आशेचा किरण होता. त्यामुळे परत एकदा यूट्युब समोर येऊन, आज पुन्हा एक नवीन चेहरा रचना यांना अनुभवायचा होता.

३६५ दिवस, ३६५ मुलाखती करताना रचना यांनी १५ दिवसांची उद्योजकांसाठी असलेली जागृती यात्रा केली. १५ दिवसांच्या मुलाखतींमध्ये पडलेला खंड भरून काढणेही सोपे नव्हते. पण पहाटे ७ वाजता किंवा रात्री ११ वाजता मुलाखत घेण्यासाठी रचना सज्ज होत्या. व्हीडिओच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या मुलाखतींसाठी पाठवलेली लिंकदेखील अनेकदा ओपन होत नसे किंवा त्याची माहितीही त्या व्यक्तीला नसे. अशा वेळी तास-दोन तास, तर कधी अर्धा दिवसही वाया जात असे. पण संयम राखत, मनोधैर्य खचू न देता, ती मुलाखत कशी पूर्ण करायची, यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत, ती यशस्वीपणे पार पाडायची आणि पुन्हा एकदा नव्याने नव्या मुलाखतीची सुरुवात करायची. महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वीज खंडित होते. अशा वेळीही दिवसातली ती पंचवीस मिनिटांची मुलाखत पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागणारे, श्रम हा रचना यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. ३६५ दिवस अर्थात पूर्ण एक वर्ष सण, समारंभ, नातेवाईक यांच्याशी फारकत घ्यावी लागली. अशा वेळी अनेकांनी रचना यांच्या या उपक्रमासाठी त्यांना मूर्ख ठरवले. हे शक्य नाही असे आधीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण येणाऱ्या प्रसंगावर मात करत ३६५ दिवसांचा पल्ला कसा गाठायचा, हा एकच विचार मनाशी पक्का करत, आपले ध्येय रचना यांनी पूर्ण केले. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ‘प्रहार’ टीमकडून त्यांना अनेक शुभेच्छा!

असे लाभले ‘मैत्र जीवांचे’

मानसी खांबे

माणसाने त्याच्या आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयात कुटुंबाची साथ नक्कीच असते. मग तो कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करण्याचा निर्णय असो वा, कोणताही उपक्रम. प्रत्येकाला स्वतःच्या जीवनातील चढ-उतार, आई-वडिलांचे आशीर्वाद व जोडीदाराची साथ कायमच लाभलेली असते. त्यासोबत त्यांनी त्यांच्या जीवनात निवडलेल्या कुटुंबाशी असलेले नाते म्हणजे ‘मैत्री.’ असेच ‘मैत्र जीवांचे’ लाभले, ते विश्वविक्रमी रचना लचके बागवे यांना.

रचना लचके बागवे यांनी ३६५ दिवस, ३६५ मुलाखतींचा ध्यास घेतला. कामात सातत्य शोधत व स्वतःला सिद्ध करण्याच्या या कठीण प्रवासात त्या एकट्या न पडता, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. इतकेच नव्हे तर कुटुंबासह त्यांच्या जीवनातील दोन मौल्यवान मित्रांनीही त्यांना पाठिंबा दिला. प्रदीप मांजरेकर आणि लव क्षीरसागर असे रचना लचके यांच्या या दोन मित्रांची नावे असून, त्यांनी रचना लचके यांना या प्रवासात मोलाची साथ दिली. रचना लचके यांनी घेतलेल्या प्रत्येक मुलाखतीचे नियोजन करणे, मुलाखतदात्याशी संपर्क साधणे, ३६५ दिवस कोणत्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायच्या ते ठरवून त्याचे नियोजन करणे अशा अनेक बाबतीत प्रदीप मांजरेकर आणि लव क्षीरसागर यांनी रचना लचके यांना प्रोत्साहन देत होते. तसेच हे दोघे कोणत्याही ठिकाणी गेले तेथे ‘माझी मैत्रीण मुलाखत घेते, तिला मुलाखत द्या’ असा प्रचार ते करायचे. त्यांच्या या उत्तेजनामुळेच मी हा उपक्रम पूर्ण करू शकले, असे रचना लचके यांनी म्हटले.

प्रेरणेच्या स्रोताचे ‘रचना’कार

वैष्णवी भोगले

हारणे न स्वीकारणे
नकोस देऊ कारणे
विश्वासाचे पंख लावूनी
बाजी आता मारणे’…
ते म्हणतात ना, वेड लागल्याशिवाय जीवनात काहीच होऊ शकत नाही, हे रचना बागवे यांनी सिद्ध करून दाखवले.
‘365Days@365Stories’ हा ध्यास घेऊन, रचना लचके बागवे यांनी विश्वक्रमाला गवसणी घातली. या मुलाखतीच्या शृंखलेमध्ये उद्योजक, शासकीय अधिकारी, समाजसेवक आणि कलाकार अशा विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा जीवनप्रवास रचना यांनी यांच्या यूट्युब चॅनेलमधून उलगडला.

आपण अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती विविध माध्यमातून ऐकत असतो. पण ज्यांच्यात कलाकार, समाजसेवक, उद्योजक अशा अनेक भूमिका दडलेल्या आहेत. अशा सर्व सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वांना बोलते करण्याचे, तसेच त्यांचा जीवनप्रवास उलगडण्याचे काम रचना यांनी केले. त्याचबरोबर कामामध्ये सातत्य हवे असल्याने ३६५ दिवसांच्या मुलाखतींमधून एक चांगला अनुभव घेता आला, असेही प्रहार ‘गजाली’च्या कार्यक्रमात सांगितले.

“मुलाखती घेताना वाटले नव्हते की, हा विश्वविक्रम होईल; पण ज्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचा विश्वास होता की, हा एक विश्वविक्रम होईल,” असेही रचना यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की,“३६५ दिवसांमध्ये असे अनेक दिवस आले की, मी ज्या मुलाखती घ्यायचे ते लोक संवेदनशील, अथक प्रयत्न, परिश्रम करून यश संपादन केलेले होते. या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने झूमच्या माध्यमातून घेतल्या. या माध्यमाला सगळेच सरावलेले नसल्याने, मुलाखती घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. झूम काहींना जॉइनच करता येत नव्हते. याशिवाय काही मुलाखती काही कारणास्तव रद्द व्हायच्या, काहींना नेटवर्कची समस्या होती. कधी आजारी असणे, घरात कार्य असणे, दुसऱ्या कामात व्यस्त असणे अशा अनेक समस्या येत होत्या. पण या सगळ्यावर मात करून, त्यांनी या ३६५ मुलाखती घेतल्या.

यामध्ये ३६५वी मुलाखत बीव्हीजी ग्रुप ऑफ कंपनीचे हनुमंत गायकवाड यांची होती. ३२५वी वज्रदंतीचे नारायणी विको प्रॉडक्ट्स बनविणारे संजीव पेंढारकर, ३००वी पितांबरीचा ३५ वर्षांचा प्रवास अनुभवणारे रवींद्र प्रभुदेसाई, २००वी पद्मश्री मिलिंद कांबळे हे डिक्कीचे फाऊंडर आहेत, १००वी शंतनू भडकमकर, झी २४ तासच्या अनुपमा खानविलकर, प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, कांता हिंदे (एकल महिला संघटना, लातूर), पोली बॉम्बस्फोट ऑफिसर वसवराज गोवे, श्री देवी यांसारखे अनेक लोक आहेत. त्यांनी केलेल्या कामांची, त्यांना आलेल्या अनुभवांची दखल कुठेही खंड न पडू देता मुलाखतींमध्ये घेतली आहे. हे काम हाती घेतल्यावर, त्यांनी स्वत:वरही अनेक बंधने आणली. अतिशय महत्त्वाचे नसेल, तर घरगुती कार्यक्रमाला उपस्थित न राहणे आणि आवश्यक असेल, तर मुलाखत पूर्ण करूनच जाणे, स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणे अशा काही गोष्टी त्यांनी निर्धाराने पाळल्या.

रचना यांना ३६५ दिवसांच्या मुलाखतींमधून जागृती यात्रेला जाण्याची संधी मिळाली. या यात्रेला जाण्यासाठी त्यांना २० ते २५ मुलाखती हव्या होत्या. त्यांनी अनेकांच्या मुलाखती दिवस-रात्र पूर्ण मुलाखती घेऊन आपले टार्गेट पूर्ण केले.‘अर्थसंकेत’ हे मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसायविषयक ऑनलाइन वर्तमानपत्र आहे. डॉ. अमित बागवे हे या वर्तमानपत्राचे संपादक व संस्थापक होते. २ फेब्रुवारी २०२० रोजी थायलंड येथे ‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’तर्फे अमित बागवे यांना ‘डॉक्टरेट’ या मानद पदवीने गौरविण्यात आले. मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने ‘अर्थसंकेत’ हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आले आहे. या वर्तमानपत्रातून अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर व उद्योग साक्षर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारे रचना आणि डॉ. अमित यांनी लोकांच्या समोर माहितीचा आणि प्रेरणेचा खजिना ठेवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -