Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखवर्ष सरले... अथांग उरले...

वर्ष सरले… अथांग उरले…

देवकी पंडित, प्रख्यात गायिका

मी लहानपणापासून कुमारजींचे गाणे ऐकत आले आहे. त्यांच्या स्वरांचा माझ्यावर प्रभाव पडला असावा म्हणूनच असे वाटते की, आजही त्यांचे गाणे आपण तितक्याच तन्मयतेने ऐकतो आणि त्याचा आनंद घेतो. संगीताची एक साधक या नात्याने मला वाटते की, त्यांच्या गायकीचा उगम सापडत नाही आणि अंत तर नाहीच. तो एक प्रवाह जो कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हे कळायला मार्गच नाही…

पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांची शिष्या आणि सुपुत्री कलापिनी कोमकली व त्यांचा नातू भुवनेश कोमकली यांनी ‘कालजयी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कुमारजींच्या बंदिशी, त्यांनी बांधलेले राग, त्यांचे विचार आणि त्यांच्या पूर्ण कारकिर्दीचा उत्सव साजरा करण्याचा हा एक स्तुत्य प्रकल्प आहे. मीही रसिक श्रोता म्हणून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तिथे मला असे वाटले की, कुमारजींच्या बंदिशी प्रत्येक कलाकाराने आपापल्या पद्धतीने प्रस्तुत केल्या आणि त्या ऐकताना मला त्यांच्या गायकीच्या विविध पैलूंचे पुनःश्च आणि वेगवेगळ्या पद्धतीने दर्शन घडून आले. वास्तविक, पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगितिक योगदानाचे किंवा सांगितिक विचारांचे, त्यांच्या प्रतिभेचे आकलन एका वर्षात होणे अशक्य आहे. त्यासाठी ऐकण्याची सुद्धा अनेक वर्षांची साधना करावी लागते. केवळ करमणूक म्हणून आपण त्यांचे संगीत ऐकू शकत नाही.

मी लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकत आले आहे. त्यांच्या स्वरांचा माझ्यावर आणि माझ्यासारख्या इतर रसिक श्रोत्यांवर प्रभाव पडला असावा. म्हणूनच वाटते की, आजही त्यांचे गाणे आपण तितक्याच तन्मयतेने ऐकतो आणि त्याचा आनंद घेतो. संगीताची एक साधक या नात्याने मला वाटते की, त्यांच्या गायकीचा उगम सापडत नाही आणि अंत तर नाहीच. तो प्रवाह कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हे कळायला मार्गच नाही. आपण त्यांचे बालवयातले गाणे ऐकतो तेव्हा आपल्या संगीताच्या दुनियेत गंधर्वच अवतरले असतील, असे खरोखर जाणवते आणि म्हणूनच हे असे आगळे-वेगळे दैवी सूर आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांच्याकडून साधे प्रचलित रागही ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि समजते की या रागामध्ये अशाही संभावना आहेत. यमन, भूप हे खूप प्रचलित राग आहेत; परंतु ते त्यांच्याकडून ऐकताना रागाच्या वेगळ्या छटा आणि निरनिराळे भाव जाणवून येतात.

बंदिशींचे साहित्यदेखील आगळे-वेगळे, निसर्गाला आणि भाव-भावनांशी निगडित असलेले आहे. भाषा अत्यंत सांगितिक असून आधुनिक, आपलीशी वाटते. ‘टेसुल बन फुले, अब तो आ राजन’ अशा सगळ्या बंदिशी नवीन, आधुनिक असल्या तरी त्यांचे मूळ कुठे तरी पारंपरिक संगीतामध्ये आहे असे जाणवते. बंदिशी, त्याचप्रमाणे त्यांनी बांधलेले राग (मधसुर्जा, धनबसंती, लगनगंधार) आम्ही लहानपणापासून ऐकले आहेत आणि आजही ऐकतोय. पण हे राग प्रचलित व्हायला हवेत, असे वाटते. आमच्या नंतरच्या पिढीनेही ते गायला हवेत. या रागांमध्ये तीव्रता आहे. जसे, लगनगंधारमध्ये गंधाराच्या श्रृती आपल्याला ऐकायला मिळतात, त्या खरोखर अद्भुत आहेत. त्यांचे गाणेच अद्वितीय आहे, मनाचा ठाव घेणारे आहे. मला आणि आमच्या पिढीलाच त्यांच्या गाण्यातून काय घेऊ नि काय नको असे होते, कारण संपूर्ण संगीत आपल्याला व्यापून टाकते. त्यांचा आवाका एवढा मोठा आहे की दोन पिढ्यांनी अभ्यास केला तरी पुरणार नाही. कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय. उदाहरणार्थ, गाण्यातले वेगवेगळे अंग भावानुरूप कसे वापरावेत, हे मला त्यांच्या काही लेक्चर्समधून कळले. तान कशी, कुठे घ्यायची आणि त्याचे प्रयोजन काय असले पाहिजे याबाबत त्यांनी आपल्या लेक्चर्समधून अनेक विचार मांडले. आपणही मिंड कधी घेतो, कशाला मुरकी घेतो, कुठल्या लयीत राग गातो याचा परिपूर्ण विचार करायला हवा. या सगळ्याचा संपूर्ण विचार ज्यांच्या गायकीत दिसतो ती म्हणजे कुमारजींची गायकी…!

कुमारजींच्या गाण्यातून पॉझचा किंवा स्वल्पविरामाचादेखील अप्रतिम विचार दिसतो. दोन स्वरवाक्यातला स्वल्पविराम हा नुसता स्वल्पविराम नसून भावाने ओतप्रोत भरलेला दुवा आहे, जो रागाला प्रावाहित बनवतो. स्वल्पविरामामध्ये भावनांची तीव्रता असून त्या तीव्रतेचे प्रतिबिंब म्हणजे पुढचे स्वरवाक्य होय. त्यांच्या गाण्यातून मला लक्षात आले की पॉझ किंवा स्वल्पविराम देखील एक अलंकार आहे, जिथे अव्यक्त आणि भावना अतिशय तीव्र दाटून येतात आणि त्यामुळे तो गाण्यातला अविभाज्य घटक ठरतो. त्यांच्या या छोट्या-छोट्या गोष्टी मी समजून घेण्याचा आणि उमजून गाण्याचा प्रयत्न करते. संगीतातला कुठलाही प्रकार त्यांनी सोडला नाही. ठुमरी, टप्पा, अभंग, भजन किंबहुना, नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम त्यांनी केला. प्रत्येक गायन प्रकाराचा विचार करून त्यांनी प्रस्तुत केला आणि रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. हे खऱ्या अर्थाने कालजयी संगीत आहे आणि अशा कालजयी पंडित कुमार गंधर्वांचा उत्सव वर्षभर होतोय यासारखी आनंदाची गोष्ट नाही. मला असे वाटते की एक वर्ष नाही तर अनेक वर्षे त्यांचे संगीत आम्हा रसिकांच्या मनावर राज्य करत राहील.

मी कुमारजींच्या अनेक मैफली ऐकल्या. घरगुती मैफली, मोठे कार्यक्रम या व्यतिरिक्त त्यांची लेक्चर सिरीज वा मुलाखती असे अनेक कार्यक्रम ऐकले आणि अनुभवले. खासकरून आठवते की मल्हार दर्शनसारखा लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन कार्यक्रम केला होता, ज्यात त्यांनी मल्हारचे अनेक प्रकार; खासकरून गौड मल्हार, मिया मल्हार, शुद्ध मल्हार, रामदासी मल्हार आणि इतर प्रकारांचे विश्लेषण करून आमच्यासमोर मांडले होते. त्याचबरोबर पूर्वापार गात आलेल्या बंदिशींची निराळ्या प्रकारे फोड करून, त्यावरील स्वत:ची मते आमच्यासमोर मांडली होती. आम्हाला गाऊन दाखवले होते. गौड मल्हारमध्ये काय काय संभावना आहेत, काय काय होऊ शकते, गौड मल्हार कसा रंगू शकतो हे मला त्या कार्यक्रमातून समजले आणि या रागाविषयी माझे डोळे उघडले. गौर मल्हार हा केवढा मोठा राग आहे, त्याचा अर्थ काय, वेगवेगळ्या बंदिशी कशा गाव्यात, कोणत्या लयीत गाव्यात आणि त्याचा अर्थ काय हे सगळे उमगलेच, खेरीज निरर्थक काही गावू नये हा त्यांच्या विचारातील मूळ भाग मला त्यानिमित्ताने समजला.

पूर्वनियोजित विचार आणि आचारातही शिस्त हे कुमारजींचे वैशिष्ट म्हणावे लागेल. प्रत्येक सर्जनशील कलाकाराने असे शिस्तबद्ध असावे लागते, हे त्यांचे मत मी ऐकले होते. सर्जनशीलतेसाठी स्पष्ट विचारांची शिस्त असावी लागते, स्पष्टता असावी लागते हे त्यांचे मत मी भाषणांमधून आणि त्यांच्या लेक्चर्समधून ऐकले आहे आणि पाहिलेही आहे. त्यामुळे मला वाटते की, ते केवळ गायक नव्हते तर विचारवंत होते. म्हणूनच एका महत्त्वपूर्ण संदर्भाच्या स्वरूपात पुढच्याच नव्हे तर येणाऱ्या काही पिढ्यांसाठी त्यांचे गाणे महत्त्वपूर्ण राहील. त्यांच्या या सगळ्या कामाला मी एक वळण म्हणेन, कारण यामुळेच आमच्यासारखे अनेकजण प्रेरित झाले आणि प्रवृत्तही झाले. कुमारजींनी कधीच एका साच्यात गा, असे सांगितले नाही, तर तुम्हीही विचारपूर्वक प्रत्येक रागाची स्वत: मांडणी करू शकता, असे सांगितले. अशा प्रेरक मतांखेरीज त्यांनी आम्हाला प्रभावी सूर दिले. गाताना त्यांच्या सुरांच्या लागणाऱ्या श्रृती मनाला भिडत असत. त्यांच्या प्रत्येक सुराला एक तीव्र भावना होती. प्रत्येक स्वरवाक्याचे एक परिणामकारक म्हणणे असायचे. नेमका भाव असायचा. अशी स्वरवाक्ये असल्यामुळेच त्यांचे गाणे एखाद्या नक्षीकामासारखे भासायचे. महत्त्वाचे म्हणजे त्या कामातील एकही नक्षी विनाकारण नसायची. त्यातील काहीच निष्कारण केल्यासारखे नसायचे.

महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कधीच काही सवयीने गायल्यासारखे वाटत नाही. त्यांची प्रत्येक फ्रेज विचारांतीच येत होती. गाताना ते अगदी तंबोऱ्याचाही विचार करायचे. माझे तंबोरेही परफॉर्मर आहेत, असे ते म्हणत असत. कार्यक्रमाच्या पाच मिनिटे आधी त्यांचे तंबोरे झंकारत, तेव्हा त्यांनी स्वरवाक्य उच्चारण्याआधी तंबोऱ्यालाही लोक ‘वाह वाह’ म्हणत असल्याचे मी लहानपणापासून ऐकून आहे. म्हणजेच तानपुऱ्यावरही त्यांनी एवढा विचार केला होता. तानपुरा कसा वाजला पाहिजे, कसा छेडला पाहिजे, त्यातूनही कसा नाद निर्माण झाला पाहिजे या सगळ्यांबद्दल त्यांचा विचार होता. त्याचबरोबर तबला वादकाने ठेका कसा द्यावा, याचाही त्यांनी पूर्णपणे विचार केला होता. म्हणूनच त्यांची गायकी घडवलेली होती, असे मला वाटते. अर्थातच नेमका परिणाम साधण्यासाठी घडवलेली ती गायकी होती. गाणे त्यांनी परंपरेने मिळवले होते, शिकले होते हे खरे असले तरी अंत:करणात दडलेले संगीत त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडले. म्हणूनच ते अजरामर आहे यात वाद नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -