Thursday, May 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती, शिबानी जोशी

देशाच्या, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विविध क्षेत्रांमध्ये काम करतात. सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर समाजातील प्रत्येक घटक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हायला हवा. आपल्या देशातील दुर्गम, ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सेवा थेट पोहोचू शकलेली नाही. दुर्गम भागातील लोकांना अनेक किलोमीटर प्रवास करून पंचायत, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत उपचार घेण्यासाठी यावे लागते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे उपचारांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यात खूप खोलवर दिसून येतात. शारीरिक स्वास्थ्य नसेल, तर इतर कोणतंही काम होऊ न शकल्याने आर्थिक, सामाजिक स्तर खालावत जातो. एका व्यक्तीमुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नुकसान होते. हे लक्षात आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टर राम लाडे यांनी ‘वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं. उद्दिष्ट डोळ्यांसमोर असेल तर माणूस त्या ध्येयापायी वेडा होऊन काम करत असतो. त्यानुसार १२ जानेवारी २००१ रोजी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना झाली.

डॉ. राम लाडे यांचा मूळचा पिंड सेवाव्रतीचा असल्यामुळे विद्यार्थीदशेत असताना आणि महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आंदोलने केली होती. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्याला समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे या विचारातून एक वर्षभर वनवासी  क्षेत्रात जाऊन दुर्गम भागामध्ये  विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी पाहिलेले लोकांचे दुःख, दारिद्र्य याची त्यांच्या संवेदनशील मनात बोच निर्माण झाली आणि त्यातील अंतस्थ प्रेरणेतून भविष्यामध्ये आपण अशा समाज घटकांसाठी निश्चितच सेवाव्रत अंगीकारले पाहिजे असा मानस पक्का झाला. ‘हे व्रत न घेतले आम्ही अंधतेने’ या उक्तीनुसार त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सेवाव्रत म्हणूनच सुरू केला. समाजाला अत्यंत निकडीची अशी ही वैद्यकीय सुविधा कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध व्हावी ही गरज त्यांना अनुभवातून लक्षात आली आणि “समान आचार-विचारांची माणसे एकत्र येतात” तसे त्यांना सहकारीही मिळत गेले आणि विचार पक्का होत गेला.

ज्या परिसरात कोणत्याही प्रकारची आरोग्यसेवा पोहोचलेली नाही, अल्प उत्पन्न गटातील व दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचारासाठी कित्येक मैल चालत जावे लागते, प्रामुख्याने अशा समाज घटकांसाठी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना डॉ. राम लाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. नि:स्पृह, निरपेक्ष, नि:स्वार्थी वृत्तीने सेवा ही विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची ओळख आहे. गोरगरीब जनतेला केवळ वैद्यकीय सेवा देऊन उपयोग नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर अनेक स्तरावर काम केलं पाहिजे हे लक्षात घेऊन ग्रामीण व गरीब लोकांसाठी संस्थेमार्फत अनेक सेवा प्रकल्प चालवले जाऊ लागले. प्रतिष्ठानची स्थापना होऊन २३ वर्षे झाली आहेत आणि इतक्या कमी कालावधीत संस्थेच्या कार्याचा व्याप एवढा मोठा वाढला आहे की ते जाणून घ्यायला एक लेख पुरणार नाही. संस्थेच्या समाजकार्याचे विविध आयाम आपण पुढच्या दोन भागांत जाणून घेऊया.

ग्रामीण व गरीब लोकांसाठी संस्थेमार्फत पुढील सेवा प्रकल्प चालवले जातात.
१. विवेकानंद रुग्णालय
२. संजीवन लिंक वर्कर स्कीम
३. लक्ष्मीप्रभा नर्सिंग इन्स्टिट्यूट
४. विवेकानंद कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था
५. विद्यार्थी पालकत्व योजना
६. विवेकानंद मोबाइल हेल्थ युनिट्स
७. अन्नपूर्णा योजना
८. विवेकानंद पुस्तक प्रदर्शनी
९. स्वस्थ ग्राम
१०. महिला बचत गट
११. आरोग्य मित्र
१२. होम नर्सिंग केअर
१३. स्वल्पविराम योजना
१४. विवेकानंद रुग्ण साहित्य केंद्र
१५. संवाद हेल्पलाइन
१६. ज्येष्ठांसाठी निरामय योजना
१७. स्वच्छ पेय जल योजना
१८. ॲनेमिया इरॅडिकेशन प्रकल्प
१९. सहारा प्रकल्प
२०. सहेली प्रकल्प
२१. सेवासरिता
यातील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे विवेकानंद रुग्णालय.

संस्थेचे हे हॉस्पिटल १०० बेड्सचे असून मनोभावे सेवा करणारे अनुभवी डॉक्टर्स व  स्टाफ हे हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे. विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आजूबाजूच्या २०/२५ खेडेगावांमधून तसेच सोलापूर, सातारा, कोल्हापूर, कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर अशा जिल्ह्यांमधूनही  रुग्ण येतात. हॉस्पिटलमध्ये  मेडिसिन, शस्त्रक्रिया, प्रसूती आणि स्त्रीरोग, बालरोग, नेत्र रोग कान-नाक-घसा, दंत रोग, हृदयरोग, अस्थिरोग, कॅन्सर, मधुमेह, मेंदू रोग, मानसिक आजार, मूत्र रोग, निसर्गोपचार, आयुर्वेद, पंचकर्म इत्यादी विभाग आहेत. तसेच रुग्णालयामध्ये ३ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, २० बेडचा अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, एक्सरे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, रक्तपेढी, डायलिसीस व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जसे की, सी आर्म, एन्डोस्कोप, लॅप्रोस्कोप, न्युरोसर्जरी मायक्रोस्कोप, ऑस्थलमिक सर्जरी मायक्रोस्कोप, सिरींज पंप, व्हेंटिलेटर्स, सी. पॅप, बायपंप, एस्कॅन, बी स्कॅन, ग्रीन लेझर इ. उपलब्ध आहेत. गोरगरिबांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ इथे दिला जातो. या रुग्णालयात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना कामगार विमा योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना, कर्नाटकची सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट योजना या सर्व योजनांमार्फत मोफत उपचार केले जातात. तसेच अनेक विमा कंपन्यांच्या बरोबर सुद्धा करार झालेला असून त्या विमा कंपन्यांच्या मार्फत असणाऱ्या योजनांचा लाभही रुग्णांना दिला जातो.

विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत ६,५०,००० पेक्षा जास्त पेशंट्सनी उपचार घेतले  आहेत. कोविड काळामध्ये विवेकानंद हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून शासनाने जाहीर केले होते. कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये एकूण १६०० पेशंट रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि यशस्वीरीत्या उपचार पूर्ण करून डिस्चार्ज केले गेले. त्याचबरोबर १६००० पेक्षा अधिक पेशंट्सनी बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतले. हे यशस्वी आयोजन पाहून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विवेकानंद रुग्णालयाचा विशेष सत्कार केला होता.

विवेकानंद हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लसीकरण केंद्रही सुरू होते. १०,००० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण रुग्णालयामार्फत मोफत करण्यात आले. सध्या रुग्णालयाचा १०५ कर्मचारी वर्ग असून ४५ स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध आहेत. रुग्णांवर कमीत कमी खर्चामध्ये उपचार केले जातात. सांगली जिल्ह्यातील विविध गावांचे रुग्ण येथे आल्यानंतर त्यांना होणाऱ्या आजारांची कारणे आर्थिक, सामाजिक असतात हे लक्षात आल्यावर त्या क्षेत्रातही काम करण्याचे संघटनेने ठरवले आणि आरोग्याला पूरक अशा सर्व आयामावरही काम सुरू झाले. ते आपण पुढच्या भागात पाहूया.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -