Thursday, May 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख‘बाळासाहेबांच्या विरासतीची वाताहत’

‘बाळासाहेबांच्या विरासतीची वाताहत’

अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)

वर्ष १९९७ ते २०११ या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी ८ ते ९ मृत्यूपत्र तयार करून घेतल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्रातील व्यवस्थापक आणि साक्षीदार यांच्याबद्दलही बाळासाहेब आपल्या विश्वासातील मंडळींकडे खंत व्यक्त करीत असत. त्यातीलच मी देखील एक. माझे मृत्यूपत्र बनविणारे कोण हे वकील जेरोम सलढाणा आणि फेलनिन डिसूजा? असे ते म्हणत. यांच्याविषयी शिवसेनेतील कुणीही कधी ऐकले नव्हते. मृत्यूपत्रातील व्यवस्थापकांमध्ये १) ॲड. अधिक शिरोडकर, जे हयात नाहीत. २) आर्किटेक्ट, शशी प्रभू, ३) ॲड. अनिल परब, उद्धवजींचे अति निकटवर्तीय जे त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ४) रवींद्र म्हात्रे, बाळासाहेबांचे सेवक. बाळासाहेबांच्या सोबत सुरुवातीपासून सेवक म्हणून कार्यरत असलेल्या अन्य ज्येष्ठ नि:स्वार्थी सेवकांना डच्चू देण्यात आला, उदा. मोरेश्वर राजे, चंपासिंग थापा. ते मातोश्रीतून परागंदा झाले. पण रवींद्र म्हात्रे आजही मातोश्रीवर टिकून आहेत. शिवाय मृत्यूपत्रात आणखी दोन साक्षीदारांची नावे आहेत. १) डॉ. जलील परकार, २) ॲड. फेलनिन डिसूजा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यांचा भरणा. वरील सर्व नावे पाहता असा प्रश्न पडतो की, आपल्या संपूर्ण जीवनात बाळसाहेब हे “सर्वधर्म समभावाचे” पुरस्कर्ते होते की काय? मृत्यूपत्र बनविताना त्यांनी ह्या भावनेचे तंतोतंत पालन करत इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले का? म्हणूनच उद्धवजींनी शिवसेनेची परंपरागत विचारसरणीची घडी विस्कटून धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीची वाट धरली की काय?

राज ठाकरे शिवसेनेत एक शक्तिस्थान बनले होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी हे साध्य केले होते. पण त्यांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक होत राहिली. परिस्थिती अशी निर्माण केली गेली की अंतिमतः त्यांनाही शिवसेनेचा त्याग करणे भाग पडले. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मार्च २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. शिवसेनेतून अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बाहेर पडत राहिले. यास एकमेव कारण म्हणजे, आज ती बाळासाहेबांची शिवसेना राहिली नव्हती. शिवसेनेत या आधीप्रमाणे काम करण्याचे, कर्तृत्व सिद्ध करण्याचे स्वतंत्र राहिले नाही. शिवसेना संपूर्णतः व्यक्तिकेंद्रित होत गेली. महत्त्वाकांक्षा वाढल्या. कर्तृत्ववान, तुल्यबळ व प्रतिस्पर्धी नकोसे वाटू लागले, हेवे-दावे वाढत गेले. प्रतिकूल परिस्थितीत काम करणे अशक्य झाल्याने शिवसेनेत फुटीरता वाढीस लागली. यास एकमेव व्यक्ती कारणीभूत ती म्हणजे उद्धव ठाकरे.

दुसरीकडे बाळासाहेबांच्या उतरत्या व उद्धवजींच्या उगवत्या काळात बाळासाहेबांशी फंदफितुरी, कटकारस्थान, बेईमानी करत उद्धवजींची विश्वासार्हता संपादन केलेले, विश्वासू, खुशमस्करे, भाट मंडळींची शिवसेनेत रेलचेल वाढली. त्यांची कमान चढती होत गेली. उद्धवजींनी आपले पुत्र आदित्यजींना शिवसेनेत आणले, आज ते दोन नंबरचे नेते म्हणून कार्यरत आहेत. दुसरे पुत्र तेजस राजकारणात पदार्पण करण्यास घोड्यावर बसून तयार आहेत. पत्नी रश्मीताई सद्य शिवसेनेतील शक्तिस्थान बनल्या आहेत. शिवसेनेचे संपूर्ण आर्थिक धागेदोरे त्यांच्याच हाती. उद्धवजीविषयींच्या निर्णयातही त्या अग्रस्थानी. उद्धवजींना मुख्यमंत्रीपदी स्थानापन्न करण्यातही त्यांचीच महत्त्वाकांक्षा टोकाची. आज त्यांची गणना आ. भास्कर जाधवांसारखे काही खुशमस्करे ‘प्रति माँसाहेब’ अशी करण्यात मश्गुल आहेत.

शिवसेनेतील घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झाले. स्वतःच्या रक्तरेषेतील सख्खे भाऊ, त्यांच्या कुटुंबातील अन्य, तसेच चुलत्यातील कोणीही शिवसेनेत सक्रिय होऊ शकले नाहीत. पण वरुण सरदेसाई हा उद्धवजींच्या मेव्हणीचा मुलगा अर्थात रश्मीताईंचा भाचा, हा मात्र शिवसेनेतील एक शक्तिमान नेता म्हणून गाजत आहे. सर्वव्यापी वरुण सरदेसाई हे युवासेनेपासून ते मंत्रिमंडळात व प्रशासनात हस्तक्षेप करण्याइतपत प्रभावी ठरत आहेत. तसेच रश्मीताईंचे मध्यमवर्गीय माहेर, पाटणकर कुटुंब कोटी-कोटींच्या व्यवहारात गुंतले असल्याचे उघड झाले आहे. सद्य बाळासाहेबांचे वारसदार उद्धव ठाकरे कुटुंब, निव्वळ ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ह्यात रममाण आहेत. महाराष्ट्रात सत्तांतरण झाले. शिवसेना-भाजपा युती सत्तेत आली. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिंदा व जयदेव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि स्व. बिंदा ठाकरे यांचे सुपुत्र ॲड. निहार ठाकरे उपस्थित राहिले. यास्तव उर्वरित ठाकरे कुटुंब जनतेपुढे आले, त्यांचे अस्तित्व जाणवले.

अलीकडचीच एक घटना, ज्याद्वारे वाचकांनी आपला स्वतःचा अंदाज बांधावा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा नववा स्मृतिदिन १७ नोव्हेंबर २०२१ रोजी होता. अतिशय आदरभावाने व संवेदनापूर्वक तो संपन्न होतो. पक्ष, विचारसरणी, मतभेद विसरून सर्वच जण आपल्या भावना व्यक्त करीत असतात. दूरदुर्गम भागातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कस्थित स्मारकास जाणीवपूर्वक नतमस्तक होण्यास पोहोचतात. तसेच देश-विदेशातून सुद्धा प्राप्त होणाऱ्या संवेदना स्वीकारण्यास ठाकरे कुटुंब, त्यातही प्रामुख्याने बाळासाहेबांचे राजकीय वारसदार म्हणून उद्धवजी परिवारासह जातीने हजर राहावे ही साऱ्यांचीच अपेक्षा. पण घडले काय? दिवाळी साजरी केली, उच्चभ्रूंची मांदियाळी झाली, नजराणे स्वीकारले गेले अन् पुढच्याच दिवशी स्मृतिदिनाआधी उद्धवजी मानेच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलात दाखल झाले. ही काही तातडीची आवश्यकता नव्हती. दोन-चार दिवस सहज थांबता आले असते. त्यांचेच पुत्र आदित्यजी राज्याचे पर्यावरण मंत्री, देशात, मुंबई शहर सर्वात धोकादायक प्रदूषित शहर ठरत असताना आणि अतिविषारी प्रदूषणाच्या विळख्यात शेकडो नागरिक सापडले असताना, आपली जबाबदारी झटकत स्कॉटलँड देशातील ग्लासगो येथे पर्यावरण परिषदेस पोहोचले. तेही कोणतेही अधिकृत निमंत्रण नसताना आणि पर्यटन करण्याचे काम हाती घेतले.

आजोबांचा स्मृतिदिन आणि वडिलांवरील शस्त्रक्रिया यांचा त्यांना विसर पडला, ऐवजी पर्यटनास त्यांनी प्राधान्य दिले. उद्धवजींच्या नशिबी कर्माची फळे. केलेल्या कर्माचे पुनर्रोपण होत असते. गिरकी घेऊन ती स्वतःवरच उलटते अन् व्याजासह त्याची वसुली होते. हा नियतीचा खेळ नव्हे तर काय? पत्नी रश्मीताई समाधीस्थळी हजर राहणार असे म्हटले गेले होते अन् ते सहज शक्यही होते. पण तसे काही घडलेले दिसून आले नाही. धाकटे पुत्र तेजस कोठे होते याचा कोणासही थांगपत्ता नव्हता. बाळासाहेबांचे स्मारक अद्याप उभे राहिले नाही. मुंबई मनपा तद्नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हाती असताना शिवाजी पार्कस्थित मुंबई महापौर निवास स्मारकासाठी तत्परतेने ताब्यात घेण्यात आले. या जागेचा वापर खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे राजरोसपणे राजकारणासाठी होतो आहे, पण स्मारकाचा ठावठिकाणा नाही. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याचे निश्चित झाले. पण मार्ग पूर्णत्वास नेण्याचे खासे प्रयत्न झाले नाहीत. सद्य शिंदे सरकारने विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मान्यता मिळवली व तसे ते लागलेही. ही मान्यता मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी का मिळवली नव्हती? मी व माझे कुटुंब यांची पित्याप्रती ही आत्मीयता.

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारले, ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते झाले. त्यांनी आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात परिवर्तन आणले. एखाद्या साधू-संतांप्रमाणे भगवाधारी झाले, दाढी वाढवली. त्यांनी गळ्यात, मनगटात रुद्राक्षांच्या माळा परिधान केल्या. या माळा विविध ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणाहून, साधू-संतांनी, हिंदू धर्म मार्तंडांनी आणि शिवसैनिकांनी आदरभावाने त्यांना अर्पण केल्या होत्या. परिधानापूर्वी त्यांनी जाणकार तज्ज्ञांकरवी या संदर्भात सल्ला घेतला होता. या परिधानात ते अत्यंत तेजस्वी भासत. या बाळासाहेबांच्या अंगा-खांद्यावरील रुद्राक्षांचे पुढे काय झाले? या रुद्राक्ष माळांना देव्हाऱ्यात स्थान मिळाले का? उद्धवजींनी ते अंगीकारले का? बाळासाहेबांचा मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाला. मृत्यूनंतर मातोश्रीवर दुखवट्यादरम्यान सांत्वनासाठी पोहोचलेल्या एका धर्म विचारवंत व ज्योतिषतज्ज्ञ यांना त्या रुद्राक्ष माळा अडगळीत पडलेल्या आढळल्या. लागलीच त्या त्यांनी आदर भावाने आपल्या ओंजळीत घेतल्या आणि उद्धवजींच्या हाती देत, त्यांना त्या माळा अथवा त्यातील काही रुद्राक्ष परिधान करण्याचा सल्ला दिला. उद्धवजींनी या सल्ल्याचा अवमान करत त्या रुद्राक्ष माळा रागाने फेकून दिल्या. बाळासाहेबद्वेष्ठे छगन भुजबळ बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर बाळासाहेबांना भेटण्यास पोहोचले. भेट म्हणून त्यांनी बाळासाहेबांना एक उंची वाईन बॉटल व कार्टिअर कंपनीचे लाखो रुपयांचे घड्याळ भेट दिले. ते घड्याळ मात्र आजही सद्य ठाकरेंच्या मनगटाची शोभा वाढवताना दिसते.

बाळासाहेबांनी शिवसेना ही मराठी जनासाठी, यात कालानुरूप परिवर्तन करीत हिंदुत्वाचा स्वीकार केला. समविचारी भारतीय जनता पार्टीस सोबत न घेतल्यास मतविभागणी होईल आणि याचा फायदा विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल या कारणास्तव त्यांच्याशी महाराष्ट्रात युती केली. ती त्यांनी आपण हयात असेपर्यंत अखंड राखली. उद्धवजींनी मात्र मराठी माणसांबरोबरच हिंदुत्वालाही मूठमाती दिली आणि भाजपाबरोबरची पाव शतकभर अखंड असलेली युती संपुष्टात आणली. एवढे झाले असते तरी ठीक, पण ज्या काँग्रेस विचारसरणीचा बाळासाहेबांनी अखंड तिरस्कार केला त्याच काँग्रेसबरोबर उद्धवजींनी शैय्यासोबत केली.

वरील सर्व संदर्भ पाहता कुटुंबाची वाताहत, शिवसेनेतील तुल्यबळांशी फारकत, मराठी-हिंदुत्वास मूठमाती, भाजपाशी युती संपुष्टात, या सर्वांचे अमृत मंथन घडविले, तर त्यातून एकमेव गोष्ट अवतरेल, ती म्हणजे या सर्वास एकमेव व्यक्ती कारणीभूत असल्याचे. एक व्यक्ती मुघलशाही व औरंगजेबाची पुनरावृत्ती करू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण. कुटुंबातील सर्वांचे आणि सख्ख्या भावांची तर निश्चित, प्रत्येक इच्छा पूर्ण करणे सहज शक्य होते. दैवानेच तशी सोय करून ठेवली होती, तरीही एका व्यक्तीचे कर्म त्यास आडवे आले. अख्ख्या शिवसेनेत कोणीही यांचे प्रतिस्पर्धी नव्हते, असल्यास ते तुल्यबळ. यांच्या सत्तास्थानाला कोणीही आव्हान देत नव्हते, सर्वांनीच यांचे नेतृत्व मान्य केले होते. पण सत्ता पदरी पाडून घेण्याचा हव्यास आणि पुत्रप्रेम यासाठी त्यांनी जे करून दाखविले ही त्यांची शंभरावी चूक ठरणार, अथवा ही एकमेव चूक शंभर चुका बरोबरीइतकी गंभीर ठरली नाही तरच नवल. माझे ते माझे, तुझे तेही माझे. केवढी ही भस्मासुरी भूक? हा स्वभावगुण
नव्हे तर ही आहे विकृती. विकृती अल्पायुषी असते, तरीही ती अद्याप जीवित आहे हे नवल. जनताच प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, वकील आणि न्यायाधीशही. जनतेकडेच ही विकृती कायमची गाडून टाकण्याची नामी संधी चालून आलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -