Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणCrime: अवघं कोकण हादरलं, पतीच्या हत्येनंतर काहीही न केल्याचा कांगावा...

Crime: अवघं कोकण हादरलं, पतीच्या हत्येनंतर काहीही न केल्याचा कांगावा…

रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने ६४ वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ (वय वर्ष ६४ राहणारे नांदिवडे भंडारवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केले नाही, असा कावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे उघड झाला आहे. पत्नीने धारदार सुरीच्या साह्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

२६ जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपण त्यांना अंगणात आणलं. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली. घराला बाहेरून कडी घालून घेतली आणि आपण काही केलेच नाही अशा अविर्भावात होती. या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. काही वेळातच पोलिस यंत्रणा डॉगस्कॉड सहित घटनास्थळी दाखल झाली. जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या याचा वास डॉगस्कॉडला देण्यात आला. यावेळी डॉगस्कॉड या ठिकाणी असलेली शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच दोन-तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचे उघड झाले.

याप्रकरणी संशयित पत्नी शितल पडवळ आणि पत्नीचा प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. जयगड येथे रहाणारे मयत सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष ६४ राहणार नांदिवडे हे मोल मजुरीचे काम करायचे. पत्नी शितल पडवळ हिचा गावातच एक स्टॉल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यापूर्वीही असा जीवघेणा हल्ला पती सुरेश पडवळ यांच्यावर पत्नीने केला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे.

मात्र, त्याच वेळेला त्यांची पत्नी शितल सुरेश पडवळ आणि तिचा प्रियकर मनराज दत्ताराम चव्हाण यांचे प्रेम संबंध असल्याचा संशय त्यांच्या पतीला होता यावरून घरात सातत्याने भांडण सुरू होती. याच रागात शितल पडवळने निर्दयीपणे खून करत सुरेश पडवळ यांचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शितल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण (मु. नांदिवडे भंडारवाडा) यांना ताब्यात घेतले असून या दोन्ही नराधमांवर भा.द. वि. क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -