Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनडबल इंजिन आणि जय बजरंगबली…

डबल इंजिन आणि जय बजरंगबली…

  • स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
भाजपने ‘प्रजा ध्वनी’ या नावाखाली कर्नाटकसाठी निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात राज्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन दिले आहे. समान नागरी कायदा हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा आहे.

दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे आणि भाजपची सत्ता हिसकावून घेण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आदी काँग्रेसचे दिग्गज नेते रणांगणात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. आमची सत्ता आल्यास बजरंग दलासारख्या संघटनांवर राज्यात बंदी आणली जाईल, असे काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिल्यामुळे हिंदू मतदार कमालीचे दुखावले गेले आहेत. काँग्रेसने अगोदर रामजन्मभूमी मंदिराला विरोध केला आणि आता बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा केली जात आहे, यातून काँग्रेसला कोणाचे लांगुलचालन करायचे आहे, हे मतदारांनी ओळखले आहे. ‘जेव्हा मतदानाला जाल, तेव्हा बटण दाबल्यावर जय बजरंगबली म्हणा’, असा संदेश पंतप्रधानांनी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पायाखालील वाळू घसरली आहे.

देशात या वर्षी रामनवमी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी झाली तरीही काही राज्यांत रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक झाली व दंगली घडल्या. त्यानंतर हनुमान जयंतीही यंदा दणक्यात साजरी झाली. पण त्या उत्सवालाही गालबोट लावण्याचा काही राज्यांत प्रयत्न झाला. हे दंगलखोर, दगडफेक करणारे, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांच्या विरोधात चिथावणी देणारे कोण आहेत? हे आज ना उद्या उघड होईलच. पण उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यांत रामनवमी व हनुमान जयंती हे उत्सव शांततेने पार पडले. कारण योगी आदित्यनाथ यांच्यासारखे तिथे कणखर नेतृत्व आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा बोलली जात असेल, तर ती धमकी कोणाला आहे व कोणाला खूश करण्यासाठी हे मतदारांना चांगले समजते. म्हणूनच काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यानंतर कर्नाटकमधील रणांगण तापले आहे.

कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ६४ रोड शो व सभांचे आयोजन केले आहे. डबल इंजिन सरकार असेल, तर राज्याचा विकास वेगाने होऊ शकतो, हा मुद्दा मोदी-शहा जोरदारपणे मांडत आहेत, तर हिंदू मतांवर प्रभाव पाडण्यासाठी योगींचा उपयोग केला जात आहे. कर्नाटक हे भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू, पुडूचेरी, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात लोकसभेच्या १३० जागा आहेत. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिणेतून २९ जागा मिळाल्या. पैकी २५ जागा कर्नाटकने दिल्या होत्या. म्हणूनच भाजपने कर्नाटकमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधानांच्या रोड शोला विविध शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. ‘नम्मा बेंगलूरु, नम्मा हेम…’ (हमारा बेंगलूरु, हमारा गौरव) अशी घोषणा त्यांच्या रोड शोसाठी पक्षाने दिली होती. पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये हुनमानाच्या वेषातही एक कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान आहे. १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत असल्याने एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाची धडधड वाढली आहे. कर्नाटकात हा पक्ष तिसरी शक्ती म्हणून निवडणूक लढवतो आणि नंतर सौदेबाजी करून सत्तेचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आम आदमी पक्ष, बसपा, उत्तम प्रजाकिया पार्टी, डावे पक्ष, कर्नाटक राष्ट्र समिती, कल्याण राज्य प्रतिपक्ष अशा लहान-लहान पक्षांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आपने गेल्या निवडणुकीत २८ जागांवर उमेवार उभे केले होते. यावेळी तर २१३ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

गेल्या निवडणुकीत बसपाने जनता दल सेक्युलरबरोबर जागावाटपाचा समझोता केला होता. यंदा तर बसपाने १३७ मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहेत. कर्नाटकचे स्थानिक व कन्नड अस्मिता घेऊन लढणारे पक्ष किती मते घेतील? याचीच भाजप व काँग्रेसला चिंता असते. बेल्लारीतून भाजपचे अगोदर आमदार राहिलेले जी. जनार्दन रेड्डी यांच्या कल्याण राज्य प्रगती पक्षाने ४९ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.

पंतप्रधानांनी बेल्लारीमधील एका जाहीर सभेत भाषणाची सुरुवातच बजरंग बलीच्या जयजयकाराने केली. ‘आपण बजरंग बली बोललो तरी काँग्रेसला त्याची अडचण वाटते’, असे ते म्हणाले. दहशतवादी प्रवृत्तीवर आधारीत ‘केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झालाय. पण काँग्रेसने त्याला विरोध करीत अनेक अडथळे आणले. दहशतवादी प्रवृत्तीला काँग्रेस साथ देत आहे, असे चित्र दिसले, अशी टीका पंतप्रधानांनी केली. विशेष म्हणजे केरळ उच्च न्यायालयानेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली. सुदानमध्ये गृहयुद्ध पेटले आहे. तिथे अडकलेल्या कर्नाटकमधील शेकडो नागरिकांना आपल्या सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ राबवून कसे सुरक्षित परत आणले, हे पंतप्रधान प्रत्येक सभेत आवर्जून सांगत आहेत. जनता दल सेक्युलरला मत म्हणजे काँग्रेसला मत, हे दोन्ही पक्ष एकच आहेत, कर्नाटकात येणारी गुंतवणूक अडविण्याचे काम हे दोन्ही पक्ष करतात, अशीही टीका पंतप्रधानांनी केली आहे. आम्ही एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले, तेव्हाही काँग्रेसने विरोध केला, याची मोदी सभांमध्ये आठवण करून देत आहेत.

मुडबिद्रीमधील जाहीर सभेत पंतप्रधानांनी बजरंग बलीचा जयजयकार करणारी सहा वेळा घोषणा दिली. मतदान केंद्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली बोला आणि काँग्रेसला शिक्षा द्या’, असेही त्यांनी कर्नाटकच्या मतदारांना आवाहन केले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावरच आगपाखड चालवली आहे. राज्यातील भाजपचे सरकार सरसकट ४० टक्के कमिशन घेत होते, असा आरोप काँग्रेसचे नेते प्रचार सभांमध्ये करीत आहेत. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात बजरंग दलसारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहेच. शिवाय प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत, कुटुंबातील प्रत्येक प्रमुख महिलेला दरमहा २ हजार रुपये, बेरोजगार पदवीधराला दोन वर्षांसाठी दरमहा ३ हजार रुपये, बेरोजगार पदविकाधारकांना दरमहा १५०० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. बीपीएल परिवाराला दरमहा १० किलो धान्य, १००० कोटी रुपयांचा ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील २५ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम, दुधासाठी अर्थसहाय्य ५ रुपयांवरून ७ रुपये, शेळी-मेंढी पालनासाठी शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज देण्याचे काँग्रेसने आश्वासन दिले आहे. सत्ता आल्यावर राज्य सरकारच्या बसेसमधून महिलांना मोफत प्रवास देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्व सरमा यांनी काँग्रेसचे निवडणूक घोषणापत्र मुस्लीमधार्जिणे असल्याची टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीपल फेडरेशन ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेवर बंदी घालणार असल्याचे जाहीर केले म्हणून काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने ‘प्रजा ध्वनी’ या नावाखाली कर्नाटकसाठी निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात राज्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन दिले आहे. समान नागरी कायदा हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा आहे. बीपीएल परिवारासाठी रोज अर्धा किलो नंदिनी दूध, गणेश चतुर्थी व दीपावली सणाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

राज्यातील दहा लाख बेघरांना घरे, सरकारी शाळांचे आधुनिकीकरण, ज्येष्ठ नागरिकांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी, मोफत भोजन देण्यासाठी अटल आहार केंद्रे, वोक्कलिंगा व लिंगायत समाजाला २ टक्के आरक्षण वाढवणार, कर्नाटकाला एनआरसी लागू होणार, बेकादेशारी स्थलांतरितांची परत पाठवणी करणार तसेच तिरूपती, अयोध्या, काशी, केदारनाथ, रामेश्वरम, कोल्हापूर, सबरीमाला. अशा यात्रेला जाण्यासाठी गरीब परिवारांना २५ हजार मदत, असे आश्वासन भाजपने दिले आहे.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -