Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलआनंद....देण्या-घेण्यातला!

आनंद….देण्या-घेण्यातला!

  • कथा : रमेश तांबे

‘काही वेळानंतर फुलपाखरू थेट माणसांत येऊन बसले. अन् मोठ्या उत्सुकतेने बघू लागले. लोकांचे व्यवहार सुरू होते. पण देण्या-घेण्यात आनंद नव्हता’.

एकदा एक फुलपाखरू गेलं एका फुलाकडे अन् त्याला म्हणाले, ‘अरे फुला, मी तुझ्यातले मध खाऊ का रे?’

फूल म्हणाले, ‘खा, पण मला कळणार नाही असं खा.’ फुलाचं उत्तर ऐकून फुलपाखरू गोंधळलं अन् गेलं आईकडे. आईला म्हणाले, ‘आई आई फुलाच्या नकळत त्यातले मध कसे खायचे गं!’

आई म्हणाली, ‘अरे वेड्या तुला जेवढी भूक आहे ना, तेवढंच खायचं. म्हणजे फुलाला त्रास होणार नाही. कारण, जसं मध खाणं तुला अतिशय गरजेचं तसंच फुलालादेखील मध दुसऱ्याला द्यायचं असतं. फक्त एकच लक्षात ठेव, जोपर्यंत देण्या-घेण्यात आनंद आहे, तोपर्यंत कुणालाही त्रास नाही. पण एकदा का दोघांच्याही मनात स्वार्थ जागा झाला, हाव निर्माण झाली की, त्रास सुरू झालाच समज!’

फुलपाखराला आईचं बोलणं समजलं. ते झटपट फुलाकडे गेलं अन् मोठ्या आनंदानं मध खाऊ लागलं. फुलपाखराला मध घेण्यातला अन् फुलाला मध देण्यातला आनंद मिळू लागला. पोट भरताच फुलपाखरू उडून गेले. जाता जाता त्याने मोठ्या आनंदाने फुलाचे आभार मानले. फुलानेही त्याला हसून प्रतिसाद दिला.

आता फुलपाखरू गेलं आपल्या मित्रांकडे. म्हणाले, ऐका हो ऐका… घेण्यातही आनंद आहे, अन् देण्यातही आनंद आहे. गरज असेल तेवढेच घ्या. कमी नको, जास्त नको. उद्याची चिंता करू नका. उगाच साठा करू नका! सगळ्यांनी अगदी कीटक, पक्षी, प्राणी, झाडे, वेली, नद्या, समुद्र साऱ्यांनीच फुलपाखराचं बोलणं ऐकलं. सारेच खूश झाले… सगळ्यांनाच आनंदाची बाग सापडली!

काही वेळानंतर फुलपाखरू थेट माणसांत येऊन बसले. अन् मोठ्या उत्सुकतेने बघू लागले. लोकांचे व्यवहार सुरू होते. पण, देण्या-घेण्यात आनंद नव्हता. प्रत्येकजण दुसऱ्याला फक्त ओरबडत होता. फुलपाखरू म्हणाले, ‘अरे माणसा हवे तेवढे खुशाल घे. पोटभर खा. पण साठवणूक करू नकोस.’ माणसांना सांगून सांगून फुलपाखरू दमून गेले. हतबल झाले. देण्या-घेण्यातला आनंद, त्यातले समाधान माणसांना समजावून देता आले नाही म्हणून फुलपाखरू निराश मनाने माघारी फिरले.

जाता-जाता रस्त्यात फुलपाखराला लहान मुलं दिसली. ती आनंदाने खेळत होती, नाचत होती. बोरं, करवंद, चिंचा पाडून एकमेकांना देत होती. ते पाहून फुलपाखराला आनंद झाला. चला कुणीतरी देण्या-घेण्यातला आनंद घेत जगत आहे. फुलपाखरू आनंदाने निघाले, रंगिबेरंगी पंख हलवत, गिरक्या घेत, गाणे गुणगुणत…
घ्या रे सारे आनंदाने
द्या रे सारे आनंदाने!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -