Monday, May 27, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीDnyaneshwari : दुःखावर फुंकर माऊलींची

Dnyaneshwari : दुःखावर फुंकर माऊलींची

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

‘अपैशून्य’मध्ये ‘अ’ आणि ‘पैशून्य’ असे दोन शब्द आहेत. ‘अ’चा अर्थ ‘नाही’, तर ‘पैशून्य’ म्हणजे चहाडी, ठकबाजी! दुसऱ्या माणसातील वैगुण्य पाहून त्यावर टीका करणं म्हणजे ‘पैशून्य’. याउलट ते वैगुण्य दूर करण्यासाठी मदतीचा हात देत त्याला माणूस म्हणून घडवणं हे ‘अपैशून्य’ होय. हेच गुण माऊलींसारख्या संतांठायी असतात, ज्याने ते माणसांमधील कमीपणा दूर करत त्यांच्या दुःखावर फुंकर घालत असतात.

माऊलींची ममता काय सांगावी! आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसाच्या ठिकाणी काही कमीपणा असेल, तर सर्वसाधारणपणे इतर माणसं तो दोष दाखवतात, त्याला उघडं पाडतात, कधी टोचून बोलतात त्यावरून. पण याउलट असते संताची दृष्टी! ते त्या माणसामधील कमीपणा आपल्या शक्तीने दूर करतात. त्याच्याकडे दयेने पाहतात. हा गुण ज्याला ‘ज्ञानेश्वरी’त म्हटले आहे ‘अपैशून्य’!

माऊलींच्या ठिकाणी हा गुण अपार आहे. ज्याला माणूस म्हणून उत्तम बनायचं आहे, त्याने हा गुण प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणून या गुणाचा उल्लेख भगवद्गीतेत सोळाव्या अध्यायात ‘दैवी संपत्ती’मध्ये येतो. ‘ज्ञानेश्वरी’त ज्ञानदेवांनी याचं इतकं सुंदर स्पष्टीकरण केलं आहे. ते पाहूया आता. त्यासाठी दिलेले दाखले इतके नेमके आहेत! ‘एखादा चिंताग्रस्त माणूस किंवा रुग्ण आपला आहे किंवा परका हे मनात न आणता जसा चांगला वैद्य त्याच्या दुःखाचे निवारण करतो.’ ओवी क्र. १४१

किंवा ‘एखादी गाय चिखलांत रुतल्यावर तिचे दुःख पाहून ज्याचे मनात कासावीशी होते, ती दुभती आहे किंवा भाकड इकडे लक्ष न देता तो तिला वर काढतो.’ ओवी क्र. १४२

अथवा महावनांत दुष्टांनी एखाद्या पतिव्रता स्त्रीस लुबाडून तिला वस्त्रहीन करून सोडून दिले, अशा स्त्रीला सज्जन प्रथम वस्त्रे देऊन नंतर तिची विचारपूस करतो’ ही ओवी अशी –
“कीं महावनीं पापियें। स्त्री उघडी केली विपायें।
ते नेसल्याविण न पाहे। शिष्टु जैसा॥” ओवी क्र. १४४

सुरुवातीचा दाखला आहे रुग्णाचा. एखाद्या माणसाच्या ठिकाणी काही कमीपणा आहे, तर तो त्याचा दोष नाही, तर आजार आहे, हे आधुनिक मानसशास्त्र सांग‌तं. म्हणून त्याच्याकडे ‘सह अनुभूती’ने पाहा. हीच गोष्ट मानसोपचार तज्ज्ञ माऊलींनी किती वर्षांपूर्वी ओळखली, सांगितली! असा माणूस आपला आहे की परका असा भेद न करता वैद्य त्याच्यावर उपचार करतो, त्याप्रमाणे सज्जनाच्या ठिकाणी वृत्ती असते.

आजच्या भाषेत बोलायचं, तर ज्ञानदेव हे स्वतः उत्तम Healer आहेत. लोकांचं दुःख दूर करणारे! ही (Healing Power) दुःखावर फुंकर मारण्याची वृत्ती आणि शक्ती सत्पुरुषाच्या ठायी असते.

दुसरा दाखला आहे भाकड गाईचा. ती दुभती किंवा भाकड हे न बघणं म्हणजेच समोरील व्यक्ती फायदेशीर आहे किंवा नाही हे न पाहता मदत करणं. असं निरपेक्षपणे धावून जाणं! हेच तर भगवद्गीतेचं सार आहे – कर्म करा, अपेक्षा न ठेवता. (कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन).

आता नंतरचा दृष्टांत वनात लुबाडल्या गेलेल्या पतिव्रता स्त्रीचा आहे. यातही किती सूचकता आहे! काही वेळा चांगली माणसं त्यांची चूक नसताना संकटात सापडतात. अशा वेळी त्यांना प्रथम धीर देणं, त्यातून बाहेर काढणं हे महत्त्वाचं. मग असं का घडलं, याची विचारणा करणं. अशा प्रकारे सत्पुरुषाची वागणूक असायला हवी.

ज्ञानदेव असे अनेक साजेसे दृष्टांत देतात. पुढे ते म्हणतात, “(सज्जन) आपल्यापुढे येणाऱ्या मनुष्याचा कमीपणा आपल्या गुणसामर्थ्याने दूर करून नंतर त्याजकडे दयार्द्र दृष्टीने पाहतात.” या लक्षणाला म्हटलं आहे ‘अपैशुन्य’! यात ‘अ’ आणि ‘पैशून्य’ असे दोन शब्द आहेत. ‘अ’ शब्दाचा अर्थ आहे ‘नाही’, तर ‘पैशून्य’ म्हणजे चहाडी, ठकबाजी! दुसऱ्या माणसातील वैगुण्य पाहणं, त्यावर टीका करणं हे झालं ‘पैशून्य’. याउलट ते वैगुण्य दूर करण्यासाठी त्याला मदतीचा हात देणं, त्याला माणूस म्हणून घडवणं हे ‘अपैशून्य’ होय. हे सारं वर्णन वाचून आपणही विचारप्रवृत्त होतो, अंतर्मुख होतो. आपण काय करतो? आपल्या ठिकाणी ‘अपैशून्य’ आहे की ‘पैशून्य’?

हे अंजन घालणारी
ज्ञानेश्वर माऊली
साऱ्या दीनांची साऊली
नत होऊ तिच्या पाऊली…!

manisharaorane196@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -