Monday, June 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : “देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी”

Wamanrao Pai : “देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी”

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

हा रंग जो आहे तो इथेही आहे व तिथेही आहे. जिथे पाहाल तिथे हा रंगारी आहे. वाघाचे पट्टे पाहा. ते कोणी रंगविले? कुणीतरी रंगवणारा आहे की नाही? जीवनविद्या काय सांगते, “निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर”. हे नैसर्गिक आहे, Automatic आहे, Self Regulatory आहे. परमेश्वर तिथेच आहे व त्याच्यामुळेच हे सगळे चाललेले आहे. काय गम्मत आहे पाहा. आपला श्वासोच्छ्वास चाललेला आहे तिथे लक्ष द्या. ही परमार्थातील फार मोठी साधना आहे. श्वास आपण घेतो व श्वास आपण बाहेर सोडतो. तुम्ही इथे एकदा लक्ष द्यायला लागलात की, श्वास मंद व्हायला लागतो. श्वास कमी कमी व्हायला लागतो. कमी कमी होत होत तो मंद होतो, मात्र बंद होत नाही. इतका मंद होतो की एकदम स्थिर झाल्यासारखा होतो व ते आरोग्याला पण चांगले असते.

खरा श्वासोच्छ्वास कसा झाला पाहिजे? झोपेत आपण श्वासोच्छ्वास कसा करतो तिथे लक्ष द्या, तसा एरव्हीही झाला पाहिजे. हा श्वासोच्छ्वास आरोग्याला चांगला असतो. झोपेत जो चालतो तो नैसर्गिक आहे. झोपेतले मूल बघा श्वासोच्छ्वास कसा करते ते. नवरा झोपलेला असताना बघा. तुम्ही बायको झोपेत श्वासोच्छ्वास कसा करते ते बघा. एकमेकांकडे बघा. श्वास व उच्छ्वास हा चमत्कारांचा आगार नाही का? यापेक्षा चमत्कार कुठे आहे? कोणीतरी ते करते आहे किंवा कोणामुळे, तरी ते चाललेले आहे. कोणीतरी ते करते आहे असे म्हटले की, तिथे Personification येते. तिथे व्यक्ती वगैरे कोणी नाही. हे कोणामुळे, तरी चाललेले आहे. हे ज्याच्यामुळे चाललेले आहे तो परमेश्वर!!!

चाले हे शरीर कुणाचिये सत्ते।
कोण बोलावितो हरिविण॥
ऐकवी देखवी एक नारायण।
तयाचे भजन चुको नका॥

भजन म्हणजे स्मरण! पुन्हा आपण स्मरणावर आलो. सांगायचा मुद्दा श्वासोच्छ्वास वगैरे एकेक गोष्टी पाहायला गेलो, तर परमेश्वराकडे आपण कसे लक्ष द्यायचे हे आपल्या ध्यानात येईल. परमेश्वराकडे आपले सतत लक्ष गेले पाहिजे कारण, तो आपल्याला सतत खुणावत असतो. त्याचे ते खुणावणे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण हवे व नको यांत अडकलेले आहोत. हवे-नकोचा विळखा अशा प्रकारे सोडवायचा की हवे नको, तर ठेवायचे, पण त्यात गुंतायचे नाही. हे कोण शिकवतात? हे सद्गुरू शिकवितात म्हणून सद्गुरू करायचा की नाही हे तू ठरव, कारण ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -