Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यढोंगीपणा, पाखंडीपणा म्हणजेच हिपोक्रसी!

ढोंगीपणा, पाखंडीपणा म्हणजेच हिपोक्रसी!

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

हिपोक्रसी यालाच आपण दांभीकपणा, कपटीपणा अथवा द्वि मुखी वर्तन पण म्हणतो. आपल्या आजूबाजूला, समाजात, कुटुंबात अनेक अशी हिपोक्रसी पर्सनॅलिटी असलेले लोक असतात. आपल्याला वेळोवेळी त्यांचे विचित्र अनुभव पण येतात. पण नेमकी कोणत्याही व्यक्तीची अशी वर्तवणूक का आहे? असा कसा स्वभाव आहे? त्याला काय म्हणतात? ती व्यक्ती अशी का झाली अथवा असे स्वभाव असल्यास त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला समजत नाही. किंबहुना आपल्याला ते माहिती नसतं, समजत नसतं किंवा एखाद्याची अशी वागणूक आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असते.

आता नेमकं हिपोक्रसी व्यक्ती कशी वागते? तर या व्यक्ती आपण जे नाही आहोत, जसे नाही आहोत ते सातत्याने दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणजेच सोंग घेत असतात. हे लोक सर्वसामान्य म्हणजेच नॉर्मल लोकांपेक्षा खूप वेगळे असतात. नॉर्मल सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या लोकांपेक्षा हे लोक खूप वेगळे वागत असतात. बोलायचं एक, दाखवायचं एक आणि करायचं भलतंच अशा प्रकारे यांचा स्वभाव असतो. हा स्वभाव त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, आयुष्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये पाहायला मिळतो. खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचा आभास निर्माण करणे, खूप मोठ्या विषयांवर बोलणे, सतत वेगवेगळ्या गोष्टी करण्याची वचन देणे, तसं वातावरण तयार करणे, इतरांना पण त्यासाठी आपल्या बोलण्यातून उत्तेजित करणे, पण त्या गोष्टी कधीही पूर्ण न करणे यात अशी लोकं अग्रेसर असतात. गप्पा खूप मोठ्या मारायच्या पण प्रत्यक्षात तसे काहीही त्यांना करायचं नसतं अथवा त्यांच्याकडून ते होत नाही, जमत नाही असा स्वभाव या लोकांमध्ये पाहायला मिळतो.

हिपोक्रसी पर्सनॅलिटी असलेले लोक स्वतःचं महत्त्व वाढावं आणि ते कायम राहावं म्हणून इतरांवर सतत टीका करत असतात. या लोकांना इतरांच्या माघारी बोलण्याची अत्यंत वाईट सवय लागलेली असते. आपण जे खोटं जग, विश्व आणि आपली हवा, वलय स्वतःभोवती तयार केलं आहे त्याला कोणी धक्का लावू नये म्हणून ते इतरांची निंदा करून, इतरांना कमजोर करून, दुसऱ्याचं मानसिक खच्चीकरण करून स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असतात. या लोकांनी इतरांना दाखवण्यासाठी स्वतःभोवती जो भ्रम अथवा आभास तयार केलेला असतो तो आभास खोटा आहे हे कधीच इतरांना कळू नये, आपले खरं रूप, खरं अस्तित्व, खरं व्यक्तिमत्त्व, खरी परिस्थिती, खरी अवस्था, खरा स्वभाव कधीच कोणासमोर उघड होऊ नये म्हणून असे लोक सतत इतरांची निंदा करत राहतात.

प्रत्येकाशी हे लोक वेगवेगळे बोलतात. कोणत्याही विषयावर सगळ्यांसमोर एक सारखं मत, विचार, निर्णय असे लोक मांडत नाहीत. समोर कोण आहे, त्याचा कल काय आहे, तो या विषयावर आपल्याशी कोणत्या संदर्भात जोडला गेलेला आहे, त्याला काय ऐकायला आवडेल, त्याला कितपत माहिती देण्यात आपला फायदा आहे किंवा आपला हेतू साध्य होणार आहे यानुसार अशी लोकं स्वतःच बोलण ठरवतात. समोरील माणसाची बौद्धिक, वैचारिक, मानसिक, भावनिक कुवत, त्याची आपल्याशी असलेली गुंतवणूक, नातं, संबंध, विश्वास हे सर्व अभ्यासून मगच हिपोक्रसी मानसिकतेचे लोक स्वतःचा डाव टाकत असतात. कोणासमोर स्वतःची कोणती बाजू कशी दाखवायची, कशी मांडायची, कुठे कोणता पत्ता वापरायचा हे यांना चांगलंच अवगत असतं. कोणाला भावनिक करायचं तर कोणाशी व्यावहारिक बोलायचं हे ते स्वतःच्या सोईनुसार ठरवतात.

डबल स्टँडर्ड असा यांचा स्वभाव असतो. एखादी गोष्ट दुसऱ्याने केली तर ते चुकीचे पण स्वतः केलं तर ते योग्यच आहे असा पवित्रा या लोकांचा असतो. म्हणजेच लोकांसमोर बोलताना अमुक एक गोष्ट चुकीची आहे, असं वागलं नाही पाहिजे, असं केलं नाही पाहिजे असं हे लोकं प्रकर्षाने सांगतील पण स्वतः मात्र ती गोष्ट बिनधास्त करतील. अशा वेळी त्यांना जर कोणी विचारलं तुमचा तर या गोष्टीला विरोध होता मग तुम्ही हे का केले. तर मात्र माझ्यासाठी हे करणं कसं योग्य होतं, कसं फायद्याचं होतं आणि त्यात काहीच वावगं नव्हतं अशा पद्धतीने ते पटवून दिलं जातं. बोलायचं वेगळं करायचं वेगळं, जे बोलायचं ते करायचं नाही असं वागून हे लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांना कायम द्विधा मन:स्थितीमध्ये ठेवतात. अशा लोकांवर आंधळा विश्वास ठेवणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना जीव लावणारे लोक मात्र कधीच हे समजू शकत नाही की ही हिपोक्रसी मानसिकता किती घातक आहे आणि त्याचा परिणाम किती गंभीर होवू शकतो.

इतरांना वेड्यात काढता काढता असे लोक स्वतः कधी वेड्यात निघतात ते त्यांनाच कळत नाही. कायम दुटप्पी भूमिकेत वागल्यामुळे यांच्याजवळ कोणीही कायमस्वरूपी टिकत नाही, लोक दुखावले जातात, अशा लोकांच्या आजूबाजूला कोणीही सरळ मार्गी, सत्य वचनी, स्वतःचे नितीमूल्य असलेली, थोडीफार समज असलेली व्यक्ती कधीच थांबत नाही. ज्या लोकांना यांचं हिपोक्राटीक व्यक्तिमत्त्व समजतं ते चुकूनही यांच्या जवळ थांबत नाहीत, जवळ येत नाहीत. ज्यांना स्वतःची सदसदविवेक बुद्धीच नाही, अथवा ज्यांना अशा व्यक्तीच्या हो ला हो मिळवणे योग्य वाटतं तेच यांच्या सोबत राहणे पसंत करतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेले अशा स्वभावाचे लोक ओळखणे आणि त्यांच्या या वृत्तीचा आपण शिकार होणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -