Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीAmbenali Ghat : 'आंबेनळी घाट' भय इथले संपत नाही

Ambenali Ghat : ‘आंबेनळी घाट’ भय इथले संपत नाही

घाटाला पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचे ग्रहण

पोलादपूर : आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा घाटरस्ता म्हणजे एक वळणदार पायवाट जी आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे. कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढली आहे. मात्र या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाण ही बरेच वाढलेले आहे. त्यामुळे आजही आंबनळी घाटातील भय संपत नाही. तर घाटात पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचे ग्रहण या घाटाला लागले आहे.

सह्याद्रीच्या डोंगरात नागमोडी वळणाचा आणि उंच चढत जाणारा रस्ता. नजर ठरत नाही अशा खोल दऱ्या म्हणजे पोलादपूर तालुक्यातून महाबळेश्वर राज्य मार्गावरील आडगावापासून सुरू होणारा आंबेनळी घाट. या घाटाला पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महाड विभागाला अद्याप सुटलेले नाही. दरवर्षी दरडी कोसळत असल्याने कित्येक दिवस आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पावसाळी चार महिन्यांतील घाटातील सृष्टीसौंदर्यांच्या आनंदाला दरवर्षी हजारो पर्यटक मुकत आहेत.

गेल्या वर्षीही दरडी कोसळल्या

गेल्या वर्षी जुलैमध्ये आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत चिरेखिंड ते वाडा या चार किलोमीटरमध्ये चिरेखिंड दाभीळ टोक कालकाई मंदिर रस्यावर दरडी कोसळल्या होत्या. तर महाबळेश्वर तालुक्यातील वाडा ठिकाणापासून मेटतळे गावापर्यंत मोठमोठ्या आकाराचा डोंगराचा भाग घसरत रस्तावर आला होता. त्यामुळे रस्ता तुटला होता. मोऱ्या आणि संरक्षक कठडे नामशेष झाले होते.

या दुर्घटनेत आंबेनळी घाटाची अक्षरशः वाताहात झाली होती. ऐन पावसाळ्यात या घाटमार्गावर लहान मोठ्या तीस ठिकाणी माती दगडधोंड्यांसह दरडी रस्त्यावर आल्या होत्या. वाहने अडकून पडली होती. २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनात अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्या दिवशी २४४ मिली मीटर पाऊस पडला होता. तेव्ही अनेक दिवस घाट दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता घाटमार्ग योग्य असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक आंबेनळी घाटमार्गाने प्रवास करत आहेत. चार दिवसांपूर्वी घाट पारिसरात अवकाळी पाऊस पडला. त्या पार्श्वभूमीवर वातावरणातील बदल पाहता जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत भूस्खलनाचा धोका वाढतो तर डोंगर उतारावर जितका जास्त ढिगारे असतील ते अधिक अस्थिर होतात.

रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कापणे, सुरुंगाचे स्फोट घडवणे यामुळे डोंगर खिळखिळा झाला आहे. डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यातून सातत्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी झिरपून जमिनीत मुरले जाते. परिणामी छिद्रांच्या ठिकाणी दाब वाढतो आणि डोंगराचा काही भाग अलग होत रस्त्यावर दरडीच्या रूपात घसरत येत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली डोंगर कापला गेला. यामुळे घाटमार्ग दरवर्षी दरडबाधित होत आहे.

नव्याने रस्ते करण्याची मागणी

राज्य सरकार दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करते. तरीही पावसाळ्यात दरड कोसळत आहेत. आंबेनळी घाट परिसर हा पावसाच्या अतिवृष्टीच्या भागात आहे. त्यामुळे या भागात भूस्खलनाचे धोके कुठे आणि किती वाढतील याचा आता संशोधकांनी अभ्यास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या खोऱ्यातील पर्यावरण-संवेदनशील भागांचा सखोल अभ्यास करावा, तसेच घाट मार्गासह गावांचे त्यांच्या कोर आणि बफर क्षेत्रासह (भूस्खलन) संवेदनशीलता मॅपिंग नव्याने करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र मालुसरे (सावित्री ढवळी खोरे ) यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -