Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखIsrael-Hamas War : इस्रायल - हमास युद्धावर तोडगा?

Israel-Hamas War : इस्रायल – हमास युद्धावर तोडगा?

  • विजयकुमार पोटे

हमास आणि इस्रायलच्या युद्धसंघर्षामुळे संपूर्ण जग होरपळले आहे. या युद्धाचा फटका अमेरिकेलाही बसत असून, आगामी अध्यक्षीय निवडणुकीत मुस्लीम मतदार दुरावण्याच्या भीतीमुळे ज्यो बायडेन यांनी युद्धविराम घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच रमजानपूर्वी संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, इस्रायलच्या युद्धखोर वृत्तीमुळे अलीकडेच १०४ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यापुढेही प्रश्नचिन्ह आहे.

अरब आणि अमेरिकेसारखे स्वयंघोषित मध्यस्थी करणारे देश हमास-इस्रायल युद्धामध्ये युद्धग्रस्त पॅलेस्टिनी लोकांमध्ये विमानातून अन्नाची पाकिटे टाकण्यापुरती मर्यादित भूमिकाच बजावू शकले आहेत. बऱ्याच काळापासून सुरू असणारे हे युद्ध थांबवण्यात त्यांना आलेले अपयश जगापासून लपून राहिलेले नाही. कोणतेही ठोस पाऊल उचलण्याऐवजी स्वतःला इस्लामी देशांचे ‘मसिहा’ म्हणवून घेणारे अरब देशही केवळ अमेरिकेकडे बघण्याखेरीज काहीही करताना दिसत नाहीत. असे असताना अमेरिकेत या वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याची केवळ आशा व्यक्त करू शकत आहेत. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला इस्रायल युद्धविराम जाहीर करू शकतो, असे सांगितले जात होते. या संहारात निर्दोष लोक भयंकर स्थितीत अडकले असून, आपली तसेच कुटुंबीयांच्या भविष्याची तरतूद करण्यास अक्षम आहेत, असे बायडेन यांनी ताज्या शोकांतिकेनंतर सांगितले आहे.

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत एकूण जखमींची संख्या ७० हजार ३२५ वर पोहोचली आहे. जोरदार बॉम्बस्फोटाने अलीकडे झालेला विद्ध्वंस सध्या जगभर चर्चेत आहे. मात्र, असे असले तरी नागरी संरक्षण आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अनेक मृत अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांच्या मते गाझामधील युद्धाचे उद्दिष्ट सुनिश्चित केले गेले असून, ७ ऑक्टोबर २०२३ सारखा हल्ला पुन्हा कधीही होऊ नये, यावर मतैक्य झाले आहे. मात्र असे असले तरी स्वत:ला दीर्घकाळ दहशतवादाचा बळी असल्याचे सांगणारा आणि आपल्या अस्तित्वासोबतच जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या लढाईत गुंतलेला इस्रायल हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी आपल्याला बाध्य केले जात असल्याचेही सांगत आहे. हमासकडून शांततेची अपेक्षा करणे निरर्थक असल्याचे त्यांचे मत आहे.

इस्लामिक मुद्द्यांवर दहशत पसरवणाऱ्या आणि पॅलेस्टाईनमध्ये आपली सत्ता असल्याचा दावा करणाऱ्या हमासने मात्र ना अद्याप पराभव स्वीकारला आहे, ना सर्व ओलिसांची सुटका केली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पॅरिसमध्ये अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांची एक बैठक पार पडली. तेव्हापासून इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये लढाई थांबवण्याच्या या संभाव्य कराराची चर्चा रंगली आहे.

कराराच्या ताज्या प्रस्तावांची माहिती देणारे कोणतेही दस्तावेज सार्वजनिक केले गेले नसले, तरी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी हा करार होऊ शकत असल्याचे सांगितल्यावर या क्षेत्रातील जाणकारांनी तसेच अभ्यासकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गाझामधील जनतेला तीव्र गोळीबाराचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युद्धविराम सहा आठवडे टिकेल, असे मानले जात आहे. या काळात हमास ४० इस्रायली ओलिसांची सुटका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भूमिका असेल तर तज्ज्ञांच्या मते, महिला आणि सैनिकांना आधी सोडण्यात येईल. त्या बदल्यात इस्रायल सुमारे चार हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. त्यातील काही अतिरेकी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आहेत. या लोकांना इस्रायलच्या तुरुंगातून सोडण्यात येणार आहे. करारानुसार, इस्रायली सैन्य गाझामधील दाट लोकवस्तीच्या भागातून दूर जाऊ शकते. तसेच ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या लढाईमुळे विस्थापित झालेल्या १८ लाख पॅलेस्टिनींपैकी काही लोक उत्तरेकडील आपापल्या घरी परत येऊ शकतात. अर्थात यासंदर्भात अद्यापही कतारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यात इजिप्त आणि कतारचे मध्यस्थ आणि इस्रायल-हमासच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. मात्र, अद्याप कोणत्याही एका मुद्द्यावर एकमत झालेले नाही.

प्रत्येक इस्रायली ओलिसांच्या बदल्यात किती पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करायची याबाबत अजूनही वाद आहे. यासह, करारामध्ये इस्रायली सैन्याची पुन्हा तैनाती किंवा पॅलेस्टिनी नागरिकांच्या घरी परत जाण्याचा विचारही अद्याप केला गेलेला नाही. हैम तोमर हे मोसाद विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांना अशा वाटाघाटींचा अनुभव आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे या वाटाघाटीची जबाबदारी होती. त्यांनी हमास नेता इस्माईल हानिया यांच्या टिप्पणीचा हवाला दिला असून, आपला गट कोणत्याही करारावर मवाळ भूमिका घेऊ शकतो, असे मत मांडले आहे.

या मताला दुजोरा देत हानिया यांनीही, ‘आम्ही चर्चेत लवचिकता दाखवत असून ती आमच्या लोकांच्या रक्ताचे रक्षण करण्यासाठी उचललेले पाऊल आहे’, असे म्हटले आहे. मात्र गरज पडल्यास लढाई सुरू ठेवण्यास हमास तयार असल्याचेही त्यांनी सांगितल्यामुळे संभ्रम कायम आहे. त्यांनी वेस्ट बँक आणि जेरुसलेममधील पॅलेस्टिनींना इस्रायली निर्बंध मागे टाकून पवित्र रमजान महिन्यात जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. ही ‘लवचिकता’ सूचित करते की, हमास युद्धाचा पूर्ण अंत आणि गाझा पट्टीतून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार यांसारख्या मागण्यांवर पुनर्विचार होऊ शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या मागण्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे; पण त्यांचाही आतून युद्धविरामाकडे कल आहे. त्याला इस्त्राईलमधील अंतर्गत परिस्थिती कारणीभूत आहे.

युद्धामुळे या देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. विरोधक आणि लोक रस्त्यावर उतरले आहेत. पॅरिसमध्ये समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर हमासने अद्याप औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही. गाझामधील हमासचे नेते याह्या सिनवार या कराराबद्दल काय विचार करतात, हेदेखील माहीत नाही. त्यांची गनिम सेना हळूहळू नष्ट होत आहे. इस्रायल सरकारने त्याला पकडण्याची शपथ घेतली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोरदार बॉम्बफेकीमुळे आणि हमासचे हजारो सैनिक मारले गेल्याने सिनवारची ताकद कमी झाली आहे. अशा बातम्यांची खातरजमा करणे अवघड काम आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की, २६ ऑक्टोबरचा हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधणे कठीण होत चालले आहे. दरम्यान, उर्वरित इस्रायली ओलिसांची कुटुंबे आणि मित्र रस्त्यावर उतरले आहेत.

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या बंदूकधाऱ्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला. हमासने लक्ष्य केलेल्या ठिकाणांपैकी एक नोव्हा फेस्टिव्हल साइटदेखील होती. हमासने अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. या ओलिसांचे कुटुंबीय आणि मित्रांनी अलीकडेच नोव्हा फेस्टिव्हल साइटपासून जेरुसलेमपर्यंत मोर्चा काढला. हे उत्सव स्थळ किबुत्झ रीम जवळ आहे. येथे हमासच्या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेले. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी बेपत्ता झालेल्यांचे फोटो हातात ठेवले होते. उर्वरित १३४ ओलिसांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मोर्चातील लोक करत आहेत. आता युद्धबंदी कराराच्या चर्चेने या लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी सांगितले की, गाझाच्या पश्चिमेकडील अल-नाबुलसी चौकात जेवणाची वाट पाहत असणाऱ्या लोकांना इस्रायली गोळीबाराने लक्ष्य केले, त्यामुळे १०४ पॅलेस्टिनी मरण पावले आणि २८० जखमी झाले.

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या कार्यालयाने इस्रायली सैन्याच्या कारवाईचे वर्णन ‘भयंकर नरसंहार’ असे केले आहे. एकंदरच या हिंसक संघर्षात आतापर्यंत सुमारे तीस हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची पुष्टी गाझा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यात किमान १३ हजार २३० मुले आणि ८ हजारांहून अधिक महिला आहेत.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझामधील मदत वितरण साइटवरील मानवतावादी शोकांतिकेचा तीव्र निषेध करत चौकशीची मागणी केली आहे. यानंतर जगभरातील टीकाकारांनीही इस्रायल-हमास युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र संघाला घेरले आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पॅलेस्टाईनमधील एवढी मोठी मानवी शोकांतिका न थांबवण्यामागे संयुक्त राष्ट्र, इस्रायल, हमास, अरब आणि अमेरिका यांच्यापैकी जबाबदारी कोणाची आणि किती आहे?, हा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र स्वतः कबूल करत आहे की ते गाझामध्ये दीर्घकाळापासून हजारो पीडित पॅलेस्टिनींना अन्न पुरवू शकलेले नाही. युद्धबंदी लागू करण्यात त्यांची भूमिका केवळ निवेदने देण्यापुरती मर्यादित राहिली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) ही संयुक्त राष्ट्रांनंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी संघटनाही बैठक घेऊन इस्रायलचा निषेध करत पुढे सरकू शकलेली नाही, त्यामुळे यावर तोडगा निघेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -